📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

वाडा इकणे आहे | वृद्धापकाळ, नातेसंबंध आणि ग्रामीण वास्तवावर हृदयस्पर्शी कथा

On: August 5, 2026 1:58 PM
आम्हाला फॉलो करा:
'वाडा इकणे आहे' मराठी कथा – वृद्धापकाळ, गावसंस्कृती, शेती आणि बदलत्या कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित हृदयस्पर्शी कथा.

साजरं चक्क उजाडलं होतं. सुर्याचं लालभडक प्रतिबिंब नदीच्या पाण्यात पडून पाणी अधिकच लालभडक चमकत होतं.घरगडी सासूरवाडीले गेल्यामुळे घराजोळच असलेल्या गायवाडयातून बाजीराव पाटलानं वाडग्यातलं घोडं बाहीर काढलं त्याले पाणी दाखोलं..लगाम लावून त्याच्या पाठीवर साजरं जाडजूड पोतं टाकून ताडकन उडी मारून घोड्याच्या पाठीवर बैठक मारून लगामाच्या कासऱ्याले झटका मारला. नेहमीच्या सरावानं मंग घोड्यानही वावराच्या रस्त्यानं दुडूदुडू धावाले सुरूवात केली.हा सकाऊन उठल्याबरोबर बाजीराव पाटलाचा नेहमीचाच कार्यक्रम होता‌.

पयले एक गडी पेशल घोड्यावर चक्कर माराले बाजीराव पाटलाच्या खटल्यात निरानाम याच कामासाठी होता.पण आता वेळ काळ परिस्थिती सारखी राहिली नव्हती.लोकबी आता पयल्यासारखे खटल्यात कामाले जायले उत्साही राहीली नव्हती.म्हणून बाजीराव पाटील स्वताच् सगळी कामं आपल्या हातानं स्वतःच करायचा व गडी माणसाची वाट न पायता स्वताच आपल्या सगळ्या वावरतून घोड्यावर बसून चक्कर टाकून कुठंकाय सुरू आहे म्हणून घोड्यावर बसून सम्पूर्ण माळरानातून फिरून यायचा.

आजही त्यांनं आपल्या साऱ्या जंगलाले, जवळच्या आखरपट्टीले घोडयावरून चक्कर मारली. संग पाळलेलं कुत्रं मांगमांग होतंच.दुभत्या गाईच्या गडवाभरून दुधाचा काला हा पठठा आपल्या कुत्र्यांले तो प्रेमानं चारायचा. घोड्यावरून खाली उतरून असाच बारकाईनं निरखून कुठी पाणी पडलं कूठी नाही पडलं यांचा अंदाज घेत तो फिरत होता.पाऊसपाणी साधारणच झालं होतं.या पेंडकोणी पाण्यात वावर पेरायले काही हरकत नव्हतं.”पण जर पुढे पाण्या,बिन्यानं च्याट देली तं बुराटच गोठ आहे सायाची”

असं मनाशी पुटपुटतच तो धुऱ्यावर आला. बाजूच्याच वावरात दूरवर नजर टाकताच त्याचा शेजारी असलेला शहादेव त्याले दिसला.

“रामराम हो बाजीराव पाटील”
लावाना पेरणं सुरू!येते ना आता पाणी”
बाजीरावनं मंग दम रोखून

“पाहयतो ना जरासीक वाट बुढया,बाढया तं नाही भरल्या राज्या अजून,खाली सारं कोळळखटकच तं हायं,चार बोटं ही वल नाही नां बावा रे”
असं म्हणत धुऱ्यावर बसुन घडीभर गोष्टीमाता केल्या.

बाजीराव पाटलाचा तालतंबोर सारा बराबर होता.वीस ,बावीस एकराचा नंबर होता.चांगला बापजादयापासूनचा सागवानी काळाशार चिरेबंदी वाडा होता.घरी दोन,तीन बैलजोड्या,ढोरं वासरं, दुधदुभतं,गडीमाणस़ं साजरं नांदतं गोकुळ होतं. एकच पोरगा व एकच पोरगी होती. तेही खेडं सोडून शिक्षणासाठी बाहेर गावी गेलेली.सारं बरोबर होतं बाजारहाट,कामाधंदयाईले गडी होता. त्याले फक्त ध्यान,लक्ष ठेवावीच गरज होती.पण एक दोन वर्षात पाटलानं चांगलीच हाय खाल्ली होती. तब्येतीनं चांगला धष्टपुष्ट असलेला बाजीराव पाटील आता चांगलाच खंगला होता.

