पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि सात जन्मी हाच पती मिळावा, यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाच्या झाडाचे पूजन आजवर करत आल्या आहेत. वडाच्या झाडाला मनःपूर्वक प्रदक्षिणा मारणे, सूताचे सात वेढे त्या झाडाला देणे, पिकलेले आंबे व पानांचा विडा वगैरे साहित्य ठेवून महिला मनातील संकल्प मांडतानाचे चित्र आजवर दिसत होते. परंतु, नारीकल्याण करणाऱ्या काही निवडक संघटनांच्या नुकत्याच जारी झालेल्या अहवालानुसार हे चित्र थोडे धक्कादायक आहे.हल्ली स्त्रिया आधुनिक झाल्या आहेत.त्याचप्रमाणे घरात दिवसभर जीन्स-पँट आणि तोकडे टॉप घालण्याची सवय असल्याने, पूजेसाठी साडी (पातळ) परिधान करणे, नाकात नथ व इतर स्त्रीसुलभ दागिने चढवणे आणि त्या पेहरावात वावरणे यात अनेक अडचणी उद्भवतात, असे अनेकांचे निरीक्षण आहे.
त्यामुळे ‘चांगला नवरा जन्मोजन्मी मिळावा’ यासाठीचा आग्रह अनेक आधुनिक महिलांनी बाजूला ठेवल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.याला दुसरी अडचण अशी आहे की, स्त्रिया आता समजदार आणि व्यवहारी झाल्या आहेत. ‘सत्यवान आणि सावित्री’ या पौराणिक कथेवरील त्यांचा विश्वास ढळू लागला आहे. काळाच्या ओघात जनजीवन आणि माणसांमध्ये अमूलाग्र बदल घडत आहेत. सत्यवान आणि सावित्री यांचे परस्परांतील स्नेहबंध, जे पुराणात अधोरेखित केले आहेत, आणि सावित्री यमराजाकडे सत्यवानाच्या जीवदानासाठी जी करुणा भाकते, ही कथा आजच्या आधुनिक युगात कुठेच सुसंगत वाटत नाही. या कथेतील खरे-खोटेपणावर भाष्य करण्याचा आमचा मुळीच हेतू नाही.
खरं तर असे आहे की, हल्लीच्या पती-पत्नीच्या नात्यांमध्ये अनेक कारणांमुळे दिवसेंदिवस ताणतणाव आणि बेबनाव वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ‘कसेही करून सात जन्म हाच पती मिळावा’ अशी आग्रही भूमिका घेणारी स्त्री आज अभावानेच सापडेल, अशी माझी धारणा आहे. याची दुसरी बाजू अशी की, हीच पत्नी सात जन्म टिकून राहावी, यासाठी पुरुष मंडळी तरी आग्रही राहतील का? याबाबत शंकाच आहे. एकाच जन्मात दोघांनाही एकमेकांचे पराकोटीचे कटू अनुभव येत असल्याचे सामाजिक चित्र आहे. म्हणून ‘आता पुढे आणखी या विषाची परीक्षा नको’ असे दोघांनाही वाटणे अगदी स्वाभाविक आहे.
क्रिकेटमध्ये पूर्वी टेस्ट मॅच असायची, नंतर वन-डे मॅचचे चलन आले आणि आता ‘ट्वेन्टी-ट्वेन्टी’ असा आटोपशीर बदल झाला आहे. आता काही दिवसांनी ‘दहा-दहा’ ओव्हर्सच्या मॅचचे चलन आल्यास नवल वाटू नये. काळाच्या ओघात स्थित्यंतरे होतच असतात आणि बदल हा नेहमीच चांगला असतो; या न्यायाने या सर्व गोष्टींचे स्वागतच करायला हवे. जागतिक स्तरावर दिवसेंदिवस लक्षणीय बदल होत आहेत आणि काही बाबींमध्ये आपण भारतीय फार पुढे गेलो आहोत. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ आणि ‘कॉन्ट्रॅक्ट मॅरेज’ या संकल्पना आजवर परदेशात पाहायला मिळत असत, आता आपल्या देशातही या बाबींचे संक्रमण झपाट्याने होत आहे. परिस्थितीनुसार असा बदल होणे गैर नाही. त्यामुळे वटसावित्री पूजनासाठी महिलांच्या संख्येत घट झाल्यास नवल ते काय?
