आला उन्हाया उन्हाया…
आला उन्हाया उन्हाया
वाटे भकास भकास
बाभूय बनाच्या खोप्यात
मैना बैसली उदास !!
आग ओकते आभाय
तापल्या रे दिशा दाहि
धारा लागल्या घामाच्या
झाली जीवाची रे लाही !!
जीव शोधती आसरा
जीव नाही रे जीवात
ढोरा पोरांचा रे डेरा
गर्द आंब्याच्या छायेत !!
भुई तपली तपली
कशी उसासे सोडते
मृगजला मागे देख
मृग कळप धावते !!
नदि आटली सुकली
पाणी मिळेना रानात
उडे पाखरांचा थवा
चोचभर पाण्याच्या शोधात !!
दाह सोसवेना उरी
तीच फाटल रे पोट
आतुरल मन तीच
पाहये पावसाची वाट !!
पाहये पावसाची वाट !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनि)
अकोला 9923488556