📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

बांगडी बिल्लोरवाला : गावखेड्यातील बांगड्यांची लोप पावत चाललेली परंपरा

On: August 29, 2026 8:46 PM
आम्हाला फॉलो करा:
बांगडी बिल्लोरवाला गावात काचेच्या बांगड्या विकताना आणि महिलांना बांगड्या भरताना

आमच्या लहानपणी पूर्वी गावोगावी, एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन डोक्यावर कपडयाची चुंबय करून टोपलीत किंवा हातात बांगड्यांची हातात मोठी लाकडाची पेटारी व त्याला मस्त काचाची फ्रेम असलेली पेटी घेऊन बांगड्या भरणारा यायचा. ‘बांगडी बिल्लोरवाला’ अशी आरोळी देत तो गल्लोगल्ली फिरायचा. बाजाराच्या दिवशी तो बाहेरगावाहून पाचकोसाची पायपीट करून पायी पायी रस्त्यानं  आमच्या गावात हमखास यायचा. तेव्हा बांगड्या विकणाऱ्या आणि भरणाऱ्या स्त्रियांना किंवा व्यावसायिकांना ‘कासार’ किंवा ‘कासारीण’  असे म्हणायचे. कासार समाजातील लोकांचा हा पारंपरिक व्यवसाय असायचा.

पूर्वी या व्यवसायात पुरुष आणि स्त्रिया गावोगावी हिंडून महिलांना बांगड्या भरायची कामे करायचे. गावचे सण आणि जत्रा असली म्हणजे त्यांना कसं माहिती पडायचं काय माहित पण ते आवर्जून गावात हजर व्हायचे म्हणजे व्हायचे.सणासुदीला,विशेषत ग्रामीण भागात अजूनही या स्त्रिया किंवा बांगड्या विक्रेते घरोघरी किंवा आठवडी बाजारात बांगड्या विकायला जातात.


खेड्यामध्ये बांगड्या विकणाऱ्याला आणि हातावर बांगड्या भरणाऱ्याला ‘कासार’ असे म्हणतात. हा विक्रेता खांद्यावर पिशवी किंवा डोक्यावर सामान घेऊन गावोगावी, आठवडी बाजारात किंवा सणासुदीला फिरायचा व आपला परंपरागत उदरनिर्वाहाचा मार्ग जोपासत गावखेडयातून प्रामाणिकपणे व्यवसाय करायचा.कासार आणि ग्रामीण संस्कृतीची ओळख तशी फार खुप जुनी आहे. कासार समाज हा प्रामुख्याने बांगड्या आणि तांबे-पितळेच्या भांड्यांचा व्यवसाय करायचा.त्यांची चालती फिरती दुकानदारी असायची. हे विक्रेते एका ठिकाणाहून दुसऱ्या गावी पायी किंवा सायकलवरून गावोगावी फिरून बांगड्या विकायचे. महिलांना हातात बांगड्या भरायचे.हे फक्त बांगड्या विकत नाहीत, तर महिलांच्या हातात अत्यंत प्रेमाने आणि कौशल्याने बांगड्या भरायचे.गावच्या जत्रा, सण (उदा. आषाढी वारी, नागपंचमी, संक्रांत) किंवा लग्नकार्या वेळी यांची ग्रामीण भागात खूप मागणी असायची.

आमच्या गावात गावातील एक वयस्कर गृहस्थ तोंडात पानाचा तोबरा भरून लालजरद ओठ करून,आंगात पांढराशुभ्र कुर्ता व पायजामा व खांद्यावर लाल रंगाचा  दुपट्टा टाकून बांगड्या घेऊन यायचे तोच दुपट्टा चुंबय म्हणून डोक्यावर ओझं घ्यायला काही यायचा. बाजाराच्या दिवशी ते यायचे व गावात घरोघरी फिरून आपला बांगड्या विकायचा धंदा करायचे. परत जाताना ते  वेगळ्य मार्गावरील गावांना पण भेट द्यायचे.

