जळगाव | प्रतिनिधी
भुसावळ शहरातील कालिका माता मंदिराचे पुजारी संतोष रघुवीर मंचाल (वय 55) यांच्या हत्येचा उलगडा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत केला आहे. या प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, रेल्वेचे लोखंडी भंगार चोरी करताना झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे तपासात समोर आले आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये हर्षल राजू वर्मा (19), क्षितिज संजय भालेराव (19) आणि प्रफुल उत्तम जाधव (21) यांचा समावेश आहे.
रेल्वे मार्गालगत सापडला मृतदेह
28 जूनच्या रात्री भुसावळ शहराजवळील रेल्वे मार्गालगतच्या दुर्गम परिसरात संतोष मंचाल यांचा मृतदेह आढळून आला होता. जबर मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
शवविच्छेदन अहवाल ठरला महत्त्वाचा
शवविच्छेदन अहवालात जबडा आणि बरगड्यांवर गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. कोणतेही हत्यार वापरले नसल्याने आरोपी शारीरिकदृष्ट्या मजबूत किंवा बॉक्सर असू शकतो, असा पोलिसांचा अंदाज होता.
हळदी समारंभातील व्हिडिओने दिला धागा
तपासादरम्यान पोलिसांना एका हळदी समारंभातील मारहाणीचा व्हिडिओ मिळाला. त्यामध्ये हर्षल वर्मा एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत होता. तो परिसरात बॉक्सर म्हणून ओळखला जात असल्याची माहितीही समोर आली. यानंतर पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले.
चौकशीत कबुली
सुरुवातीला आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कसून चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
भंगार चोरीच्या वादातून हत्या
आरोपी रेल्वेचे लोखंडी भंगार चोरी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पुजारी संतोष मंचाल तेथे पोहोचल्याने दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी संतोष मंचाल यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात कोणतेही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा ठोस तांत्रिक पुरावे नसतानाही शवविच्छेदन अहवाल, गुप्त माहिती आणि हळदी समारंभातील व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 24 तासांत गुन्ह्याचा छडा लावला.










