आमच्या लहानपणी गावात बहुरूपी यायचा. तो आमची शाळा बस स्टॅण्ड जवळच असल्याने एसटीतून मोठी पेटी डोक्यावर घेऊन उतरला म्हणजे दिसायचा. तो दिसला म्हणजे कधी शाळेला सुट्टी भेटते याची मनाला तळमळ लागलेली असायची. आमच्या एटायातील किसना बुढयाच्या घरी तो बहुधा उतरायचा. वर्षातून त्याचा एकदा ठरलेला कार्यक्रम असायचा. मधात तो कधीच यायचा नाही व कधी दिसायचा पण नाही. त्याच्याकडे वेगवेगळे मुखवटे व निरनिराळे पोशाख ठेवण्यासाठी मोठी पेटी ट्रंक असायची. तो ती पेटी ज्या घरी मुक्कामाला उतरला तेथे ती ठेवून आजूबाजूच्या परिसरात डफावर थाप मारत गाणी म्हणून आपली कला दाखवून पोट भरायचा.
सगळा गाव पालथा घालून बदल्यात त्याला धान्य,पैसा म्हणजे रूपया दोन रूपये मोठ्या मुश्किलने भेटायचा पण उपाशी रहायचा नाही. तो आला म्हणजे आम्ही त्याच्या बिना आंगोळीचे वंगयले वांगयले हातापायावर सारे कुत्रे मुतलेले तसंच उपाशी तापाशी त्याच्या मागंमागं फिरत रहायचो. मग जेवणाची सुद्धा चिंता नसायची.घरचं कोणी येऊन साजरा पाठीवर ओल्या धा़ंडयाचा रट्टा लावून ओढून ताणून घरी घेऊन जायचं.लळू लळू लायशेंबूड एक होऊन जायचा.
मले आठवते लहानपणी आमच्या दारी भलं मोठं अस्वल घेऊन दरवेशी आला. त्याच्या नाकात दोरा ओवलेला होता. ते अस्वल तो प्रत्येकाच्या अंगणात उभं करायचा.आई मला बसायचा आग्रह करायची. असल्याच्या पाठीवर लहान लेकरू बसलं म्हणजे ते भेदारत नाही त्याले बाहेरचा भेवभाना बाधत नाही अशी तीची समजूत होती. माझ्या हातात ती गावात आरशा डाबल्यावाला आला म्हणजे काळा धागा विकत घेऊन आवर्जून बांधायची.
अस्वलाचं केसं मनगटीत बांधयला लावायची. म्हणजे मी भितीनं नाही नाही म्हणत असलो तरी तो जबरदस्तीने उचलून पाठीवर बसवायचा. बापरे किती भिती वाटायची. चार घरापासून फिरवून आणायचा. आई त्याले पोत्यातलं पायली भर धान्य द्यायची कधी दवडीतली भाजीभाकरी चटणी भाकरी वेळेवर जे असेल ते द्यायची. तो ओट्यावर बसून मोठ्या प्रेमानं खायचा व अंगणातल्या राजनातलं तवलीभर थंडगार पाणी पिऊन निघून जायचा. त्यांच्या विषयी भिती तर वाटायची पण या गावकलाकारांविषयी मनात एक आपुलकी पण होती.
बहुरुपी ही महाराष्ट्रातील लोककलांकारांपैकी एक जमात. पूर्वीच्या काळी जेव्हा गांव-वस्त्यांवर टिव्ही नसायचा. कामधंदा करून थकलेल्या लोकांना करमणुकीचे साधने मर्यादित होते, तेव्हा हे कलाकार कुणाची तरी हुबेहूब नक्कल करून मनोरंजन करून लोकांना हसवत असायचे.लोकांचे बालगोपालांचे निखळ मनोरंजन करायचे. त्यांची अपेक्षा पैसा कमवून श्रीमंत होण्यासाठी नव्हती तर फक्त पोट भरणे एवढीच असायची. बिच्यारा घरपरिवार वाऱ्यावर सोडून पोटासाठी लोकांचे मनोरंजन करायचा. विविध रूपे किंवा सोंगे धारण करून लोकांचे मनमुराद मनोरंजन करणारी महाराष्ट्रातील एक पारंपरिक लोककलाकार जमात म्हणजे बहुरूपी होय. हे कलाकार विविध वेशभूषा करून गावात यायचे.आणि लोकांना हसवायचे.किंवा आपल्या कलेतून समाजप्रबोधन करायचे.
बहुरूपी कलेची वैशिष्ट्ये म्हणजे सोंगे आणि वेषांतर करून तर कधी राम, लक्ष्मण,हनुमान, पोलीस,साधू किंवा ग्रामीण स्त्री अशी निरनिराळी रूपे धारण करायचा.मनोरंजनातून लोकांना थक्क करून सोडायचा. त्या बदल्यात अन्न किंवा पैसे मिळवणे हा त्यांचा मूळ उद्देश असायचा.अभिनय कौशल्याने संवादांशिवाय केवळ देहबोली आणि अचूक वेशभूषेमुळे तो सोंग धारण करायचा. हे बहुरूपी प्रामुख्याने फौजदार, हनुमान, शंकर यांचे वेश धारण करून गावभर फिरायचे.
