दुनिया फक्त विश्वासावर चालते.!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

दुनिया फक्त विश्वासावर चालते.!

आळेफाटा ते करमाळा प्रवास करत असताना माझ्या बाजूला एक मॅडम बसल्या होत्या.चार तासांचा प्रवास होता.
लेडीज बाजूला असल्यानंतर जरा अवघडल्यागत होतंच.दोन तास होऊन गेले.छोट्या छोट्या स्टँडवर गाडी थांबत होती.प्रवासी उतरत होते,चढत होते.आणि मला तहान लागली होती.गाडी मिरजगाव स्टँडला थांबली.एक वडापाव विकणारा माणूस खिडकीजवळ येऊन ओरडायला लागला..”गरमा गरम वडापाव.” मला पाणी हवं होतं पण त्याच्याकडे फक्त वडापाव होते.मी त्याला म्हणलं “पाण्याची बाटली नाहीय का दादा?” त्यावर तो बोलला “नाहीय भाऊ.पैसे द्या मी आणून देतो लगेच.” मी पटकन त्याला वीस रुपये दिले.आणि तो वीस रुपये घेऊन गर्दीतून वाट काढत बाटली आणायला निघून गेला.

माझ्या बाजूला बसलेल्या त्या मॅडम मोठ्याने हसल्या आणि म्हणाल्या, “गेले तुमचे वीस रुपये.” आणि त्या पुन्हा हसायला लागल्या.मी म्हणलं, “तो पाणी घेऊन येईल.” त्या पुन्हा हसत म्हणाल्या “तो येणारच नाही.त्यावर मी त्यांना म्हणलं,” मॅडम तो येईल कारण, दिवसभर घसा ताणून ओरडुन एक एक रूपया कमवणारा तो माणूस आहे.त्याला वीस रुपयाचे महत्त्व माहित आहे.ही कष्टावर प्रेम करणारी माणसं आहेत.आणि ही दुनिया विश्वासावर चालते.यावर माझा विश्वास आहे.” त्या मॅडम पुन्हा म्हणाल्या “बरं बघूया काय होतंय पुढे.?”

गाडी सुरू झाली.कंडक्टर ने दार ओढून घेतलं आणि बेल वाजवली.तशा मॅडम पुन्हा माझ्याकडे पाहून हसल्या.त्यांनी त्यांच्याजवळची पाण्याची बाटली बाहेर काढली व मला म्हणाल्या “घ्या प्या पाणी. आणि इतका ही विश्वास ठेवून जगणे बंद करा जरा..” त्यांचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटत होतं.

गाडी सुरू होऊन स्टॅण्डच्या गेटवर आली आणि ड्रायव्हर ने कचकन गाडीला ब्रेक मारला.आणि माझ्या खिडकीजवळ उभा होता तो वडापाव वाला.धावत पळत येऊन त्यांने आवाज देऊन गाडी थांबवली होती.त्याने माझ्या हातात बाटली दिली.बाटली देताना तो म्हणाला.,
“भाऊ दुनिया फक्त विश्वासावर चालते.” माझा डायलॉग त्याने सेम मारला होता.गाडी पुढं निघाली.आणि माझी मान ताठ झाली.

त्या मॅडमची बाटली मी त्यांना परत दिली.आणि विश्वासाने हातात आलेली पाण्याची बाटली मी ओठाला लावत म्हणालो, “मॅडम भुकेची वेदना ओंजळीत लपवून जगण्याचा अभंग गाणारी माणसं या जगात आहेत…फसवणाऱ्या लोकांची संख्या कितीही वाढलेली असली तरीही,ही दुनिया विश्वास ठेवणाऱ्या आणि विश्वास जपणाऱ्या लोकांमुळे टिकून आहे..म्हणूनच दुनिया फक्त विश्वासावर चालते यावर माझा विश्वास आहे.

नितीन चंदनशिवे.