मायावी संसार
मीच माझ माझ केल
सार भुतानच नेल
अगा जीवनाच माझ्या
सार वाटोळच झाल !!
तन मनाले मारून
केला पैका पैका जमा
नाही केला दान धर्म
कुणा नाही आलो कामा !!
नाही शोधला रे कधी
देव दिन दुबळ्यात
ऊगा पायपिट केली
चर्च, दर्गा, देवळात !!
आरे सार नातं गोत
सारा मायेचा बाजार
धडा धडा पेटविती
कलेवर चितेवर !!
धावू धावू सुखा मागे
देवा जाहलो मी क्षीण
मृगजळा मागे जैसे
धाव धावते हरीण !!
काही कळेना रे देवा
काय खरे काय खोटे ?
मोती टिपति कावळे
राजहंस खाती गोटे !!
असा मायावी संसार
“सार”कळेना “असार”
“सार”साधता संसारी
देवा झालो मी बेजार !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनि)
अकोला 9923488556