गोठ सांगतो तुमाले
गोठ सांगतो तुमाले
आजा आजीच्याकाळाची
नातं, गोतं रीतभात
काळ्या काळ्या त्या मातीची !!
राब राबे माही माय
घरासाठी दिसरांत
नाही पदर ढयला
आजा आजीच्या पुढ्यात !!
मोठ्या पाह्यटीच उठे
दये जात्यात दयन
राम कृष्ण येई घरा
गोडं गोडं ओवीतून !!
गाय वासरू गोठ्यात
माय काढुनिया धारं
सडा, सारोन, रांगोई
लख लखे घर दारं !!
काटक्याच्या चुलीवर
व्हती भाजत भाकरं
तिचा फाटका संसार
परी मुखात साखर !!
बाप,काका,काकी,बुबा
आब एकमेकांची राखत
होती प्रेमाची जरब
माह्या आज्याच्या डोयात !!
भरलेल्या घरामंदी
कसं वाटे दन दन
एकाचं दुसऱ्यासाठी
थटथट तुटे मनं !!
असं खटल्याच घरं
कसं राह्ये एकोप्यान
एकीतं असते बळ
हेच मायचं सांगन !!
असे अकाय सुकाय
मनं सारे समाधानी
दुःख सुखात नात्यांची
होती सारी आबादानी !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक(सेनि)
अकोला 9923488556