गरीब मित्रा सोबत चाललं की जगणं कळत.!
हाताची पाच ही बोटे समान नसतात, अगदी एका आई च्या पोटी जन्म घेतलेल्या भावंच भविष्य ही वेगवेगळ असत तिथं मित्रांच काय नाही का ? परंतु मैत्रीला जागणारा आणि जाणणारा मित्र असला की त्या मैत्रीत मात्र तुमची श्रीमंती अजिबात अडवी येत नाही बर का. त्यातील हा एक किस्सा….!
अमित आणि राम दोघे ही जिवलग मित्र अमित चे वडील नोकरी करत असल्या मुळे त्याला पुढे शिकवलं .राम मात्र आपली वडिलोपार्जित शेती करत होता. शाळा सोडून किती तरी काळ लोटला . अमित मोठा व्यावसायिक झाला होता, शेकडो नोकर, गाड्या” शहरात विदेशात कारभार .तर राम च मात्र उलट वडिलोपार्जित शेती तिची ही विभागणी झाली त्या मुळे आपलं शेती आणि मिळेल ते कांम करून तो आपला उदर निर्वाह चालवत होता.
गावातील शाळेने शाळेत जे शिकून मोठे झाले त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.ह्या सोहळ्याला अमित नक्की येणार आहे. अस त्याला समजलं होत.त्या मुळे आपल्या वर्ग मित्राशी तो भेट होईल म्हणून राम खुश होता.
अखेर तो दिवस उजाडला त्या दिवशी राम सगळं काम सोडून कार्यक्रमाला हजर होता.अमित ही त्याची आलिशान गाडी चालक या सह गावात आला परंतु त्याने मुद्दाम साधे कपडे घातले होते जेणे करून अनेक मित्रांना त्याच्याशी संवाद साधायला संकोच वाटू नये ,गाडी ही त्याने शाळे पासून खूप दूर लावली होती आणि कार्यक्रम स्थळी पायी चालत आला.
कार्यक्रम झाला व्यावसायिक म्हणून त्याचा सन्मान झाला राम च्या लेखी व्यवसाय म्हणजे काय असणार एखादं दुकान ,असेल अथवा छोटा मोठा काही तरी व्यवसाय असेल. कार्यक्रम संपताच समोर बसलेल्या राम वर अमित ची नजर गेली. तो त्याच्या कडे चालत आला गळा भेट घेतली. दोघे ही खुश होते. राम ने घरी चहा ला चल म्हणत त्याला आग्रह केला तो ही ते टाळू शकत नव्हता.
दोघे ही निघाले राम प्रचंड खुश होता. समोरून म्हैस घेऊन एक शेतकरी जात होता.राम त्या म्हशी कडे पहात बोलला अमित आपल्या कड पण दोन म्हशी हाय बर का? थोडं फार डेअरी वर दूध जात ,पण तू काय करतो
काही नाही रे असच चाललंय , बर चाललंय ना राम ने हसत विचारलं आणि जास्त कुणाला खोलात जाऊन विचारण त्याला ही आवडत नव्हतं.
इतक्यात त्याच घर आलं त्याच्या घराची अवस्था बिकट होती तरी ही राम हसत म्हणाला ह्यो आपला बंगला.. म्हणत त्याने आवाज दिला. आर पाणी आन आणि बसायला टाक! लै दिसानी माह्य जोडीदार आलाय. अस राम म्हणताच डोक्यावरचा पदर सावरत त्याची बायको पाणी आणि एक फाटकी चादर घेऊन हसत बाहेर आली.काय वहिनी कश्या आहात! आम्ही लै बेस हाय बघा ! अस राम ची पत्नी म्हणताच अमित हसला.आहो मला ओळखलं का पण अमित ने प्रश्न केला? आर ती कशी वळखणार तू आलाच कव्हा घरी!
