अनाथांची नाथ बोहणी
उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असा पूर्वीचा काळ होता, काळ बदलत गेला तसं उत्तम नोकरी व कनिष्ठ शेती असा बदल झाला, पण व्यापार तेव्हाही मध्यम होता आणि आजही मध्यमच आहे मग व्यापारी तो कोणताही असो अगदी छोट्या पासून ते मोठ्या पर्यंत चहाच्या टपरी पासून ते मोठ्या दुकानदारापर्यंत, रस्त्यावरील भाजीवाल्यापासून ते मोठमोठ्या मार्केटमधील व्यापाऱ्यापर्यंत हा मध्यम दर्जातच येतो. याच प्रत्येक व्यापाऱ्याची दुकानदाराची रोजची कमाई असते त्यांना मासिक पगार नसतो. रोजच्या रोज होणारी कमाई त्यालाच काही लोक ताजा पैसा बोलतात, त्याच ताज्या पैशातून ते त्यांचा उदरनिर्वाह करतात रोज सकाळी दुकान उघडलं की देवपूजा करतात अगरबत्ती लावतात देवाला दिवा लावतात, मनोभावे दर्शन घेतात त्यानंतर वाट बघतात ते गिऱ्हाईकाची, पहिले गिऱ्हाईक आले की वस्तू किंवा जो काही माल देतात आणि पैसे घेतात, ते पैसे हातात घेऊन दुकानदार त्या पैशांच्या पाया पडतात त्याच पैशांना ” बोहणी” झाली असं म्हणतात.
बोहणी चांगली झाली म्हणजे पहिल्या आलेल्या लक्ष्मीला पैशाला काही नाट लागू नये, कटकट होऊ नये म्हणून गिऱ्हाईकाच्या मनावर त्याच्या मुडवर घेतले जाते, एकदा का बोहणी चांगली झाली की दिवसभर चांगला धंदा होतो असा सगळ्याच दुकानदारांचा समज आहे आणि दुकानदारांच्या अनुभवावरुन खरे आहे, बोहणी आल्यानंतर गल्ल्यात असलेल्या देवासमोर ठेवतात.
सिन्नर येथे पास्ते रोडला अजिंक्यतारा थांब्याशेजारी ” हॉटेल महेश” नावाचे हॉटेल आहे, तेथे मात्र बोहणीचा प्रकार काही वेगळाच पहावयास मिळाला, त्या हॉटेलमध्ये रोज झालेली बोहणीचे पैसे तिथे असलेल्या एका स्टीलच्या डब्यात टाकले जातात त्या डब्याला कुलूप लावले आहे, त्यात वरतून साफटीतून टाकले जातात, हॉटेलचे मालक श्रीयुत भरत शिंदे व महेश शिंदे हे रोज सकाळी जी काही बोहणी होईल मग ती कितीही रुपयांची असो दहा, वीस, पन्नास, शंभर किंवा पाचशे कितीही झाली तरी त्या बोहणीचे पैसे त्याच डब्यात टाकतात, त्या डब्यावर लिहिलेले आहे “अनाथ मुलांसाठी मदतनिधी” हा डबा फक्त डबा नाही तर कितीतरी अनाथ मुलांचे भविष्य घडविणारा हा डबा आहे. असाच डबा पूर्वी लग्नात असायचा आहेरासाठी त्यात आहेर जमा केले जायचे मुलाच्या व मुलीच्या वडिलांना एक आर्थिक मदत व्हायची. काळाच्या ओघात ही चांगली प्रथा बंद झाली.
अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या सिंधुताई सपकाळ आपल्यातून निघून गेल्या पण त्यांच्या विचारांनी अनेक लोक प्रभावित होऊन त्यांनी सुरू केलेले काम पुढे सुरूच ठेवले आहे, व्यक्ती जाते पण त्यांचे विचार कधीच मरत नाही, नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली पण त्यांच्या विचारांची कुणी हत्या करू शकले नाही, उलट विचारांनी अनेक नवीन दाभोळकर तयार झाले विचारांची मशाल नेहमी पेटती असते, ती कधीच विझत नाही एका मशालीच्या अग्नीने दुसरी, दुसरीने तिसरी अशा अनेक मशाली पेटतात, अशाच विचारांचे पाईक असणारे भरत भाऊ वर्षभर त्या डब्यात पैसे टाकतात आणि वर्षाच्या शेवटी तो डबा खोलतात आणि त्यातून जे मुलं अनाथ आहेत त्यांचा वर्षभराचा शिक्षणाचा खर्च ते करतात तो डबा पाहून हॉटेलमध्ये येणारे सहहृदयी लोकही त्यात काही मदत म्हणून पैसे टाकतात. आत्तापर्यंत अनेक अनाथ मुलांचे ते जणू मायबापच आहेत.
या सामाजिक उपक्रमातूनच भाऊंनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने एक सामाजिक संस्था सुरू केली त्या संस्थेचे नाव आहे “उडान फाउंडेशन” त्या फाउंडेशन मार्फत अनेक सामाजिक कामे केली जातात दरवर्षी ” राज्यस्तरीय बाल शौर्य पुरस्कार” देखील दिला जातो संस्थेच्या लोगोतच गरुड पक्षी टाकलेला आहे त्या पक्षाप्रमाणेच ही संस्था गरुड झेप घेत आहे हॉटेलचे नाव मोठ्या भावाने म्हणजे भरत शिंदे यांनी “हॉटेल महेश” असे दिले आहे, महेश हे त्यांच्या लहान भावाचे नाव आहे यातून दोन भावांचं असलेलं निक्खळ प्रेम दिसून येत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे हॉटेलचा गाळा हा भाडे तत्त्वावर आहे तरीही गाळ्याचे भाडे भरून हॉटेल चालवून उदरनिर्वाहासाठी पैसे खर्च करून अनाथांसाठी भरत भाऊ कलियुगातील जणू काही नाथ झालेले आहेत, त्यांनी ह्या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून सुरू केलेला हा विचार जर सर्वच दुकानदारांनी अवलंबला सकाळची बोहणी अनाथांसाठी दान केली तर या देशातील सर्वच अनाथ मुलांचा शिक्षणाचा, राहण्याचा, खाण्यापिण्याचा खर्च सुटू शकेल ! हा मदतनिधी चा डब्बा प्रत्येक दुकानावर ठेवला गेला तर एक नवीन क्रांती होईल ! अनाथांवरती दया माया होईल.
अनाथांची तुम्हां दया ।
पंढरीराया येतसे ॥
ऐसी ऐकोनियां कीर्ती ।
बहु विश्रांति पावलों ॥
अनाथांच्या धांवा घरा ।
नामें करा कुडावा ॥
संत तुकाराम महाराजांनी तेच या अभंगांमध्ये सांगितले आहे अनाथावरती दया करा, माया करा त्यांना त्यांचा जगण्याचा अधिकार द्या. अनाथांचे नाथ भरत भाऊ व महेश भाऊ स्वतःचे पोटपाणी भरून हे जे काही बोहणीतून सामाजिक काम करतायेत त्यांना नक्कीच ही अनाथ मुलं आशीर्वाद देतील त्यांच्या या कार्यातून समाजही बोध घेईल व असाच उपक्रम सुरू करेल! बोहणीतून समाजसेवा हा एक आगळावेळा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे, दखलपात्र आहे, आता हीच नवीन बोहणी पध्दत, नवीन परंपरा प्रत्येक दुकानदाराने करताना आपल्याला पहायची आहे.
– वृक्षमित्र विष्णू तानाजी वाघ
अध्यक्ष, वृक्षमित्र फाऊंडेशन व
वृक्षमित्र साहित्य परिषद,सिन्नर
(७०२०३०३७३८)