आमच्या गावात मारवाडयाच्या दुकानापाशी रामलीला आली होती.तिंन चार दिवस मस्त मज्जा आली. रात्रीची जेवणं उरकली म्हणजे बाया माणसं अंगावर थंडी वाजू नये म्हणून सातऱ्या गोधड्या घेऊन ऐकायला जमायचे. स्टेजवर एकजण पडदा ओढायचा. खुप उत्सुकता रहायची.एकदा तर हनुमानाच्या लंकादहनावेळी खरोखरच हनुमानाचे शेपूट पेटून ते जरा जास्तच पेटल्यावर हनुमान जीवाच्या आकांताने स्टेजवरून उडी टाकून नळावर पळाला होता.
पोट धरून हासता हासता वाट लागायची. परंतु आता चित्रपट गृह आणि करमणुकीची साधने वाढल्याने आणि नवीन पिढीला या गोष्टीची माहिती नसल्याने, व उत्सुकता न राहिल्याने हळूहळू ही कला लोप पावू लागली. या लोकांवर उपसमारीची वेळ आल्याने बहुतेकवेळी मी यांना शहरामधे आपली कला दाखवताना पाहिले आहे, मुख्यत्वे करून हे पोलिसाच्या वेषात येतात, यामुळे यांना फसवेगीरी किंवा भामटे समजुन कधीकधी लोकांच्या रोशाला समोरे जावे लागते.चोर समजून कधी मारपण खाल्ल्याच्या घटना घडतांना दिसतात.हे बहुरूपी वा कलावंत एकाजागी स्थिर न राहता सतत भटकत राहणारे काही भटके कलावंत आणि भिक्षेकरी महाराष्ट्रात पिढ्यान् पिढ्या राहत आले आहेत. त्यांपैकी काही असे आहेत.
(१) उदासी – या पंथाचे लोक भिक्षेवर जगतात.
(२) कडकलक्ष्मी -पाठीवर दोर मारणारे
(३) काथोडी – आदिवासींमधील एक जमात
(४) कानफाटे – हे नाथपंथीय असतात.
(५) कुडमुडे जोशी – गळ्यात उपरणे घालून डोईस रुमाल बांधून, कपाळाला गंध लावलेले हे स्वच्छ कपड्यातले भिक्षेकरी वर्षभविष्य सांगत गावोगाव फिरतात.
(६) कुर्मुडा – हे भिक्षेकरी पहाटे भिक्षा मागायचे, गाणी गायचे, भविष्यवाणी करायचे. हे भिक्षा स्त्रीच्या हातूनच घेत असत. भिक्षा म्हणून ज्वारी, तुरीची डाळ, किंवा १-२ रुपये घेत. त्यांच्या हातात एक काठी, डमरू, खंद्यावर घोंगडी व तोंडात सुमधूर गाणी असायची.
(७) कैकाडी – बुरुडांप्रमाणेच हे टोपल्या बनवतात. पण त्यासाठी करंज्याच्या बारीक फांद्या किंवा तरवड्याच्या ओल्या फांद्या वापरतात. घायपातापासून दोर बमवून विकतात.
(८) कोल्हाटी – रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारी माणसे.
(९) गारुडी – हे साप, अजगर आणि नाग पकडतात आणि त्यांचे गावोगाव खेळ दाखवतात.
(१०) गोंधळी – हे बिनबोलावता येत नाहीत. अनेकजण घरात लग्नमुंजीसारखा मंगल प्रसंग होऊन गेल्यावर यांना देवीच्या गोंधळाच्या कार्यक्रमासाठी घरी बोलावले जाते.
(११) गोसावी – या पंथातले लोक दानधर्मावर जगतात. यांना स्वतःचा खास असा काही व्यवसाय नसतो. उत्तरी भारतात यांचे मठ आणि आखाडे असतात. कुंभमेळ्याला यांची हमखास हजेरी असते.
(१२) जोगतिणी/जोगी – या यल्लम्मा देवीला वाहिलेल्या स्त्रिया डोक्यावर देवघरात ठेवलेली देवीची मूर्ती किंवा छायाचित्र घेऊन गावोगाव आणि रस्तोरस्ती फिरत फिरत दान मागताना दिसतात.
(१३) जोगी-
(१४) डवऱ्या गोसावी जे गल्लोगल्ली काखेत झोळी घेऊन फिरतात.
(१५) डोंबारी – कोल्हाट्याप्रमाणे रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारी माणसे. कोल्हाट्यांनाच प्रामुख्याने कर्नाटकात डोंबारी म्हणतात.
