📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

आशेचा कुबडा: माणुसकीचा खरा चेहरा

On: May 19, 2025 8:29 AM
आम्हाला फॉलो करा:
आशेचा कुबडा: माणुसकीचा खरा चेहरा

मंदिराबाहेर नेहमीप्रमाणेच भिक्षेकरी तपासत होतो… तपासुन घेण्यासाठी, औषधांसाठी नेहमीचीच भिक्षेकर्यांची झुंबड ….सहज लक्ष गेलं एका कोपऱ्यात, तिकडे दगडावर एक बाबा बसलेले दिसले… बसणं ताठ, नाक तरतरीत आणि सरळ, घारुळे डोळे, अंगावर साधे पण स्वच्छ कपडे… बराच वेळ मी तिरक्या नजरेने पहात होतो, हे भिक्षेकरी नक्कीच नव्हेत…. ! सहज दिसलं, उजव्या घोट्यापासुन पाय नव्हता त्यांना, बाजुलाच कुबडी टेकवुन ठेवली होती….

थोड्या वेळानं सहज लक्ष गेलं, कोणीतरी काहीतरी देत होतं आणि ते घेत होते… अरे ! माझा अंदाज चुकला तर….उत्सुकता वाढली म्हणुन त्यांच्याजवळ जायला लागलो तर कुणीतरी म्हणालं, डॉक्टर, नका जावु, वेडा आहे तो !

उत्सुकता स्वस्थ बसु देइना म्हणुन गेलो, मला वाटलं ते मला पाहुन हात पुढे करतील….पण त्यांचा हात पुढं आलाच नाही तीथंही अंदाज चुकला माझा….

मीच म्हणालो, बाबा काही त्रास ? कुबडी घेत हळुच उठत ते म्हणाले, Good afternoon doctor…… I think I may have some eye problem in my right eye ….

मी उडालोच इतकं अस्खलीत इंग्लिश ऐकुन…

मी धक्क्यातुन बाहेर येत, डोळा बघितला, पिकलेला मोतीबिंदु होता, मी म्हणालो मोतीबिंदु आहे बाबा, अॉपरेशन करावं लागेल…. तसे म्हणाले, oh, cataract ? I had cataract operation in 1999 for my left eye in Ruby Hospital but….

हा प्रकार काहितरी वेगळा आहे हे आता पक्कं जाणवलं…..

म्हणालो, बाबा, तुम्ही इथं काय करताय ?

मी रोजच इथं येतो दोन तास…

हो पण का? मला तर तुम्ही चांगले शिकलेले वाटता ?

शिकलेले ? या शब्दावर जोर देत ते हसत म्हणाले, शिकलेले ?

म्हणालो, बाबा तुम्ही थट्टा करताय का माझी ?

Oh no doc… Why would I ?… Sorry if I hurt you !

हर्ट नाही पण मला काही कळत नाहिये, काय चाललंय बाबा …

कळुन घेवुन काय करणार आहात डॉक्टर ?

ओके, चला आपण तिकडे बसु, नाहितर लोक तुम्हालाही वेडा म्हणतील…. असं म्हणुन ते हसायला लागले….

आम्ही दोघंही थोडं बाजुला जावुन एका टपरीत बसलो….

Well Doctor, I am Mechanical Engineer…. बाबांनी इंग्लिशमध्येच सुरुवात केली…. मी xxxxx या कंपनीत सिनीअर मशीन अॉपरेटर होतो, एका नविन अॉपरेटरला शिकवत असतांना पाय मशीन मध्ये अडकला, आणि हातात कुबडी आली. कंपनीने सर्व खर्च करुन वर आणखी थोडे पैसे देवुन घरी बसवलं…. लंगड्या बैलाला कोण ठेवेल ?

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

मग स्वतःचं छोटं वर्कशॉप काढलं, मस्त घर घेतलं, मुलगाही मेकॕनिकल इंजिनियर आहे, वर्कशॉप वाढवुन त्याने छोटी कंपनी टाकली…..

मी चक्रावलो, बाबा पण मग तुम्ही इथं कसे ….?

मी…? नशीबाचे भोग…

मुलाने व्यवसाय वाढवायचा म्हणुन कंपनी आणि घर दोन्ही विकलं… म्हटलं पोराची भरभराट होत्येय.. विकुदे !

विकुन सगळं घेवुन तो गेला जपानला…. आणि आम्ही इथे उरलो जपानी बाहुल्या म्हणुन… ते हसायला लागले…. हसणंही इतकं करुण असु शकतं …हे मी अनुभवलं …. !

बाबा पण तुमच्याकडे स्किल आहे, लाथ माराल तिथं पाणी काढाल तुम्ही….

तुटलेल्या उजव्या पायाकडे पहात बाबा म्हणाले, लाथ …? कुठे आणि कशी मारु सांगा…?

मी ओशाळलो, मलाच वाईट वाटलं…

आय मीन बाबा कुणीही नोकरी देईल तुम्हाला अजुनही , कारण या क्षेत्रातला तुमचा अनुभव खुप आहे…

Yes doctor, मी एका वर्कशॉपमध्ये आहेच कामाला…. 7000 मिळतात मला….

माझ्या डोक्यातला तिढा काही सुटत नव्हता….

अहो बाबा तरी मग तुम्ही इथं कसे ?

डॉक्टर, मुलगा गेल्यावर एका चाळीत पत्र्याचं शेड घेतलंय भाड्यानं, तिथं मी आणि माझी बायको राहतो, तीला Paralysis आहे ती जागेवरुन उठु शकत नाही.

मी 10 ते 5 ड्युटी करतो, 5-7 इथं बसतो, आणि घरी जावुन “तिघांचा” स्वयंपाक करतो….

बाबा आत्ताच म्हणालात , घरी तुम्ही आणि बायको असता मग तिघांचा स्वयंपाक ?

डॉक्टर, माझ्या लहानपणी माझी आई वारली, माझ्या जिवलग मित्राच्या आईनेच त्याच्याबरोबर मलाही सांभाळलं, दोन वर्षापूर्वी तो मित्र वारला हार्ट अॕटॕकने, 92 वर्षाच्या त्याच्या आईला मी आणलं मग माझ्याच पत्र्यात…. ती कुठं जाईल आता….?

मी सुन्न झालो…. या बाबाचे स्वतःचे सर्व हाल, बायको अपंग, स्वतःला पाय नाही, घर धड नाही, जे होतं ते मुलानं विकलं ….त्यात मित्राच्या म्हाता-या आईला सांभाळतोय…..

बाबा मुलानं तुम्हाला रस्त्यावर आणलं, तुम्हाला राग नाही येत त्याचा ?

No no डॉक्टर, अहो ते त्याच्यासाठीच कमावलं होतं, घेतलं त्याने, काय चुकलं त्यात ..?

बाबा घेण्याची पद्धत चुकली त्याची , त्यानं ओरबाडुन घेतलं सर्व….

डॉक्टर, अहो आपले पुर्वज माकड होते, शेपुट गेलं तरी ओरबाडायची सवय जाइल का माणसाची …? असं म्हणुन हसता हसता तोंड फिरवलं …. ते हसणं होतं कि लपवलेले हुंदके ???

बाबा, कळलं मला 7000 मध्ये भागत नाही तिघांचं म्हणुन तुम्ही इथं येता, बरोबर ?

No you are wrong doctor. 7000 मध्ये मी सर्व मॕनेज करतोच सगळं, पण जी म्हातारी आई आहे मित्राची तीला डायबेटीस आणि ब्लड प्रेशर दोन्हीची औषधं चालु आहेत, ती मात्र मॕनेज होत नाहित या सात हजारात….