पयल्या सारखी रग पाटलाच्या आ़ंगात रायली नव्हती‌. त्याले कारणही तसंच होतं. बाजीराव पाटलाची बायको म्हणजे त्याची खा,प्याची आंगोनीनं कायजी घेणारी घरधनीन मागंच तात्पुरत्या बिमारीनं स्वर्गवासी झाली होती.एवढा मोठा नांदता वाडा सोडून लेकरंही शिक्षण, पाण्यासाठी दूर पांगलेली. मंग घरी कोण आहे?घरच्या बाईची सर बाहीरच्या गडीमाणसाले थोडी येते? तरी लहानपणापासूनच त्याच्या खटल्यात काम करणारा शंकऱ्या त्याच्या खाण्या,पेण्यापासून पाटलाची साजरी कायजी घ्यायचा. तालुक्याच्या गावाहून औषधपाणी,बजारहाट करून आणायचा. बाजीराव पाटलांनही त्याले कमी केलं नव्हतं. सालगुदस्ता शंकऱ्याच्या पोरीच्या लग्नाले काही धान्य व पैकं देल्लं होतं.

अखाडीपासून पाण्यानं चांगलाच जोर धरला होता.रातभर साजरं नव्या दमानं धो-धो पाणी बरसलं होतं.गावच्या नदीनाल्याईनं अक्राळविक्राळ रूप घेतलं होतं. बाजीराव पाटलानं पायटीच गावातल्या ईष्णू म्हाल्याले आपल्या वाडयावर बलाऊन साजरी हजामत करून घेतली. आंगोळ,बिंघोळ उरकून बाजीराव पाटील बैठकीतल्या गादीवर तक्याले रेटून कनोडयात ठेवलेल्या मोठ्या रेडूवरच्या बातम्या कान देऊन आयकत होता.चालू असलेल्या हवामान अंदाजाचा चायचूय घेत होता.

पाटलानं शंकऱ्याले आवाज देऊन शेणपाणी काढून झाल्यावर अटायावरचे डवरे,तिफन,सरते काढाले सांगितले.त्याच्या दोऱ्या,गिऱ्या,खुटे,खाटे अडसून घ्यायला लावले. निळकंठा वाडयाजोळून तिफन भरून आणली. आपल्या धुऱ्यावरच्या बाबुयचे फाटे तोडून नव्या बेपाटीचे जानकुळं,रूमणे बनवून घेतले.दुसऱ्या दिवशी मस्त बैलाले घमीलंघमीलं ढेपीचा अलप लाऊन तुरीचा कोंडा पोटभर खाऊ घातला.बैलाईले पाणीगिणी पाजून व तिफनीची पुंजा करून तिफन खांद्यावर देऊन नव्या दमानं वावराच्या पेरणीले सुरूवात केली होती.

सारं वावरं पेरून झालं होतं.झडीपाणी व्यवस्थीत असल्यानं साजरं टर्र निंगालही होतं.काही दिवसांतच नागपंचमीची झडी रोरो करत आली. नागपंचमीच्या झडीनं सारा जंगल हिरवाकंच झाला होता.पऱ्हाटीही साजरी हिरवीकदोळ व जब्बर पोटऱ्या,पोटऱ्या बसली होती.फक्त पाऊस खंडला म्हणजे बाया सांगून निंदाचीच गळबळ बाकी होती.पाऊस खंडल्या बरोबर नेहमीच्या आपल्या कामाले येणाऱ्या पातीवरच्या बाया सांगून सारं रानं पाटलानं निदूंन चक केलं होतं.गडी माणसांकडून खत,बित देऊन घेतलं होतं.आता फक्त पिक घरात यायची देरी होती. पाटलानं त्यांच काम चोख केलं होतं.”पण निसर्ग काही कोणाच्या बापाच्या हातात आहे.मन मानील तसं कराले”.

बाजीराव पाटील आता निर्धास्त होता.पोरगीही पुण्याले कंपणीत लागून तेथेच स्थायिक झाली होती.त्याच्या पोरांचाही आता अमेरिकेतल्या मोठ्या कंपनीत नंबर लागला होता.तो तीकडेच सेटल झाला होता. लग्ना,मरणात बाजीराव पाटील बाहीरगावी गेला म्हणजे लोकाईले,सग्या सोयऱ्यांनाही लेकराईचं तोंडभरून कौतुक सांगायचा.अशातच चांगलं स्थळ चालून आल्यावर पोराचे हात हयदीनं पिवळे करून द्यायचं तेवढं बाकी होतं.

बस हीच फिकीर आता त्याच्या जीवाले घोर करून लागून राहिली होती.तसं त्यांन पोराच्याही कानावर टाकलं होतंच.पोरगं पुढे पाहू म्हणून आढेवेढे घेत होतं.नंतर नंतर ते तं बाजीराव पाटलाचा फोनही उचलत नव्हतं. बाजीराव पाटलाले हा काय घोर आहे समजायले मार्ग नव्हता. त्याच्या शब्दांच्या बाहेर जाण्याची कोणाची मजाल नव्हती.साऱ्या गावात बाजीराव पाटलाचा दरारा होता.सारा गाव त्याच्या शब्दाले मान देत होता.तरी इकडून तिकडून आपल्या पोरांनं लग्न केल्याची बातमी त्याच्या कानावर आली.एवढं रगत आटवून पोरांनं आपल्याच पाठीत खंजीर खुपसावं ही गोठ त्याच्या चांगलीच जिव्हारी लागली होती.तरी आपलच रगत हाय म्हणून “झाकली मुठ सव्वा लाखाची” म्हणत बोभाटा नको म्हणून तशीच झाकून ठेवली होती.

“जाऊ द्याना हा काही आपला जमाना होय,करतातच आजकालचे पोट्टे असा तितंबा”

म्हणुन राग गिऊन तो चिडीचूप होता.पोरगी आपल्याच भागातील त्याच्याच कंपनीतली असल्याने तो दातमनगटं खाऊन चिडीचूप होता आता बराच जमाना बदलला होता..”पण पोटच्या लेकरानं तरी असं कराले पायजे नोतं, नाही,निदान दोन शब्द तरी आपल्या कानावरतं लेकानं टाकायले पायजे होतं”

याची खंत त्याच्या दुखऱ्या मनाले लागून रायली होती. बाळपणापासून लेकराईलं तयहाता प्रमानं संभायलं होतं.काही कमी केलं नव्हतं.माय मेली तेव्हा पासून तोच लेकराईची माय झाला होता.किती सोयऱ्याधायऱ्याईनं त्याले लग्नासाठी मिनतवारी केली होती, दुरून सांगावे धाडून लगनपाण्यासाठी गोठ काढली होती. पण आपल्या सोन्या सारख्या लेकराईची माती नको म्हणून मन मारून उभं आयुष्य त्यानं तसंच जायलं होतं.

“नाही बुवा मले माह्या लेकराईचं माती नाही कराची,दूसरी बायको सोन्यासारख्या लेकराईले कशी वागोते अन् कशी नाही”

असा पुढचा ईचार तो करून आपलं आयुष्य कसं तरी पुढं ढकललं होतं.चार चौघात तो तसं बोलूनही दाखवायचा. स्वभावानेही बाजीराव पाटील फारच प्रेमळ होता. गावातल्या विठोबाच्या भंडाऱ्यात दोन पोते गहू इंधन काडी, दायदाणा, अन्नदान तो हौसेने द्यायचा. ढोलाच्या भजनात तल्लीन व्हायचा.”विठोबानं आपल्याले काय कमी देलं रे”

ही वृत्ती बाजीराव पाटलाची होती. बाजीराव पाटलाच्या पोरांची इकडे पुण्यात बदली झाली होती.व त्याले एक गोंडस नातही झाली होती. म्हणजे तो आता आबा झाला होता. त्याच्याच पोरांनं त्याले ही बातमी देल्ली होती.अधूनमधून नातीच्या भेटीसाठी तो बाजूच्या काशिनाथले मोबाईलवरून व्हिडिओ कॉल लाऊन मांगायचा व नातीचा चेहरा मोठ्या कौतुकाने न्याहाळायचा.तीले आपल्या गोठ्यातील गायवासरू दाखवायचा. ज्वारीची कणगी,आपल्या ताटातली भाकरी दाखवायचा.”बघ तूहया आबा न्याहरी करत आहे म्हणून हौसेने सांगायचा”

पण शहरात राहून भोगलेले दिवस विसरून व आपल्या सख्ख्या गणगोताले पायदळी तुडवून पा़ंढरपेशा वृत्तीच्या पोराले व सूनीले मात्र याच्या शेतात व ढोरावासराईत काडीमात्र इंटरेस्ट नव्हता.”बाबा ती पिझ्झा खात आहे.आता ती बैलबंडीत नाही तर कारमधे जाते”

.हे ऐकूनच बाजीराव पाटील चपापायचा.नातीचं कौतुक तं होतं पण लेकराईनंही आपली अशी टिंगलटवाळी करावं पाटलाले जरा ईपरीतच वाटलं होतं.तरी त्यांन दसऱ्याच्या सणाले पोराले बोलावून घेतलं. पण पोरगा सुट्टी नाही .कंपनीचं फारच वर्कलोड आहे.दसऱ्याले येणं जमणार नाही म्हणून त्यानं बापाले सरळ सांगितलं होतं. फोनच्या दुसऱ्या बाजूनं सुनीचा आवाज येत होता.

“तुमच्या बाबाले येणं जमणार नाही म्हणून सांगा,”काय आहे हो त्या खेळम्यात? लाईन नाही ना धड पाणी नाही ना औषधपाण्याचा पत्ता नाही” बाबाले म्हणा,ठेवा आता फोन पोरीले झोप आली”

थोड्याच वेळात फोन बंद झाला. त्यानं परत दोन वेळा फोन लावून पाहिला.पंरतु लागत नव्हता. व्यस्त आहे म्हणून सांगत होता.बाजीराव पाटील समजायचं ते समजून गेला. याच्या बापापरीस तीले तीचा बाप प्यारा होता. यांच्या कुटुंबीयांपेक्षा सुनेले तीचं गणगोत जरा जास्तच प्यारं होतं.बाजीराव पाटील पोरांना शहरात फक्त दायदाणा नेऊन देण्या पुरता घरगडी म्हणून फक्त नावापुरता शिल्लक उरला होता.

या शिकलेल्या पांढरपेशां लेकरांना फक्त गाईचं दुध पायजे होतं पण गाय नको होती. अन्नधान्य पायजे होतं पण शेती नको होती. हे सारं तो आयकत होता आपल्या डोयानं पायत होता.डोये असून महाभारतातल्या आंधळ्या धृतराष्ट्रासारखी त्याची गती झाली होती. त्याच्या डोळ्यांले आपसूकच धारा लागल्या.पण तो काहीही करू शकत नव्हता, आपलेच ओठ अन् आपलेच दात म्हणून बोलूही शकत नव्हता. पोटच्या लेकराईनंच त्याच्या पाठीत खंजीर खुपसला होता.

निदान लेकराईनं पोळ्याले यावं दसरा,दिवाईले यावं.आपला एवढा मोठा वाडा दाखवावा,आपली गावसंस्कृती मुलांना दाखवावी,येथील रितीरिवाज दाखवावा,आपल्या गोठ्यातील बैलं दाखवावे.नदी दाखवावी, जमीन दाखवावी.पण आताच्या या आधुनिक पिढीले यात काहीच इंटरेस्ट नव्हता.घर सोडून शिक्षणासाठी एकूलता एक पोरगा नसता पाठवला तरी काही बिघडलं नसतं.निदान असं जिवन तरी बघायले मिळालं नसतं असं त्याले वाटायचं. आपल्याच हातानं आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचं त्याच्या लक्षात आलं.गावातलं कोणतही लेकरू त्याच्यापुढे तोंड वर करून अपशब्द बोललं नव्हतं.आता पयला गाव रायला नव्हता.

मात्र गावातली हीच लेकरं शहरांत शिक्षणाच्या नावाखाली खुलेआम व्यसनांच्या आहारी गेली होती. काही तर मायबापाच्या चोरून लग्नं करून गाव सोडून फरार झाली होती.काय जमाना आला राजेहो म्हणत थोबाडीत मारून घेतल्याशिवाय पर्याय नव्हता.आपलल्या डोयादेखत हा नंगा नाच तरी पाहाले मिळाला नसता. तरी तो एक दिवस सवडीनं नातीच्या भेटीगोठीसाठी रेल्वेनं पुण्यात गेला होता.पण पायजे तेवढा आदर काही त्याले भेटला नव्हता.सकाळी उठून तो नित्यनेमानुसार समोर असलेल्या बगीच्यात फेरफटका मारणार होताच तेवढ्यात सुन आणि पोरगा साजरे टॅरकसुट ,जोळेबिळे घालून जिन्यावरून टककटकक करत खाली उतरलं.

“आम्ही थोडं सकाळचं मॉर्निंग वॉक करून येतो.तोवर तुम्ही दार उघडं टाकून बाहेर जाऊ नका.चिऊ एकटीच झोपली आहे” असं म्हणत दार लोटून घेतलं.हे मात्र जरा त्याले जास्तच इपरीत वाटलं होतं.तडक त्यानं “गड्या आपला गाव बरा” म्हणत घरं जोळ केलं. त्याले तरी गावाकडे काय कमी होतं.गावात चार लोकाईत त्याचा आदर, मानसन्मान होता.चांगला गावभर रूबाब होता.

“ज्याईले अंगाखांद्यावर खेळवलं, त्याईची हागमूत काढली,आपलं मन मारून त्याईच्या शिक्षणासाठी घरून पैसाअडका पुरवला,घरून धान्य,दायदाणा पुरवला.गाईच दुध,तूप खोलीवर नेऊ,नेऊ खाऊ घातलं त्याईनं असं आपल्या जन्मदात्याले झिडकारावं”

“मंग तं सायाचं वाझोंटं बरं होतं.”काय कामाची सायाची अशी जनपत जी फक्त आपला आणि आपल्या चार भितीचा फक्त ईचार करते,आपण तर खटला चालवला.गडीमाणसं सांभाळलं त्याईच्याही पोराबाळांचे लग्न केले,अडीनडीले त्याईलेही पैसा अडका पुरोला.मंग तं तो घरगडी शंकऱ्या पुरला सायाचा, हर दसऱ्याला बायको लेकराले घेऊन माह्या पाया लागाले न चुकता आठोनीनं येते” याच्या साठी जिल्हा परिषदेच्या शाळेतून काढून तुले शहरात पाठवलं काय” यालेच आधुनिक शिक्षण म्हणायचं काय?

बाजीराव पाटील खिन्न मनानं दिवाणखान्यातल्या गावच्या जत्रीत काढलेल्या आपल्या कुटुंबाच्या फोटोले न्याहाळत होता,तोंड धोतराच्या सोग्यात खुपसून मोठमोठ्यानं लळत होता.दुपारचे दोन वाजले होते.दिवानखान्यात कनोडयात ठेवलेल्या मोठ्या रेडीओवर चित्रपट संगीत लागलं होतं. “कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे”

मग मात्र अधिकच हुंदका दाटून आला होता.त्याचा हुंदका जिन्याच्या पायऱ्या झाडणाऱ्या शंकऱ्याले आयकु आला होता.मालक खुप मोठ्या संकटात असल्याची चाहूल त्याले त्यानं स्वताच्या हातानं केलेल्या सयपाक पाण्यावरून पयलेच लागली होती.बाजीराव पाटील तीन पोयातली दोन चतकोरच कशीतरी पाण्याच्या घोटाबरोबर मन मारून घशाखाली घालायचा हे त्याले ठाऊक होतं पण आता काही इलाज नव्हता.

त्याचं सारं आंग थरथरत होत. बाजीराव पाटलाच्या पोराले पुण्यात टोलेजंग बंगला घेण्यासाठी पैसे पायजे होते. त्यासाठी बाजीरावनं रक्षाबंधनले त्याले बलावूनही घेतलं होतं. पण नाही!आता त्यांन ईचार बदलला होता.”मले हुंगत नाही ना भोसडीचे तं मीही त्याईच्या कणगईवर मुतणार नाही”

बाजीराव पाटलाचं पोरगं आपल्या पांढऱ्याबक कारनं रक्षाबंधनले गावाकडे गोदरीचा सारा धुळळा उडवत एकटंच आलं होतं. पायतो तं वाडयाले भलं मोठं कुलूप होतं. माडीच्या मध्यभागी वर भला मोठा बोर्ड वाड्यावर टांगलेला त्याले दिसला.त्यावर ठळक अक्षरात लिहिलेलं होतं

“वाडा इकणे आहे”

पोरांनं शेजारी,पाजारी नातेवाईकांकडे चौकशी केली.पण काही पत्ता लागला नव्हता .शेवटी आपला बाप एका तालुक्यातील वृद्धाश्रमात असल्याची माहिती त्याले भेटली होती.पण तोपर्यंत त्याले खुप उशीर झाला होता बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं.बाजीरावनं काही मांगचा पुढचा इच्यार न करता आपल्या शेतीवाडीचं,इस्टेटचं दानपत्र जमीनजुमला व वाडा इकटाक करून तो पैसाअदला जेथे दहावीस म्हातारे सुरक्षीत राहू शकतील व तेवढचं अन्नदान म्हणून दोन घास आनंदानं खाऊ शकतील.जीथे कोणाचा बोल नाही.
फक्त थोडंसं झाडलोट,फुलांना पाणी तेवढं तं आपणही आपल्या घरी करतोच,अशा सेवाभावी वृद्धाश्रम संस्थेच्या नावानं करून देल्ला होता.

कथालेखन –

विजय जय्सिंग्पुरे

विजय जयसिंगपुरे अमरावती.
भ्रमणध्वनी – ९८५०४४७६१९

● हे वाचा – सुतारपक्षास (Woodpecker) जंगलचा डॉक्टर का म्हणतात?

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now