गावाकडे तेव्हा…!
मोट गेली, नाडा गेला,
गेला सौंदर कणा
सहा बैल, नांगर आता,
दिसेल का हो पुन्हा…?
शिवळ गेली जू गेला
गेली धुरी गाडीची
चाडं गेलं रुमणं गेलं
रोटा आला तिथं अन्
मजाच गेली पिकाची
हेल गेला, कासरा गेला,
गेली शर्यत बैल गाडीची.
मोगरी गेली, हातणी गेली,
गेली मळणी धान्याची.
वावडी गेली, उफननी गेली,
गेली धार धान्याची.
भुसारा गेला, कलवड गेला,
गेली इर्जिक नांगराची
वाडगं गेलं, खळं गेलं,
गेली शान झापाची.
सावड गेली, बलुतं गेलं,
गेली राखुळी गुरांची.
हौद गेला, सारन गेली,
गेली बारव जुनी
वढवान गेलं, रहाट गेलं
शेंदू कसं पाणी ?
मेड गेली, कुड गेला
गेला वासा आढं
कुळव गेला, डुब्बं गेलं
फराड गेलं पुढं
खुरवत गेला, खळं गेलं
चंद्राचं ते तळं गेलं
हरणाची गाडी गेली
मामाची पण माडी गेली
हेल गेला, गंज गेली
करडईचा फड गेला
अंगणात लावलेला
भला मोठा वड गेला
वडाभोवतीचा कट्टाही गेला
बोरं गेली, जांभळं गेली
गेला रानमेवा
खंबीर होती जूनी पिढी
गावाकडे तेव्हा…!
आता कुठं शोधायच्या
गावाकडच्या वाटा
प्रगतीच्या नावाखाली
मोजू कसा किती तोटा…?
सांग मित्रा, कधी आता
गावाकडे जायचं
गावचं होऊन रहायचं
ताटलीत दुध भाकर
चुरून मुरून खायचं
– संकलन
(टीप : यातले कितीतरी शब्द आपल्यालाही भविष्यात आठवणारसुद्धा नाहीत. कदाचित यातील कित्येक शब्द पुढील पिढीला कळणार देखील नाहीत.पण हा अनमोल गावरान मराठी शब्द ठेवा आपण सर्वांनी जतन करायलाच हवा.)