त्याचं येणं म्हणजे एखाद्या जुन्या जाणत्या नातेवाईकांसारखच वाटायचं. ते सारवलेल्या ओसरीत ओट्यावर आपलं बांगड्यांचं बिऱ्हाड मांडायचे. आई इकडच्या तिकडच्या चार,दोन बायांना आवाज द्यायची.मंग काय जमलेला थुंगा मस्त काचाच्या पेटीतल्या बांगड्या बघायचा. आजूबाजूच्या शांती,कुंती, वच्छली,कमली, शारदी, आपले बुचडे बांधून एकत्र एकाजागी जमायच्या. आम्ही ही दुरून मजा बघायचो.तो मोठ्या प्रेमानं त्रागा न करता त्यांना बांगड्या दाखवायचा. मोठ्या घासाघीसीनंतर तो अगदीं आनंदाने बांगड्या हातात भरायचा. बांगड्या भरणं हेही मोठं कौशल्य असायचं. जुन्या बांगड्या तो टिचरू न देता हलक्या हाताने काढायचा.

● हे वाचा – एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका…!

आम्ही त्या फुटलेल्या बांगड्याची  रंगीबेरंगी तुकडे कागदावर वेचून जमा करायचो. अंगणात खेळायचो. दुर्बिणच्या डब्यात ते तुकडे भरायचो. त्यावर आरशाचा उजेड पाडून मस्त रंगीत इंद्रधनुष्ययाप्रमाणे चमकणारा उजेड घरभर पसरायचा. बांगड्या भरणारा गावात आला म्हणजे    कोणीही  हाक मारून त्याला बोलावून घ्यायचं. तो त्या त्या घरी न चुकणा आठोनीनं जायचा बाजीवर वा खाली ओट्यावर बसून गप्पागोष्टी करायचा.कोणीही त्याला आदरानं चहापाणी करायचं. आपली पांढरी प्लॅस्टिकची फारी तो जमिनीवर आथरायचा. 

बांगड्यांचा प्रत्येक गठ्ठा उघडून सर्व सामान पसरवायचा.  सर्व स्त्रिया त्या चमकणाऱ्या काचेच्या बांगड्यांभोवती जमायच्या.काही स्त्रिया खरेदी करायच्या, तर काही नुसत्या  डिझाईन पहायच्या. तो प्रत्येकाचं वय बघून बिल्लोर काढायचा. वयस्कर स्त्रियांना मजबूत  काचेच्या बांगडया तर कष्टाची कामे म्हणजे इंधनकाडी आणणे,सडासारोन करणाऱ्या बायांच्या बांगड्या लवकर टिचरत म्हणून त्यांना धटवट टिकणाऱ्या बांगड्या दाखवायचा.कारण इतर कठीण कामांमध्ये ही काचाची बा़ंगडी टिकून राहायची. तरुण मुलींची वेगळी पंसद असायची. त्यांना तो नवीन पॅटर्न म्हणजे हल्ली नाजूक, चमकणाऱ्या बांगड्या दाखवायचा व हातात व्यवस्थीत घालूनही द्यायचा.. यावरूनच बायांचा त्याच्यावर असणारा विश्वास येथे महत्वाचा दिसतो.तोही इमानदारीने आपलं काम चोखपणे पार पाडायचा.

बाया त्यानं चांगल्या बांगड्या दाखवाव्यात म्हणून  त्याच्या बांगड्या किती दिवस टिकल्या म्हणून स्तुती केल्यावर तो आनंदी व्हायचा. व नवनवीन पॅटर्न दाखवायचा. हे टेक्नीक किंवा कसब फक्त बायांनाच जमू शकतं. आपल्या मालाची स्तुती ऐकल्यावर यातच त्याला खरा आनंद मिळायचा.बांगड्या जास्त काळ टिकल्या तरी आपला धंदा व्यवस्थीत चालणार नाही परिणामी विक्री कमी होईल, याची त्याला पर्वा वा फिकीर नसायची.


काचेच्या बांगड्याचे फारफार तर त्याला  एका डझनाचे दहा रुपये मिळायचे. एवढ्या महागाईच्या दिवसांत अनेक वर्षे बांगड्यांना हाच दर होता. त्याचा नफा कमावण्यापेक्षा आपली गिऱ्हाईकी टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न असायचा. वेळप्रसंगी तो उधारपाधारही द्यायचा.यावरून लोकांशी त्याची जुळलेली प्रेमाची नाळ वा प्रेमसंबंध किती घट्ट होते यावरून समजते.

आताच्या बदलत्या काळानुसार इतरही बांगड्या विकणाऱ्या आहेत, पण ते आता पुर्वीच्या म्हाताऱ्या माणसासारखे गावाकडे नियमित येत नाहीत.आता या धंद्यात कासारांची मुले ही गावखेडयात वा गल्लोगल्ली, बाजारात बांगड्या विकायला जात नाहीत आता त्याचे रूपांतर कॉस्मेटिक ज्वेलरी किंवा दुकानांमध्ये झाल्याने ही परंपरागत कला लोप पावण्याच्या  मार्गावर आहे.

बांगड्या भरणारा किंवा बांगड्या विकणाऱ्या  बांगड्या भरून देणाऱ्या  व्यावसायिक व्यक्तीला लोकं आदराने तोंड भरून ‘कासार’  ‘कासारीण’ असे म्हणायचे लगनघरी तर लगन वारासार होईपर्यंत त्यांची चांगली आवभगत चहापाणी देऊन खातरदारी करायचे. कासार समाजाचे हे लोक महत्त्वाच्या शुभ कार्य प्रसंगी लग्नकार्य किंवा सणासुदीला स्त्रियांना चुडा भरण्यासाठी जायचे. त्यांना आवर्जून बोलावले जायचे. पारंपरिक मानसन्मान त्यांना होता त्याबदल्यात पैसा अडका,धान्य मोठ्या प्रेमानं लोकं त्यांना द्यायचे.

महाराष्ट्रात  सौभाग्याचं प्रतिक म्हणून विवाहित स्त्रियांसाठी बांगड्या भरण्याच्या या प्रथेला आणि कासार समाजाला सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व आहे.पुर्वीच्या बायका दोन दोन डझन हातात बांगड्या भरायच्या.आता फक्त डोक्शाले कुंकू नाही तर  टिकली असते. “टिकली तर टिकली नाही तर हुकली” अशी तर गमंत आहे. कारण हातात चुडा भरणं म्हणजे विवाहित स्त्रीचे आणि सौभाग्याचे लक्षण मानलं जायचं यामागचे मुख्य कारण म्हणजे पतीचे दीर्घायुष्य, घरात सुख-समृद्धी यावी आणि आरोग्याला फायदा व्हावा हा हेतू यामागे  होता. पारंपरिक आणि शास्त्रीय कारणांनुसार बांगड्या घालण्याचे महत्त्व असं की हिरवा चुडा सौभाग्याचं लेणं असुन धार्मिक व सांस्कृतिक सौभाग्याचं प्रतीक म्हणून हिंदू संस्कृतीत सोळा शृंगारांपैकी बांगड्या एक महत्त्वाचे अंग मानले जाते.


पतीचे कल्याण व  विवाहित महिलांनी बांगड्या घातल्याने पतीला दीर्घायुष्य लाभते आणि कुटुंबाला चांगले भाग्य मिळते अशी जुनी श्रद्धा आहे. तसेच सकारात्मक ऊर्जा वास करते.काचेच्या बांगड्यांच्या खळखळण्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता राहते असे मानले जाते. आणखी महत्त्वाचे वैज्ञानिक कारण म्हणजे रक्ताभिसरण सुधारते.मनगटावर सतत बांगड्या घासल्यामुळे घर्षण होते. यामुळे हातातील रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारण्यास मदत होते.शरीरातील
ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. शरीरातून बाहेर पडणारी ऊर्जा गोल आकाराच्या बांगड्यांमुळे परत शरीराकडे वळवली जाते, ज्यामुळे थकवा जाणवत नाही आणि मन शांत राहते. बिल्लोर भरण्याच्या पद्धतीला ग्रामीण भागात चुडा भरणे असेही म्हणतात.

प्रा विजय जयसिंगपुरे
भ्रमणध्वनी – ९८५०४४७६१९ 

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now