(१६) तेलंगी ब्राम्हण – हे ब्राह्मण घरोघर हिंडून घनपाठ, जटापाठ आदी स्वरूपातले वेद म्हणतात, भविष्य सांगतात आणि त्याप्रीत्यर्थ मिळालेले दान स्वीकारतात.
(१७) दरवेशी – गावोगावी जाऊन अस्वलाचे खेळ करणारा. हे अस्वलाला नाचवतात, त्याच्याशी कुस्ती खेळतात आणि त्याचे केस मुलांच्या गळ्यातल्या ताइतासाठी आयाबायांना विकतात.
(१८) नंदीबैलवाला- नंदीबैल घेऊन घरोघरी खेळ दाखवतो.
(१९) पांगुळ – स्वतःला सूर्याचा पांगळा सारथी अरुण याचे वंशज मानण्याऱ्या भिकाऱ्यांची एक जात.
२०) फकीर – हातात मोरपंख घेऊन व कठोरा घेऊन मुसलमान भटके भिक्षेकरी.होत.
(२१) फासेपारधी – डुकरे, ससे, हरणे, पाखरे असे शेतीला त्रासदायक असणारे पशुपक्षी, हे फासे लावून पकडतात.
(२२) बहुरूपी – बहुरूपी रोज एक सोंग घेऊन गावात येतो. कधी पोलीस, कधी इंग्लिशमॅन तर कधी जख्ख म्हातारा. गर्भार बाईचे सोंग देखील आणणारे हे भटके भिक्षेकरी आपल्या कलेवर पोट भरतांना दिसतात.
(२३) बाळसंतोषी – मयूरपिच्छांनी मढलेले असतात.
(२४) बुरुड -बांबूच्या टोपल्या विणणारी माणसे. हे फक्त बांबूकाम आणि वेतकाम करतात. बांबू किंवा वेत वाकवून त्याच्या पातळ पट्ट्या किंवा कामट्या करून हे वस्तू बनवतात. बांबूच्या टोपल्या, दुरड्या, बुरकुल्या, शेल्फ व उदबत्तीच्या काड्या, आणि वेताच्या खुर्च्या बनवणारे बव्हंशी बुरूडच असतात. प्रत्येक शहरात एखादी बुरूडआळी असते, तिथे यांची वस्ती असते. एरवी हे गावागावातून भटकत आपला व्यवसाय करतांना दिसतात.
(२५) बैरागी :-तोंडाला राख फासलेली हातात कमंडलू घेऊन भिक्षा मागणारे लोकं.
(२६) भराडी- हातात किंगरी नावाचं वाद्य घेऊन खंजेरी किंवा डफळीवर गाणे म्हणणारी जमात.
(२७) भुत्या -देवीचे हे भक्त गावोगाव फिरत दान मिळवतात.
मांगगारुडी -हे म्हशी भादरायचे काम करतात.
(२८) रामदासी-ही माणसे गावोगाव आणि शहरातील घरोघरी फिरून रामदासांच्या काव्यरचना ऐकवून दान मिळवतात. यांचे मुख्यालय सज्जनगडावर आहे.
(२९) लमाण – बैलावरून सामानाची वाहतूक करणारी भटकी जमात.
(३०) वंजारी – लमाणांसारखेच काम करणारी माणसे.
(३१) वडारी -गाढवावरून, माती, विटा आदींची वाहतूक करणारे आणि बाधकामात मजुरी करणारे.गावोगाव एखादी वडारवाडी असते.
(३२) वाघ्या-मुरळी – हे जेजुरीच्या खंडोबाचे भक्त गावोगाव फिरून खेडुतांच्या कपाळाला भंडारा फासतात, त्यांना जेजुरीच्या खंडोबाची आण घालतात, आणि खंडोबाची गाणी म्हणत भिक्षा मागतात.
(३३) वासुदेव – अगदी पहाटे पहाटे कृष्णभक्तीची गाणी ऐकवून लोकांना झोपेतून उठवणारा गुणवान भिक्षेकरी.
(३४) वैदू – कंदमुळे आणि झाडपाल्याची औषधे विकणारे भटके वैद्य आता काळ बदलल्याने आधुनिक काळात शेवटच्या घटका मोजतांना दिसत आहेत.ही साधी भोळी व पैशा अदल्यानं गरीब जमात असली तरी समाजाचं प्रबोधन व निखळ मनोरंजन करणारी व आपली सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी धडपडणारी खरीखुरी हाडाची लोककलावंत म्हणायला काहीच हरकत नाही याचं निस्वार्थी लोकांनी आपल्या कलेशी एकनिष्ठ राहून लोकसंस्कृती जिवंत ठेवण्यासाठी आपल्या कलेचं पारंपरिक सचित्र दर्शन तळागाळातील समाजापर्यंत पोहोचविण्याचं महत्वाचं काम केलं.
विजय जयसिंगपुरे, अमरावती.
भ्रमणध्वनी- ९८५०४४७६१९










