निखील देशमुख धामणगाव रेल्वे प्रतिनिधी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी केलेल्या विहिरी, गोठे आणि इतर कुशल कामांचे देयक अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्याचबरोबर घरकुल योजनेचा दुसरा हप्ताही रखडल्याने लाभार्थ्यांची मोठी कोंडी झाली आहे. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुका युवक काँग्रेसने बुधवार, १९ ऑगस्ट रोजी पंचायत समितीवर धडक देत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विहिरी आणि गोठ्यांची कामे पूर्ण करण्यासाठी अनेकांनी कर्ज काढले, दुकानांची उधारी केली आणि पदरमोड करून कामे पूर्ण केली. मात्र कामे पूर्ण होऊन तीन ते चार वर्षांचा कालावधी उलटूनही देयके मिळालेली नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना वारंवार पंचायत समितीच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.
घरकुल लाभार्थ्यांचीही परिस्थिती वेगळी नाही. पहिला हप्ता मिळाल्यानंतर पुढील हप्ता वेळेवर मिळत नसल्याने अनेकांचे घरकुलाचे काम अर्धवट राहण्याची वेळ आली आहे. बांधकामासाठी घेतलेली उधारी फेडायची कशी, असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर उभा राहिला आहे.
युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करण्याची मागणी केली. यावेळी पंचायत समितीच्या विहिरींच्या अनुदानापोटी शासनाकडून सुमारे चार कोटी रुपये प्राप्त होणे बाकी असल्याची माहिती गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्याचे युवक काँग्रेसने सांगितले. तसेच घरकुल लाभार्थ्यांचे हप्तेही काही महिन्यांपासून रखडल्याची बाब अधिकाऱ्यांनी मान्य केल्याचा दावा करण्यात आला.
प्रलंबित निधीमुळे शेतकरी आणि घरकुल लाभार्थ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे युवक काँग्रेसने म्हटले आहे. एका महिन्याच्या आत विहिरींचे देयक आणि घरकुलाचे प्रलंबित हप्ते वितरित न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून प्रशासनाला देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस परीक्षित जगताप, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष मयूर डुबे, शहराध्यक्ष आशिष शिंदे, कॉपरेटिव्ह बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पंकज वानखडे, महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनिताताई मेश्राम यांच्यासह काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पैसे आणि घरकुल लाभार्थ्यांचा हक्काचा निधी वेळेत मिळणार का, याकडे आता धामणगाव रेल्वे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.









