मुंबई | प्रतिनिधी :
‘सैराट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे अभिनेता अरबाज शेख यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील अस्लम शेख यांचे गुरुवारी ब्रेन हॅमरेजनंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या महिनाभरापासून सोलापूरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्रकृती सुधारू शकली नाही.
काही आठवड्यांपूर्वी अरबाज शेख यांनी सोशल मीडियावर एक भावूक व्हिडिओ शेअर करून वडिलांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. या व्हिडिओमुळे राज्यभरातून अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. त्याचवेळी उपचारादरम्यान आलेल्या अडचणींचाही त्यांनी उल्लेख केला होता.
या प्रकरणाची चर्चा राज्यभर झाल्यानंतर संबंधित यंत्रणांनीही दखल घेतली होती. काही ठिकाणी चौकशी व कारवाई करण्यात आली. तसेच विविध स्तरांवरून उपचारासाठी सहकार्याचे आश्वासन देण्यात आले होते. अनेक सामाजिक संस्था आणि नागरिकांनीही शेख कुटुंबाला मदतीचा आधार दिला.
वडिलांना वाचवण्यासाठी अरबाज शेख यांनी शेवटपर्यंत अथक प्रयत्न केले. आर्थिक मदत, उपचार आणि आवश्यक व्यवस्था यासाठी त्यांनी सातत्याने धावपळ केली. मात्र अखेर अस्लम शेख यांची जीवनाशी सुरू असलेली झुंज संपली.
अस्लम शेख यांच्या निधनामुळे शेख कुटुंबावर शोककळा पसरली असून, सोशल मीडियावर चाहते, कलाकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अनेकांनी अरबाज शेख आणि त्यांच्या कुटुंबाला धीर देणारे संदेशही पोस्ट केले आहेत.
आधी आई गमावली, आता वडिलांचेही निधन; ‘तारक मेहता’च्या बाघावर दुःखाचा डोंगर कोसळला









