कितीक उचलशील सतरंज्या.?
कमळ घड्याळ बाण
नको दाखवू तू पंजा
कितीक दिवस गड्या
उचलशील सतरंज्या !!
याचा झेंडा त्याचा झेंडा
फक्त झाला झेंडाधारी
देव तुझा एसी मध्ये
तू फिरतो रस्त्यावरी !!
तुह्याच जिवावरती
तोच मारतोय मंज्या
कितीक दिवस गड्या
उचलशील सतरंज्या !!
कार्य करता करता
तू राह्यला कार्यकर्ता
अख्खी जिंदगानी गेली
पायतान धर्ता धर्ता !!
मंत्री आमदाराकडे
वाढल्या नोटांच्या गंज्या
कितीक दिवस गड्या
उचलशील सतरंज्या !!
सात पिढ्याची कमाई
पाचच वर्षात केली
तुही आख्खी रे जवानी
मागे फिरू फिरू गेली !!
तू झालास भिकारी
आन तो झाला रे राज्या
कितीक दिवस गड्या
उचलशील सतरंज्या !!
त्याचे सारे पोरं सोरं
शिकून झालेत मोठे
आन तुहये पोरं गड्या
मारती दंगलीत गोटे !!
ते जातात परदेशी
तुम्ही भोगताय सज्या
कितीक दिवस गड्या
उचलशील सतरंज्या !!
भाऊ दादा नाना काका
सारे देती तुले धोका
तू फिरतो गध्यावानी
ना घरका ना घाटका !!
ते गेले मुंबई दिल्ली
तू पिपयावरला मुंज्या
कितीक दिवस गड्या
उचलशील सतरंज्या !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक(सेनि)
अकोला 9923488556