महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या भेसळखोरांविरोधातील कारवाईमुळे चर्चेत आहेत. राज्यातील विविध ठिकाणी भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई होत असताना आता एका चिमुकल्याने थेट मुंढे साहेबांकडे आपल्या गावातील एका वेगळ्याच समस्येची तक्रार केली आहे. या चिमुकल्याचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये हा मुलगा तोंडाला लावल्या जाणाऱ्या मशेरी किंवा मिसरीकडे लक्ष देण्याची विनंती तुकाराम मुंढे यांना करताना दिसतो. आपल्या गावातील महिलांचा उल्लेख करत तो अगदी निरागस आणि मजेशीर पद्धतीने म्हणतो की, बायका तोंडात मिसरी भरतात आणि त्यानंतर गावभर लोकांची ‘मापं’ काढत फिरतात.
चिमुकल्याच्या बोलण्याची शैली आणि त्याचा आत्मविश्वास पाहून हा व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. namdev.patil.5015 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
व्हिडीओमध्ये तो म्हणतो, “तुकाराम मुंढे साहेब… त्या मिसरीकडे सुद्धा लक्ष द्या. अहो, बायका तोंडामध्ये बुकणा भरतात मिसरीचा आणि मग सगळ्या गावाची मापं काढत बसतात.”
मशेरी म्हणजे नेमकं काय?
गावाकडील भागात काही ठिकाणी तंबाखू भाजून तयार केलेली पावडर दात घासण्यासाठी वापरली जाते. या पदार्थाला मशेरी किंवा मिसरी असे म्हटले जाते. काही लोक आजही टूथपेस्टऐवजी अशा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात.
मात्र तंबाखूजन्य पदार्थांचा वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांचा वापर टाळणे महत्त्वाचे आहे.
‘मुंढे साहेब, मुलाची तक्रार ऐका!’
अवघ्या 30 सेकंदांच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. काही जणांनी चिमुकल्याच्या तक्रारीची गंमतीने दखल घेतली, तर काहींनी त्याच्या निरागस बोलण्याचे कौतुक केले.
“मुंढे साहेब, या मुलाच्या तक्रारीकडे लक्ष द्या,” अशा मजेशीर प्रतिक्रिया व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत. तर काहींनी ‘गावातील बायका लाटणं घेऊन मागे लागतील’, अशी मिश्कील टिप्पणीही केली आहे.
भेसळविरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर एका चिमुकल्याने थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केलेली ही मजेशीर मागणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.







