अमरावती
सोशल मीडियावर ‘गाऊन वाली बाई’ म्हणून लोकप्रिय असलेली अमरावतीची रश्मी सोनोने हिने आता छोट्या पडद्यावरही आपल्या कलेची छाप उमटवली आहे. लोकप्रिय कार्यक्रम ‘तुम हो ना’ च्या मंचावर तिच्या भावनिक आणि हृदयस्पर्शी सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांसह परीक्षकांचीही मने जिंकली.
रश्मीच्या अभिनयात भावना, जिवंतपणा आणि वास्तवतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. तिच्या सादरीकरणादरम्यान अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर परीक्षकांनीही तिच्या कलेचे मुक्तकंठाने कौतुक केले. तिच्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनाला स्पर्श केल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे.
या कार्यक्रमातील रश्मीचा परफॉर्मन्स सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, हजारो नेटकरी तिचे कौतुक करत आहेत. अमरावतीच्या या कन्येने आपल्या मेहनतीच्या आणि कलेच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रश्मीच्या यशामुळे अमरावती शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या शहरातील एका मुलीने राष्ट्रीय मंचावर मिळवलेले हे यश प्रत्येक अमरावतीकरासाठी अभिमानाचा क्षण ठरत आहे.
रश्मी सोनोनेची ही यशोगाथा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून, जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, हे तिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.











