करजगावसारख्या ग्रामीण भागात १४ नोव्हेंबर १९१६ रोजी एका सधन कुटुंबात जन्मास आलेले डॉ. अमृतराव गणपतराव उपाख्य भाऊसाहेब सोनार हे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. घरात अफाट सुख-समृद्धी नांदत असतानाही भाऊसाहेब कधीही सुख-चैनीकडे झुकले नाहीत. करजगावात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी बनारस हिंदू विश्वविद्यालय (BHU) येथे रवाना झाले.भाऊसाहेब मूळचेच चळवळी स्वभावाचे असल्यामुळे बनारसचे वातावरण त्यांच्या नेतृत्वाला पोषक ठरले. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच महामना पंडित मदन मोहन मालवीय व तत्कालीन विचारवंतांशी त्यांचे घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले. त्यातून त्यांनी विद्यार्थीहिताच्या अनेक चळवळी यशस्वीपणे चालवल्या. ‘बलं प्रथमं दैवतम’ या विचारावर अढळ श्रद्धा असणाऱ्या भाऊसाहेबांनी मल्लखांब, लाठी-काठी, शारीरिक कसरती व मैदानी खेळांत प्रावीण्य मिळवून परक्या प्रांतातही अल्पावधीत मोठा नावलौकिक संपादन केला.
भाऊसाहेब अत्यंत दूरदर्शी व संघटनकौशल्यात निपुण होते. करजगाव येथे दानशूर श्री. शंकरराव बाळाजी यांनी आपल्या कन्येच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९१९ मध्ये ‘श्री शंकरराव अँग्लो-व्हर्नाक्युलर एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली होती. या शाळेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भाऊसाहेबांनी संस्थेत नवचैतन्य फुंकले. दहावीपर्यंतच्या दर्जेदार शिक्षणासाठी त्यांनी वरुडचे बुद्धदेव यावलकर (विज्ञान), भाऊसाहेब खोडसकर (भूगोल) व चुके गुरुजी (मराठी) अशा नामवंत शिक्षकांची स्वखर्चाने नियुक्ती केली. प्रसंगी ते स्वतः वर्गात जाऊन अध्यापन करत असत.
ज्याप्रमाणे श्रीकृष्णाला जन्म देवकीने दिला असला, तरी त्याचे लालन-पालन व संवर्धन यशोदेने केले; अगदी तशीच भूमिका भाऊसाहेबांनी या विद्यालयासाठी बजावली आणि अल्पावधीतच ‘शंकरराव विद्यालय’ पंचक्रोशीत अग्रस्थानी पोहोचले.भाऊसाहेबांचा आणखी एक पैलू म्हणजे ते अत्यंत मुत्सद्दी आणि खेळाडू वृत्तीचे थोर राजकारणी होते. ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले. पुढे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीस रामटेक लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. परक्या मतदारसंघातून एवढे मोठे यश संपादन करणारे ते दिल्लीच्या पटलावरील अत्यंत प्रभावी खासदार ठरले. दिल्ली दरबारी त्यांचा मोठा दबदबा होता. अनेक परदेश दौऱ्यांतून शेतीविषयक अभ्यास करून त्यांनी देशाची प्रतिष्ठा सातासमुद्रापार पोहोचवली.
दिल्लीत यशाच्या उत्तुंग शिखरावर असतानाही त्यांना करजगावच्या शाळेचा कधी विसर पडला नाही. ‘घार फिरे आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी’ अशी त्यांची अवस्था असायची. दिल्लीच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ते गावात येत, तेव्हा घरी जाण्यापूर्वी शाळेसमोर गाडी थांबवून बाहेरूनच वर्गांचे निरीक्षण करत आणि शिक्षकांना आवश्यक ते मार्गदर्शन करत.शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचवण्यासाठी त्यांनी पंचक्रोशीतील गावांचे दौरे करून धनिक लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्यांच्या या तळमळीला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि करजगावचे ‘श्यामराव सोनार कन्या विद्यालय’ तसेच शिरसगाव, कसबा, कविता, काकडा, धोतरखेडा आदी ठिकाणी उत्तमोत्तम शाळा नावारूपास आल्या. स्वतःची शेकडो एकर शेती असतानाही ते सार्वजनिक कार्यातच व्यग्र असत; त्यांच्या पत्नीने अहिल्याबाई होळकरांप्रमाणे कुशलतेने घर व शेतीचा कारभार सांभाळला.
