Thursday, May 21

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी डॉ. नंदकुमार राऊत अध्यक्ष, प्रा. दादासाहेब कोते उद्घाटक

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या साहित्य पुरस्कार सोहळ्यासाठी डॉ. नंदकुमार राऊत आणि प्रा. दादासाहेब कोते यांची निवड

गौरव प्रकाशन येवला (प्रतिनिधी ) : शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी डॉ. नंदकुमार राऊत अध्यक्ष, प्रा. दादासाहेब कोते उद्घाटक

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय पाचव्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नंदकुमार राऊत यांची, तर उद्घाटकपदी ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रा. दादासाहेब कोते यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ आणि सचिव राजेश वाघ यांनी पत्राद्वारे दिली.

येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे दि. ४ जून २०२६ रोजी हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील कवी, लेखक आणि कथाकार यांच्या उत्कृष्ट साहित्य कलाकृतींना देण्यात येणारे पुरस्कार यापूर्वी १ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आले होते. निवड झालेल्या साहित्यिकांचा गौरव या विशेष सोहळ्यात करण्यात येणार आहे.

सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले डॉ. नंदकुमार राऊत हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून निवड होऊन सध्या मुंबई येथील मंत्रालयात अवर सचिव पदावर कार्यरत आहेत. सामाजिक, मानवतावादी आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना कॅलिफोर्निया रिपब्लिक विद्यापीठाकडून डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली आहे. २०२५ मध्ये ठाणे येथे झालेल्या मराठी साहित्य मंडळाच्या संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2026 जाहीर

डॉ. राऊत यांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये प्रबोधनपर व्याख्याने दिली असून त्यांचे ‘दौशाड’ हे आत्मचरित्र संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे. ‘दौशाड’ आणि ‘केंजाळ’ ही त्यांची साहित्य संपदा विशेष गाजली आहे.

उद्घाटक म्हणून निवड झालेले प्रा. दादासाहेब कोते यांचीही साहित्य क्षेत्रातील कारकीर्द उल्लेखनीय आहे. ‘चंद्रगाणी’, ‘फुला-मुलांच्या कविता’ तसेच ‘मॉडर्न मराठी पोएट्री’ खंड ६ मध्ये त्यांच्या कवितेचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाला आहे. बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकात ‘फुलपाखरू’ कविता, तर इयत्ता तिसरीच्या सुलभभारती पाठ्यपुस्तकात ‘झोका’ या कवितेचा समावेश करण्यात आला आहे.

प्रा. कोते यांचे आकाशवाणी अहिल्यानगर आणि आकाशवाणी पुणे केंद्रावर अनेकवेळा कवितावाचन व बालकथावाचन झाले असून साहित्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

डॉ. नंदकुमार राऊत आणि प्रा. दादासाहेब कोते यांच्या निवडीबद्दल साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.