अमित ची नजर सहज घरातल्या भिंतीवर जाताच त्या भिंतीवर एका तरुणाचा फोटो हार घातलेला त्याला दिसला ,त्याच्या कडे पहात राम बोलू लागला.पोरगा होता . आजार पणात गेला . राम आकाशाकडे पहात म्हणाला समद आपल्या मर्जीनि नाय व्हतं बघ !त्याच जितक आयुष्य व्हतं त्यो जगला. पुण्यात कुठं तरी नोकरीला व्हता. चांगला इंजिनेर केला व्हता रे ! पण अपघातात गेला
इतक्यात चहा आला , अमित ने चहा चा एक घोट घेत राम अरे मी कोण ते तरी सांग ,व्हय व्हय त्य इसरल की. अस म्हणत त्याने अमित ची आपल्या बायको शी ओळख करून दिली.ह्यो माह्या लहानपणीचा जोडीदार ,अमितराव ,! तुम्ही कायम बोलत असता त्य हेच का …जोर जोरात हसत राम म्हणाला व्हय व्हय ह्योच….!
अमितराव हा ज्यो कार्यक्रम झाला ना त्यो म्याच घडून आणला बर का? त्या निमित् सगळी मंडळी भेटली. तू कार्यक्रम घडून आणला आणि तुझा उल्लेख ही नाही अमित हसतच म्हणाला. मी तस सांगितलं होतं. ज्या वर्षी पोरगा गेला तव्हा पासून जे काही मी कमावततो, ते गावातील गरीब पोरांना शिकता यावं म्हणून सगळं देतो .फक्त नाव मात्र कधीच येऊन देत नाही. आर मी शिकलो नाही म्हणून पोराला शिकवलं पण त्यो मधीच सोडून गेला. मग जगायचं का आणि कश्या साठी हा इचार रोज डोसक पिकवून टाकायचा ,
समोर च्या घरा कडे हात दाखवत राम म्हणाला ह्या घरातला कर्ता माणूस गेला बघ पण त्या बाईच पोरग लै हुशार , माह्य पोरा कड कायम ये जा असायची, आम्ही दोघांनी ठरवलं याला शिकायला सगळी मदत करायची पण नाव कळू द्यायचं नाय.माझं नाव कळणार नाय हय जुगाड लावून मदत केली ते पोरग बघ आता साह्यब झालय. आन तव्हा पासून जगण्याला कारण गावल बघ ,गावातील जी गरीब पोर हाय त्यांना माझ्या कमाईतल जे देता येईल ते देतो…लै बर वाटत बघ.
आता अमित मात्र स्वतःला खुजा समजू लागला. आपल्या कडे इतकं असताना आपण कुणालाच मदत केली नाही. याच्या कडे काही नसताना मात्र ह्याने कितीतरी जणांना घडवल ,आपण घडलो परंतु इतरांना घडवता आलं नाही ह्याच शल्य त्याला टोचू लागलं.
इतक्यात भली मोठी गाडी राम च्या दारात येऊन उभी राहिली , राम ताडकन उठला कोण आलाय गड्या ,म्हणताच अमित म्हणाला बस माझीच गाडी आहे ड्रायव्हर ने विचारलं असेल मी कुठं गेलो ते म्हणून तो इकडे आलाय. मी मुद्दाम गाडी शाळेत आणली नव्हती…..
राम कडे पहात अमित म्हणाला तू घडला नाहीस परंतु इतरांना घडवल ,मी मात्र फक्त स्वतः घडलो ,इतरांना घडवता आलं नाही तू खरोखर आज मोठा आहेस खुप मोठा…. इथून पुढे प्रत्येक वर्षी मी गावात येणार आणि तू सुरू केलेल्या कार्याला भरभरून मदत करणार ! जिथून आलो तिथलं आपण देणं लागतो राम हे मी आज तुझ्या कडे येऊन शिकलोय.दोघांच्या ही डोळ्यात पाणी होत…….!
-अशोक पवार