तुला नाही जमणार हे गाणं.!
तुला नाही जमणार हे गाणं. पंचवीस-तीस चाली झाल्या. आजच्या कोयना एक्सप्रेसने जा तू मुंबईला. मी बघतो या गाण्याचं काय करायचं ते.” असा सणसणीत अपमान झेलून त्यांनी कोल्हापूरातला गाशा गुंडाळला आणि मुंबैला जायला निघाले…मनात प्रचंड कल्लोळ-घुसमट-कालवाकालव आणि गाण्याचे बोल… मुंबैला पोहोचेपर्यन्त एक लै भन्नाट चाल सुचली… आल्यापावली परत फिरला हा कलंदर ! परत कोल्हापूर गाठलं आनि दिग्दर्शक शांतारामबापूंना ती चाल ऐकवली…
“दे रे कान्हा S दे रे चोळी अन् लुगडी..” !!!
शांतारामबापूंनी खूश होऊन पाठीवर शाबासकीची थाप दिली ! तो महान संगीतकार होता ‘राम कदम’. चित्रपट , अर्थातच ‘पिंजरा’ !
आज मी सिनेमा-नाट्यक्षेत्रात काम करतो. आजच्या पिढीतल्या एका सहकलाकारानं मला “किरण माने सर, हे ‘राम कदम’ कोण?” असं विचारलं होतं, तेव्हा खुप वाईट वाटलं होतं… त्यांच्या एकेका गाण्यात मायणीमधल्या माझ्या सिनेमावेड्या बालपणाची एकेक आठवण गुंफलीय. मराठी सिनेमाच्या सुवर्णकाळात जवळपास सव्वाशे चित्रपटांना संगीत देणार्या राम कदमांच्या फक्त गाण्यांवर अनेक चित्रपट तरले-तगले-यशस्वी ठरले हे कितीजणांना माहितीय???
त्यांच्या जिवंतपणीही कित्येकदा अशी उपेक्षा त्यांच्या वाट्याला आली.. ‘मिठभाकर’ सिनेमाला राम कदमांचे संगीत असुनही एका विशिष्ठ अडचणीमुळे नांव मात्र कशाळकरांचे लागले ! काय यातना झाल्या असतील राव… ‘बुगडी माझी सांडली गं, जाता सातार्याला’ या गाण्याला चाल लावलीय राम कदमांनी पण संगीतकार म्हणून नांव आहे वसंत पवार यांचं ! एवढंच नाही तर संजय लीला भन्साळीच्या ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी सिनेमातल्या ‘पिंगा गं पोरी पिंगा’ ची मूळ चाल राम कदमांची असूनही त्यांचा ‘कृतज्ञता’ म्हणून उल्लेखही टाळला गेला !
माझ्या सुरूवातीच्या काळात एका नाट्यविषयक कार्यशाळेत मला योगायोगानं एक अख्खा दिवस राम कदमांसोबत घालवायला मिळाला होता… अनेक गाण्यांच्या निर्मितीची प्रक्रिया सांगताना ते त्यांच्या जुन्या काळात हरवून जायचे. रंगून गायला सुरूवात करायचे.
‘आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी’ , ‘कुण्या गावाचं आलं पाखरू’ , ‘किती करशील लाडीक लाडीक चाळा’ , ‘एक लाजरा न साजरा मुखडा’ , ‘अशी कशी ओढ बाई-असं कसं वेड’ , ‘कसं काय पाटील बरं हाय का’ , ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ , ‘नका सोडून जाऊ रंगमहाल’ , ‘बुगडी माझी सांडली गं जाता सातार्याला’ , ‘पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा’ … असंख्य गाण्यांनी मराठीला समृद्ध करणार्या महान संगीतकार राम कदम यांचा कित्येक मराठी संगीतविषयक कार्यक्रमांत उल्लेखही केला जात नाही !
अनेक चॅनेल्सवर अनेक शोज होतात.. एकेका कलाकारावर मोठमोठे ‘इव्हेन्टस्’ होतात..पण राम कदमांना समर्पित केलेला इव्हेन्ट किंवा संगीतविषयक रिॲलिटी शोमध्ये आवर्जुन दिलेली मानवंदना, ‘ढोलकीच्या तालावर’सारखा दर्जेदार कार्यक्रम वगळता, क्वचितच पहायला मिळाली… हीच मराठीतल्या प्रतिभावानांची शोकांतिका आहे !
राम कदम यांना त्रिवार सलाम !
– किरण माने