संवेदनशील स्री मनाच्या तरंग लहरी – मन आभाळ आभाळ
पुण्याच्या कवयित्री वंदना इन्नाणी यांचा “मन आभाळ आभाळ” हा कवितासंग्रह वाचनात आला. या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर असलेले कलात्मक चित्र मनाला विचार करायला लावणारे दिसून आले. या मुखपृष्ठावर एक स्रीचा हात दाखवला आहे, या हातात पांढरशुभ्र ढगाचा पुंजका वर उचलून धरला आहे तर या ढगातून पाण्याचे आसवे गळत असल्याचा भास होत आहे आणि या कलाकृतीचे शीर्षक पावसाच्या धारांसारखे ओघळते दाखवले आहे. अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण अशा मुखपृष्ठावर कवयित्रीच्या भावभावनांचा कल्लोळ पहायला मिळतो. आभाळात ज्याप्रमाणे वीज कडाडत असते पण हातात धरता येत नाही त्याप्रमाणे मानवी मनाच्या संवेदनशील तरंग लहरी दिसत नाहीत , हातात धरता येत नाहीत मात्र जाणवत असतात. “मन आभाळ आभाळ” या कवितासंग्रहातील कविता अशाच प्रकारे मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देतात. मन आभाळ होऊन जेव्हा भरून येते तेव्हा पावसाच्या सरीसारखे शब्द बरसत असतात हे कवयित्री संवेदनशील मनाच्या असल्याचे मुखपृष्ठावरून दिसून येते.
“मन आभाळ आभाळ” कलाकृतीच्या मुखपृष्ठावर एका महिलेचा हात दाखवला आहे. यातून स्री जाणिवांचे दर्शन होते. ही स्री परिवर्तनवादी आहे ती आज प्रत्येक क्षेत्रात सक्षम झाली आहे, तिला आलेल्या अडचणी, तिच्या पुढील आव्हाने सहज पेलवतील इतकी सक्षम झाली आहे. स्वतःच स्वताचे आत्मसंरक्षण करण्यास स्री खंबीर आहे. या हाताने समाजातील गरजवंत घटकांना मदत करता येईल इतके हे हात कर्तृत्ववान आणि बळकट झाले आहेत. युगानुयुगे स्री शिक्षणापासून लांब राहिली होती, त्याकाळच्या समाजाने तिला कळत न कळत शिक्षणापासून लांब ठेवले होते असे वाचनात आले मात्र पुरोगामी विचारसरणी समाजात रूढ झाली आणि स्री शिक्षणाच्या आद्यप्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्रीला शिक्षित केले, म्हणून आज स्रीने आपल्या हाताने ग म भ न गिरवून शिक्षण घेऊन अवकाशात झेप घेतली आहे या अर्थाने स्रीचा हात दाखवला आहे.
“मन आभाळ आभाळ” या हातात दाखवलेला पांढराशुभ्र ढगाचा पुंजका हे स्रीच्या मनाचे प्रतिकात्मक रूप दाखवले आहे. स्री ही मनाने हळवी असते, मायेने तिचे मन ओथंबलेले असते. कधी आई होऊन, कधी पत्नी , कधी मुलगी होऊन ती आपल्या जवळच्या माणसांवर प्रेमाचा वर्षाव करत असते. तिच्या मनातील भावभावनांचा कल्लोळ म्हणजे हा पांढराशुभ्र ढगाचा पुंजका आहे तर त्यातून गळणाऱ्या जलधारा म्हणजे स्री अंतःकरणातून आलेल्या संवेदनशील शब्दाचे प्रतिक आहे. स्रीला कारुण्याचे वरदान लाभलेले असते, भावुकता आणि मनाचा हळवेपणा असल्याने तिच्या पापणीवर सतत आसवांच्या पाऊसधारा रित्या होत असतात म्हणूनच हातात धरलेल्या पांढ-याशुभ्र ढगाच्या पुंजक्यातून जलधारा ठिपकत असल्याचे दाखवले आहे आणि शीर्षकातून देखील जलधारा बरसत असल्याचा भास होतो.
“मन आभाळ आभाळ” या कवितासंग्रहात निसर्ग, कुटुंब, प्रेम, स्री जीवन, परमेश्वर भक्ती, अशा विविध संवेदनशील विषयाला हात घालून एकूण ७० कवितांचा समावेश केला आहे. त्यांच्या कवितेतून खडतर परिस्थितीवर मात करून स्रीने कसे जगायचे, निसर्गाकडून आनंदाची लयलूट कशी करायची, कधी गंभीर होऊन रहायचे तर कधी सर्वांत मिसळून जीवनाचा आनंद घ्यायचा हे सूत्र कवयित्रीने सांभाळले आहे. त्यांच्या कवितामधून दुःख, वेदना, सल दिसून येते तर कधी मनाचा निचरा करून आनंदाश्रु देखील वाहतांना त्यांच्या कवितेत्तून जाणवते. “स्वागत करू गणरायाचे” या कवितेने सुरुवात करून एक प्रकारे “शुभ कार्यशु सर्वदा” करून मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याचे गणेशाला साकडे घातले आहे.
