गणेशराव देशकरी, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
दारव्हा तालुक्यातील दहेली परिसरातील कुपटी नदीवरील पुलावर ३० जुलैच्या मध्यरात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या आई आणि तिच्या दोन मुलींचे मृतदेह अखेर आज शोधमोहिमेदरम्यान सापडले. या घटनेमुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे कुपटी नदीला आलेल्या पुराच्या प्रचंड प्रवाहात अर्टिगा कार वाहून गेली होती. या अपघातात माधवी खंदारे (वय ४२), साची खंदारे (वय १७) आणि प्राची खंदारे (वय ११) या तिघी पुराच्या पाण्यात बेपत्ता झाल्या होत्या.
घटनेनंतर प्रशासन, बचाव पथक, पोलीस तसेच स्थानिक ग्रामस्थांनी रात्रभर आणि दिवसभर अथक शोधमोहीम राबवली. अखेर आज तिघींचेही मृतदेह सापडल्याने शोधमोहीम दुःखद शेवटाला पोहोचली.
या दुर्घटनेत अविनाश खंदारे यांनी झाडावर चढून स्वतःचा जीव वाचवला. मात्र, पत्नी आणि दोन्ही मुली पुराच्या प्रवाहात वाहून जाताना पाहण्याची वेळ त्यांच्यावर आल्याने परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.
मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून संबंधित यंत्रणांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.
या अत्यंत वेदनादायी घटनेमुळे लोणी परिसरासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात पूरग्रस्त भागातील पूल, नाले आणि नदीपात्र ओलांडताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
गौरव प्रकाशन न्यूज दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि खंदारे कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
‘खाशाबा’चा नायक कोण? नागराज मंजुळेंचा नवा चेहरा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला









