बाप नावाची सावली… लेक गेल्यावर डोळे पाणावले.! हृदयस्पर्शी मराठी कथा

On: June 25, 2026 8:52 AM
आम्हाला फॉलो करा
"आप्पा आणि लेक कविता यांचे भावनिक नाते दर्शवणारे हृदयस्पर्शी चित्र"

आप्पा, येते हं मी.” खांद्याला अडकवलेली पर्स सावरत आणि दारात पडलेल्या चपला पायात सरकवत कविता बोलली. खुर्चीवर बसलेले आप्पा वर मान न करता फक्त ‘हं’ बोलले. “आणि आप्पा, वेळेवर जेवत जा. उपाशी राहत जाऊ नका. आणि सारखे एकटे घरात बसून राहू नका. की येता माझ्याबरोबर? तुम्हाला कितीदा बोलले, चला माझ्याबरोबर, पण तुम्ही ऐकतच नाहीत.” पायातल्या चपला नीट सरकवत आणि चपलेत अडकणारा साडीचा घोळ आवरत ती निघू लागली. अंगणात तिचा नवरा मोटारसायकल चालू करून तिची ‘ती कधी येते’, याची वाट बघत होता. आप्पा खाली मान घालून बसलेले होते. त्यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. पण ते दिसू न देता पायाच्या अंगठ्याने उगाच फरशीवर काहीतरी रगडीत होते. आप्पांना असं बघून कविताचा जीव गलबलून आला. तिच्या डोळ्यांत पाणी यायला लागले होते. पण आपण रडलो तर मग त्यामुळे आप्पा पण रडतील आणि त्यांना असं रडताना सोडून जाताना तिला फार जड गेले असते. आप्पांनी तिला लहानपणापासून तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपली होती. ती मागेल ते तिला मिळायचे.

घरातील सर्वात मोठी लेक आणि आप्पांची खूप लाडकी. आप्पा कुठे बाहेर गेले आणि कवितासाठी काही आणले नाही, असं कधी झालं नाही. तशीच अवस्था कविताची होती. आप्पा बाहेरगावी गेले असतील आणि त्यांना यायला जर उशीर व्हायला लागला तर तिचा जीव अगदी कळवळून जायचा. “आक्का, अजून का आले नाही गं आप्पा? कधी येतील?” असं काही ना काही विचारून ती तिच्या आईला अगदी भंडावून सोडायची. ते दोघे बापलेक म्हणजे अगदी दोन शरीरे आणि एक जीव होता. संध्याकाळी घरी आप्पा येताच कधी कधी आक्का म्हणजे कविताची आई रागावून आप्पांना बोलायची, “कुठं जायचं असेल ना? तर सगळं त्या पोरीला सांगून जात जा, नाहीतर तिला तुमच्या सोबत घेऊन जात जा. नुसती संध्याकाळ झाली की मला विचारत असते, ‘आप्पा कधी येणार? किती वेळ लागेल? अजून का आले नाही?’ मी काय सांगत जाऊ त्या पोरीला? नुस्तं लाडानं येडं केलंय त्या पोरीला.” हे ऐकता ऐकता कविता आप्पांसाठी पाण्याचा तांब्या भरून घेऊन आलेली असायची. आपल्या लाडक्या लेकीच्या या तक्रारी ऐकत ऐकत गालातले हसू दाबत आप्पा पाणी पित असायचे.

कविता आणि मिना. आप्पांना दोनच मुली. दोघी चांगल्या शिकल्या. दोघींची लग्ने झाली. मनासारखे जावई मिळाले म्हणून आप्पा आणि आक्का दोघेही खूष होते. दोन-तीन महिन्यांतून एका लेकीकडे जाऊन मस्तपैकी आठवडाभर राहून आणि नातवंडासोबत मनसोक्त राहून यायचे. ‘आता आपण दरवर्षी एकदा पंढरपूरला जात जाऊ. एकदा काशी यात्रेला पण जाऊन येऊयात.’ अशा वेगवेगळ्या नियोजनांच्या त्यांच्या गप्पा चालत. धाकट्या मीनाच्या लग्नानंतर त्यांनी दोघांनी सोबत तीन-चार वेळा पंढरपूर आणि आळंदी वारी केली होती. दोघी मुली त्यांच्या घरी आनंदात होत्या. त्यामुळे आप्पा आणि आक्का अगदी आनंदात होते. पण दहा वर्षांपूर्वी आक्काला पावसाळ्यात डेंग्यू झाला आणि त्यातून ती बरी झालीच नाही. दवाखान्यात आप्पा आणि दोन्ही मुली आठ दिवस आक्काच्या सोबत बसून होते. डॉ.नीं खूप प्रयत्न केले, पण आक्का त्यातून बरी झाली नाही आणि आक्का आणि आप्पा यांचे एकदा सोबत काशी यात्रेला जाऊन यायचे राहून गेले. दवाखान्यात असताना आप्पांना एकदा आक्का बोलली होती, “मी गेले ना तर तुम्ही माझ्या लेकींची आई व्हा. त्यांना माहेरपण द्या.”

आक्का गेल्यानंतर आप्पा उदास उदास रहायचे. आक्काने जे सांगितले, ते त्यांना राहून राहून आठवायचे. आपल्या लेकींना माहेरपण मिळावे म्हणून आप्पा त्या आक्का नसलेल्या घरात एकटे एकटे रहायचे. घर सारवून, झाडून-पुसून अगदी स्वच्छ ठेवायचे. कुणाला हे सर्व काम एखाद्या पुरुषाने केले असेल, असं वाटायचे सुद्धा नाही. कविता जवळच्या शहरात राहत असायची. तिने आप्पांना आपल्या सोबत येण्याचा खूप आग्रह केला. पण आप्पा तिच्या सोबत गेले नाहीत. ‘तूच तुला वेळ भेटला की, येत जा. मला तुझी आठवण आली की, मी नक्की येत जाईन’, असं ते तिला सांगायचे. कविता अगदी तिच्या आईसारखी दिसायची. त्यामुळे ती दिसली किंवा तिची आठवण आली तरी आप्पांना त्यांच्या डोळ्यांपुढे आक्का दिसायची. आप्पा आणि आक्का म्हणजे एकरूप झालेले जोडपे होते. कधी कुणाला भांडताना दिसले नाहीत. कधी-कधी आप्पा कविताकडे जात. चार-आठ दिवस तिच्याकडे राहून पुन्हा माघारी येत.

“आप्पा, रहा ना अजून दोन दिवस,” या कविताच्या विनंतीवर ते म्हणायचे, “अगं, मला तिथेच बरं वाटतंय. त्या घरी असले की, मला दिसत नसली तरी सर्वत्र तुझी आई असल्यासारखं वाटतं. दारात- अंगणात, शेतात तिचा भास होतो. विहिरीजवळचा तिने लावलेला आंबा आणि चिंच पाहिली की, मला तिथं असावे, असं वाटत. ती झाडं मला बोलावतात. कधी-कधी शेतातून “ओ कवीचे आप्पा ssss.” अशी दिलेली हाळी कानावर येते. अंगणात तिच्या हाताने बनवलेले तुळशी वृन्दावन पाहिले की, मला अजूनही ती तिथे तुळशीला पाणी घालताना आणि मनोभावे देवाला हात जोडताना दिसते. मी लवकर नाही गेलो तर ती तुळस सुकून जाईल. म्हणून मला गेलं पाहिजे.” आणि असं म्हणून आणि नातवंडांच्या तोंडावर हात फिरवून आणि लेकीचा-जावयाचा निरोप घेऊन पुन्हा आप्पा माघारी येत.

आताशा आप्पांना फार उदास उदास वाटायचं. कधी-कधी जेवण न करता फक्त फुटाणे खाऊन दिवसभर तसेच उपाशी राहत. शेजारच्या वस्तीवरच्या एका म्हातारीने एकदा आप्पांना भेटायला गेलेल्या कविताला सांगितले, “अगं ये पोरी. तुझा बाप कधी-कधी दिवसभर जेवत नाही. त्याला इथं ठिवू नको. तुझ्यासोबत घेऊन जा. आई तर नाही राहिली तर निदान तुला बघायला मिळावा म्हणून तरी बापाला सांभाळ. अगं आई-बाप एकदाच मिळतात. पुन्हा बघायला पण मिळत नाहीत.” हे ऐकलं आणि आप्पाच्या नकाराला न जुमानता त्यांना तिच्या घरी घेऊन आली. महिनाभर आप्पा कसेतरी राहिले असतील. पण नंतर त्यांनी रोजच धोशा लावला, “मला जायचंय”. मनावर दगड ठेवून तिने आप्पांना जाण्याची परवानगी दिली. आता तिनेच काही झाले तरी आठवड्यातून एकदा शनिवारी-रविवारी आप्पांना भेटायला जायचं, असं ठरवलं. दर शनिवारी-रविवारी ती आपल्या नवऱ्यासोबत यायची. सर्व घर व्यवस्थित स्वच्छ करून, दळण दळून, किराणा भरून, आप्पांचे कपडे धुवून ती पुन्हा रविवारी माघारी जायची. आता आप्पा पण दर शनिवारी तिची पाखरासारखी वाट बघत असायचे. सकाळी सकाळी गावात मंदिरात देवदर्शनाला गेले की, “आज माझी कवू येणार आहे,’ असं म्हणून ते लवकर निघायचे. रस्त्यावर तिला बसमधून उतरताना पाहिले की, लहान मुलासारखे तुरुतुरु पुढं चालत जायचे. तिने आणलेली पिशवी हातात घेऊन यायचे. बाप-लेकीचा तो भेटीचा सोहळा दोघांच्याही अंगावर मूठभर मांस वाढवून जायचा. ती परत निघताना शेतातील भाजीपाला पिशवीभरून द्यायचे.

तसेच या वेळीपण कविता घाई-घाईने आली होती. पुन्हा लवकर जायचं असल्याने रविवारी सकाळी येऊन संध्याकाळी ती निघाली. काल दिवसभर आप्पांनी एखाद्या लहान पोरीसारखी तिची खूप वाट पाहिली. आख्खा दिवस खूप उदासवाणा गेला, पण आज लेकीला बघताच त्यांना खूप बरं वाटलं. मला अशा अजून दोन-तीन मुली असायला पाहिजे होत्या, असं त्यांना वाटायचं.

“आप्पा हसा ना,” निघताना कविता पुन्हा बोलली. लहान असताना पण ती अशीच गोड आवाजात आप्पांना ‘हसा ना’ असं म्हणायची. ते आठवून आप्पा हसले. आपल्या बापाचा म्हणजे आप्पांचा हसरा चेहरा बघून आणि त्यातच आक्काचा चेहरा आठवून ती आप्पांकडे बघून गोड हसली. तिथून निघवत नसलेल्या पायांना बळेच ओढत कविता निघाली.

Vishnu Auti IRS Sir

Ⓒ शब्दांकन- श्री. विष्णू औटी, IRS.

(लेखक- नाना, मी साह्यब झालो)

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now