भाऊसाहेबांच्या संदर्भातील एक बालपणीची आठवण मला आजही स्पष्ट आठवते. त्यांच्या निवासस्थानालगतच आमचा वडिलोपार्जित हॉटेलचा व्यवसाय होता. माझे वडील सकाळी चार वाजता दुकान उघडत आणि भाऊसाहेबही पहाटे चार वाजताच उठून दारातून हाक मारायचे, “बापू, चहा पाठवा!” माझे वडील तत्परतेने त्यांच्यासाठी चहा घेऊन जायचे. इतक्या मोठ्या पदावर असूनही त्यांच्यातील हा साधेपणा आणि मानवी संवेदना मी अगदी जवळून अनुभवल्या.तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याशी भाऊसाहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते.
१९६४ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते ‘श्यामराव सोनार कन्या विद्यालया’चा शिलान्यास झाला; तर नोव्हेंबर १९६८ मध्ये यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत शाळेचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. राष्ट्रीय स्तरावरील एवढ्या मोठ्या नेत्यांचे एका ग्रामीण भागात आगमन होणे हा त्या काळातील ऐतिहासिक क्षण होता.हे सर्व सुरळीत सुरू असतानाच नियतीने घाला घातला. फलटण येथे एका महत्त्वाच्या बैठकीदरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने १९ ऑगस्ट १९७२ रोजी सकाळी भाऊसाहेबांचे अकस्मात निधन झाले.
या वृत्ताने संपूर्ण करजगाव शोकसागरात बुडाले.त्यांच्या मृत्युपत्रातील इच्छेनुसार, त्यांचे अंतिम संस्कार शाळेच्या प्रांगणात करण्यात आले आणि त्यांची रक्षा शाळेच्या सर्व खोल्यांमध्ये व परिसरात अर्पण करण्यात आली. मरणोत्तरही आपले अस्तित्व शिक्षणकार्यालाच समर्पित करण्याची ही अनोखी घटना होती. त्यांच्या अंत्ययात्रेत पारंपरिक वाद्यांऐवजी ‘बलभीम व्यायामशाळे’चे कसरतपटू शिस्तबद्ध संचलन करत होते. बाल-वृद्ध, महिला व विद्यार्थी हातात फुले घेऊन अश्रूपूर्ण नयनांनी सहभागी झाले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी रघुनाथन यांनी शासनातर्फे पुष्पचक्र अर्पण केले आणि बिगूल वाजवून अखेरची मानवंदना देण्यात आली. त्यांचे सुपुत्र अविनाश यांनी मुखाग्नी दिला. त्याच क्षणी आकस्मिकपणे पावसाच्या सरी कोसळल्या; जणू निसर्गानेही या महान सुपुत्राला अश्रूरूपी आदरांजली वाहिली.
ते भावविभोर दृश्य पाहताना कविवर्य भा. रा. तांबे यांच्या खालील ओळींची प्रकर्षाने आठवण झाली —
“फूल तयांना वाहू नका हो,
जीवनभर ते फुलतच होते!
शव तयांचे जाळू नका हो,
जीवनभर ते जळतच होते!
आज त्यांचा 54 वा स्मृतिदिन असल्याने त्यांना भावपूर्ण आदरांजली……

डॉ. राजेंद्र भुयार
फ्रेंड्स कॉलनी विमवी रोड अमरावती
मो. 950304 6555…….










