मुंबई | मनोरंजन प्रतिनिधी
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट आले. मात्र, आजही त्याच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटांमध्ये ‘PK’ (पीके) अव्वल स्थानावर आहे. 19 डिसेंबर 2014 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची मनं जिंकली नाहीत, तर बॉक्स ऑफिसवरही विक्रमी कमाई करत इतिहास रचला.
प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेल्या या कॉमेडी-ड्रामा आणि सायन्स-फिक्शन चित्रपटात आमिर खानने पृथ्वीवर आलेल्या एका परग्रहवासीयाची भूमिका साकारली होती. देवाच्या शोधात असलेल्या या पात्राच्या प्रवासात पत्रकार जगत जननी (अनुष्का शर्मा) त्याची साथीदार बनते. विनोद, सामाजिक संदेश आणि भावनिक कथानकामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो.
85 कोटींचे बजेट, 792 कोटींची विक्रमी कमाई
‘PK’ हा चित्रपट सुमारे 85 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने जगभरात 792 कोटी रुपयांची कमाई केली. त्यापैकी भारतातील बॉक्स ऑफिसवरच चित्रपटाने सुमारे 340 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
यामुळे या चित्रपटाने आपल्या बजेटच्या तुलनेत तब्बल 831 टक्के नफा कमावला आणि 2014 मधील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला.
‘हॅपी न्यू इयर’लाही टाकले मागे
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांमध्ये ‘PK’ सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. दुसऱ्या क्रमांकावर शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘Happy New Year’ हा चित्रपट होता.
आजही OTT वर लोकप्रिय
‘PK’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. ज्यांनी हा चित्रपट पाहिलेला नसेल, त्यांच्यासाठी तो Netflix वर उपलब्ध आहे. धर्म, अंधश्रद्धा, श्रद्धा आणि मानवतेवर भाष्य करणारा हा चित्रपट आजही चर्चेत असतो.
आमिर खानचे आगामी प्रोजेक्ट
दरम्यान, आमिर खान सध्या ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अभिनेता सनी देओल मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.