मी येतो दोन तास इथे, कुणी दिलेलं अन्न मी स्विकारत नाही, पैसे कुणी दिले तर मात्र घेतो…. तीची महिन्याची औषधं ओळखीच्या मेडिकल स्टोअर मधुन आधीच घेतो आणि रोज दोन तासात जे पैसे मिळतील ते पैसे मेडिकल वाल्याला रोजच्या रोज देतो…. !

या बाबाला त्याचा स्वतःचा मुलगा सोडुन गेलाय आणि हा बसलाय दुस-याची आई सांभाळत….

डोळ्यातुन पाणी येवु न देण्याचा आटोकाट प्रयत्न करुनही डोळे शेवटी मला दगा देतातच ….

बाबा, दुसऱ्याच्या आईसाठी तुम्ही इथं पैसे मागायला येता ?

दुसऱ्याची ? अहो माझ्या लहानपणी खुप केलंय तीनं माझं…. आता माझी पाळी आहे इतकंच ….!

मी त्या दोघींना सांगितलंय 5-7 आणखी एक काम मिळालंय म्हणुन….

बाबा, आणि त्यांना जर कळलं तुम्ही इथे मागता म्हणुन तर …?

अहो कसं कळेल ? दोघीपण खाटेवर पडुन……. इकडच्या कुशीवरुन तिकडं होता येत नाही त्यांना मी केल्याशिवाय…येतीलच कश्या त्या ? हा…हा…द्या टाळी !

हुंदका लपवण्याची आता माझी पाळी होती पण बाबांइतका मी सराइत नव्हतो या लपवालपवीत ….

ब-याच वेळानं लक्षात आलं टाळीसाठी दिलेला बाबांचा हात माझ्या हातात तसाच होता, तोच हात दोन्ही हातात घेवुन मी त्यांना विचारलं, बाबा तुमच्या आईला मी डायबेटीस आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या कायम स्वरुपी दिल्या माझ्याकडुन तर तुम्हाला इथं हे असं मागावं लागणार नाही right ?

म्हणाले, no doctor, तुम्ही भिका-यांसाठी काम करता, तीला तुम्ही गोळ्या देणार म्हणजे एका अर्थी ती भिकारीच झाली ना ? मी आहे अजुन समर्थ, तीचा मुलगा म्हणुन… मला कुणी भिकारी म्हणालं तरी चालेल पण तीला नाही….

OK Doctor, जावु मी आता ? घरी जावुन स्वयंपाक करायचा आहे अजुन ….

बाबा भिका-यांचा डॉक्टर म्हणुन नाही, तुमचा मुलगा समजुन घ्या ना आज्जीसाठी औषधं ….

हात सोडवत ते म्हणाले, डॉक्टर, आता या नात्यात मला अडकवु नका please, एक गेलाय सोडुन……

आज मला आशेला लावुन उद्या तुम्ही गेलात तर …. ? सहन करायची ताकत नाही राहिली आता…. !

असं म्हणंत ते कुबड्यांवर निघाले सुद्धा ….. जाताना हळुच डोक्यावर हात ठेवला, म्हणाले, काळजी घे बेटा स्वतःची…..

शब्दातुन त्यांनी मी लावलेलं मुलाचं नातं नाकारलं, पण डोक्यावरल्या हाताच्या गरम स्पर्शातुन जाणवलं, त्यांनी हे नातं मनोमन स्विकारलंय …..

या *वेड्या* माणसाला पाठिमागुनच नमस्कार करण्यासाठी माझे हात आपोआपच जुळले …..

हे क्षण मुद्दाम शेअर केले आहेत, जेणेकरुन आपल्याला कळावं, आपल्यापेक्षा वाइट परिस्थितीत जगणारे लोक आहेत खुप…. निदान यांच्याकडे पाहुन आपल्या दुःखाची झळ कमी होईल, आयुष्याकडे बघण्याचा आपला चष्मा तरी बदलेल…. 🙏

डॉक्टर पारसनिस, सोलापुर.

(दत्ता पवार यांच्या फेसबुक वॉल वरून साभार)

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a comment