तरीही, वरील बाबींमध्ये तथ्य असो वा नसो, या चिकित्सेत लक्ष न घालता श्रद्धा असणाऱ्या देवभोळ्या महिलांची संख्या आजही कमी नाही. अशा वेळेस काही महिला पारंपरिक पद्धतीने अत्यंत श्रद्धेने वटसावित्रीचे पूजन करतात, काही महिला केवळ एक उपचार (प्रथा) म्हणून हा इव्हेंट साजरा करतात, तर काही महिला तटस्थपणे फायदा-तोट्याचा विचार न करता आपले कर्तव्य करत असतात. मात्र, या तिन्ही संवर्गांतील महिलांचा केंद्रबिंदू एकच असतो, तो म्हणजे त्यांच्या मनातील कुटुंबाप्रती असलेले ममत्व !कुटुंबाच्या उत्कर्षासाठी महिलांचे जे योगदान असते, त्याला जगात तोड नाही. सर्व काही देवाच्या भरोशावर सोडून त्या मायमाऊल्या उपवास आणि व्रतवैकल्ये करतात. नवरा व संपूर्ण कुटुंबासाठी त्या प्रामाणिकपणे अहोरात्र देवाचे नामस्मरण करतात. गावाजवळील शेतात जाऊन भल्या मोठ्या वटवृक्षाची मनोभावे पूजा करतात. सोबत त्यांच्या आवडीच्या सख्या असतात. त्यांच्यातील हा आनंद आणि समर्पण पाहून मन थक्क होते.
शहरांमध्ये जिथे वडाचे झाड उपलब्ध नाही, तिथे काही महिला कुंडीतील वटवृक्षाच्या ‘बोन्साय’चे पूजन करताना दिसतात. काही ठिकाणी नर्सरीमधून वडाचे ताजे रोपटे आणून वटवृक्ष पूजनाची प्रतिकात्मक इच्छा पूर्ण केली जाते. मेट्रो शहरात जिथे बहुमजली इमारती आणि फ्लॅट संस्कृती आहे, तिथे वडाची फांदी गॅलरीत बांधून २५ व्या मजल्यावरही पूजेचा आनंद पदरात पाडून घेतला जातो. काही शहरांत वटसावित्रीच्या दिवशी बाजारात वडाच्या फांद्या विकायला असतात आणि श्रद्धाळू महिला त्या फांद्या विकत घेऊन आपले व्रत पूर्ण करतात. अशा वेळेस महिलांच्या मनात एक विचार नक्कीच येतो की, वडाच्या लहान फांदीला प्रदक्षिणा कशी घालावी? तेव्हा काही महिला स्वतःभोवतीच सात वेळा प्रदक्षिणा घालतात, असे माझे निरीक्षण आहे. मात्र, ‘बोन्साय’ झाडाचे किंवा नुसत्या लहान फांदीचे पूजन केल्यास अपेक्षित फलप्राप्ती होणार नाही, असा किंतु महिलांनी मनात आणू नये. कारण श्रद्धेला मोल नसते.
”मानो तो मैं गंगा माँ हूँ,
न मानो तो बहता पानी…”
पौराणिक काळापासून सुरू असलेल्या या व्रताबाबत मला मात्र थोडा पक्षपातीपणा दिसून येतो. पुरुषांसाठीसुद्धा असेच एखादे व्रत असावे, असे अनेक पुरुषांच्या मनात असू शकते; कारण ‘हीच पत्नी आपणास सात जन्म मिळावी’ अशी इच्छा असलेल्या पुरुषांची संख्याही कमी नाही. हवे तर या व्रतला आम्र सत्यवान व्रत असे संबोधवे त्यात पुरुषांनी आम्रवृक्षाचे पूजन करावे. त्यानुरूप यथासंग पूजा अर्चा करावी.
जेवढे जन्म हीच पत्नी हवी आहे, तेवढ्या फेऱ्या पुरुषाने आंब्याच्या झाडाला माराव्यात. असे झाल्यास समस्त महिलांच्या उत्थानाकरिता हे एक क्रांतिकारी पाऊल उचलल्यासारखे होईल. असे जर शासन स्तरावरही यात काही करता आले,आणि तशी अधिसूचना निघाली तर महिलांच्या आनंदाला पारावार राहणार नाही. मात्र, आपले ‘पतिराज’ हे व्रत किती निष्ठेने पार पाडतात, यावर प्रत्येक महिलेचा बारीक कटाक्ष राहील.
त्यातूनच पतिराजांना आपल्याविषयी खरोखरच किती प्रेम आहे, हे महिलांना जाणून घेण्याची एक उत्तम संधी मिळेल!अशा या नव्या उपलब्धतेमुळे महिलांच्या मानसिकतेतही अमूलाग्र बदल होऊ शकतो. नवऱ्याविषयीचा पूर्वापार चालत आलेला पूर्वग्रह दूर होऊन कृतज्ञतेचे नवे तरंग त्यांच्या मनात उठू लागतील आणि त्या आपली कृतज्ञता खालील शब्दात व्यक्त करायला लागतील.
”सतत आपण त्याच्याशी भांडतो,
गरजेच्या वेळी मात्र तोच पाठीशी उभा असतो.
सगळं जग पाहिल्यावर कळतं
त्याच्याशिवाय आपलं दुसरं कोणी नसत. “

- डॉ. राजेंद्र भुयार,
फ्रेंड्स कॉलनी, विमवी रोड, अमरावती.
मोबाईल नं. 9503046555