प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातील इच्छित साध्य करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करीत असतो मात्र आपल्या मनासारखे कधीच घडत नसते, त्याचं मन इतरांना कळत नसते . त्याच्या इच्छा मनातच कुजून जातात आणि मग मन हतबल होते सहनशीलता संपून जाते आणि मन भावनांना वाट मोकळी करून देत असते. भावनाविवश मन डोळ्यातून बरसत असते म्हणून कवयित्री आपल्या “मनासारखं” कवितेत म्हणतात की-
आभाळ खूप भरतं, पण बरसतं कुठे?
मनातलं कुणाला कळतं कुठे?
असा सवाल स्वतःला विचारून कवी मन मनातल्या मनात कुढत राहते…
माणसाला कधी कधी एकाकी पडल्यासारखे वाटते, आपल्या मनातलं हितगुज कुणाजवळ तरी मोकळं करावं, कुणीतरी आपल्या भावना समजून घ्याव्यात, असं एखादं नातं जपता आलं पाहिजे, मन मोकळं करून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावे वाटते हे संवेदनशील मनाचे प्रतिक आहे. ज्याला स्वतःचे दुःख जाणवते तो इतरांचे दुखः समजू शकतो म्हणून कवयित्री “नाती” या कवितेत म्हणतात की – हवं कुणीतरी मन मोकळं करायला , मनसोक्त रडायला विश्वासातलं.
नुकतीच पंढरपूरची आषाढी एकादशी यात्रा पार पडली, शेकडो मैलांवरून वैष्णवांचा, भक्तिसागर पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला जाऊन आला. आपल्या मनातलं दुखः पांडुरंगाच्या चरणी माथा टेकवून गाऱ्हाणे सांगून आला. पंढरीला जाणे म्हणजे काय तर या जन्मात आल्याचे सार्थक व्हावे, या नरदेहाला ज्या पिडा लागल्या आहेत त्या पिडांचे निराकरण कर अशी विनंती करण्यासाठी पांडुरंगाच्या भेटीला भक्त जात असतात. मनाला पिडा, वेदना आहेत, दुःखाची सल आहे, या वेदना पांडुरंगाच्या चरणी माथा टेकवून सांगाव्या म्हणून बरेच वर्षापासून जायचे ठरवले आहे पण जाणे होत नाही म्हणून कवयित्री “मन अधीर झाले” या कवितेत म्हणतात की – “काळ खूप लोटला आले नाही पंढरी, विठू तुझ्या दर्शनाला मन अधीर झाले.”
“मन आभाळ आभाळ” या कवितासंग्रहातील स्री भृणहत्या, बाईची जात, वात्सल्याचा झरा, मन, होऊ द्या मला सबला या कविता स्रीजीवनाच्या वेदना व्यतीत करतात, तर वारी पंढरीची, देव माझा विठूराया, गौळण, याकविता आध्यात्माची ओढ लावतात. नेत्रदान, चारी दिशा उजळू दे, माझा महाराष्ट्र, आमची मराठी, यासारख्या सामाजिक आशयाच्ग्या कवितांसोबतच इतरही सर्वच कविता अर्थपूर्ण असून वाचकाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या आहेत.
कवयित्री वंदना इन्नाणी या शिक्षिका आहेत, शालेय जीवनानुभव घेत असतांना साहित्याचा लळा लागला आणि त्यांनी “मन आभाळ आभाळ’ ही काव्यकलाकृती साहित्य कलादालनात वाचकांच्या भेटीला आणली. प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी आपल्या कल्पकतेने अतिशय सुंदर मुखपृष्ठ सजवून कलाकृतीला साहित्य क्षेत्रात एक ओळख निर्माण करून दिली आहे तर पुण्याचे परीस पब्लिकेशन यांनी या कलाकृतीचे प्रकाशन करून कलाकृतीला वाचकांच्या हवाली केले आहे. कवयित्री वंदना इन्नाणी यांना पुढील साहित्यलेखन प्रवासास हार्दिक शुभेच्छा…
परीक्षण :
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
कलाकृतीचा परीचय
कलाकृतीचे नाव – मन आभाळ आभाळ
साहित्य प्रकार – कविता संग्रह
कवयित्री- वंदना इन्नाणी, पुणे
मुखपृष्ठ – अरविंद शेलार
प्रकाशक- परीस पब्लिकेशन, पुणे