कोरा कागद ; निळी शाई..!
पेन मध्ये 'शाई' भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी. दुकानदार ही शाईचे थेंब मोजून पेन मध्ये टाकायचा. आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे रहायचे. कधी शाई हातावर सांडायची. ती तशीच डोक्याला पुसायची. कधी शर्ट खराब व्हायचा, तर कधी चड्डी. या रांगेतूनच आमच्या पिढीला 'सहनशील' बनवलं. तो शाई मिळाल्याचा आंनद भारीच होता.आमच्या पिढीने 'आई-बापाचा' कच्चून मार खाल्ला. भरीस भर एकत्र कुटुंबातील काका, काकी, मावशी, आत्या, मामा, मामी, आजी, आज्जा आणि उरला सुरला गल्लीतील मोठ्या माणसांचा. तरीही त्यात 'मजा' होती.
शाळेत तर काही बोलायची सोयच नव्हती. कान धर. कोंबडा हो.बेंचवर उभे रहा. अंगठे धर. वर्गाबाहेर उभे रहा. अशा सगळ्या 'शिक्षा' निमूटपणे सहन केल्या. शिक्षकांच्या सपासप 'छड्या' खाल्ल्या. यातूनही 'सहनशीलता' वाढली. पण त्या शिक्षणाची गोडी न्यारीच होती जुन्या कपड्यांची शिउन घेतलेली 'दप्तराच...
