मुंबई : सोशल मीडियावर काही सेकंदांत प्रसिद्धी मिळवण्यासाठी रील बनवण्याची क्रेझ सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, हीच हौस एसटी महामंडळातील तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना चांगलीच महागात पडली आहे. कर्तव्यावर असताना आणि एसटीच्या आवारात रील तयार केल्याप्रकरणी पनवेल आगारातील एका महिला वाहकासह तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पनवेल आगारातील महिला वाहक नंदा कोळी यांनी एसटीच्या गणवेशात नियंत्रण कक्षात रील तयार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या रीलमध्ये पनवेल आगारातील वाहतूक नियंत्रक विजय माने आणि सुनील देशमुख हेही सहभागी झाल्याचे दिसून आले.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका वाहतूक नियंत्रकाकडून महिला कर्मचाऱ्याला गुलाबाचे फूल देतानाचे दृश्य दिसत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला असून, फेसबुकवर त्याला लाखो व्ह्यूज मिळाल्याचे समोर आले. व्हिडीओची पडताळणी केल्यानंतर मुंबई विभागाकडून संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
एसटीच्या आवारात रीलला बंदी
एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. एसटी बस चालवताना किंवा कर्तव्यावर असताना रील, व्हिडीओ, लाइव्ह स्ट्रीमिंग, युट्यूब शॉर्ट्स किंवा सोशल मीडिया कंटेंट तयार केल्यास कारवाई केली जाणार आहे.
आगार, बसस्थानक, कार्यालय किंवा एसटी बसमध्ये महामंडळाचा गणवेश परिधान करून कोणत्याही प्रकारचे सोशल मीडिया व्हिडीओ तयार करण्यासही मनाई करण्यात आली आहे. महामंडळाची प्रतिमा खराब होईल किंवा प्रवाशांमध्ये नकारात्मक संदेश जाईल, अशा आशयाचे व्हिडीओ प्रसारित करण्यावरही निर्बंध आहेत.
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करण्याचे लेखी निर्देश दिले आहेत.
अधिकृत परवानगीशिवाय रील केल्यास कारवाई
एसटीच्या प्रवासी सुविधा, विविध योजना, स्वच्छता मोहिमा किंवा महामंडळाच्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी कर्मचाऱ्यांना व्हिडीओ तयार करायचा असल्यास संबंधित प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी न घेता सोशल मीडिया कंटेंट तयार केल्यास शिस्तभंगाच्या नियमांनुसार कारवाई केली जाऊ शकते.
धावत्या लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणावरही कारवाई
दरम्यान, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रयत्नात धावत्या लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या एका तरुणावरही रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली आहे.
मोहम्मद कुरेशी (२२) याने कळवा रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या लोकलच्या दरवाजात उभे राहून स्टंट केल्याचा व्हिडीओ तयार केला आणि तो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. लाइक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी हा प्रकार केल्याचे चौकशीत समोर आले.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरपीएफने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तरुणाचा शोध घेतला. त्याला कळवा पूर्व परिसरातून ताब्यात घेण्यात आले. मित्राच्या मदतीने व्हिडीओ शूट करून इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याची माहिती त्याने चौकशीदरम्यान दिली.
या प्रकरणी त्याला नोटीस बजावण्यात आली आणि कल्याण रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली.
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात नियम आणि सुरक्षेचे उल्लंघन केल्यास त्याची किंमत मोजावी लागू शकते, हे या दोन्ही घटनांमधून पुन्हा स्पष्ट झाले आहे.








