मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुप्रतीक्षित ‘खाशाबा’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. ‘फँड्री’मधील ‘जब्या’ आणि ‘सैराट’मधील ‘परश्या’नंतर आता मंजुळे पुन्हा एकदा नव्या चेहऱ्याला मोठी संधी देत आहेत.
हा चित्रपट भारताला स्वतंत्रीनंतर पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित आहे. 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कांस्यपदक जिंकून भारतीय क्रीडा इतिहासात अजरामर कामगिरी केली होती.
चित्रपटाच्या टिझरमध्ये मुख्य अभिनेत्याची झलक दाखवण्यात आली असली, तरी त्याचा चेहरा पूर्णपणे लपवण्यात आला आहे. काही दृश्यांमध्ये त्याची शरीरयष्टी आणि पाठमोरी झलक दिसते, मात्र तो नेमका कोण आहे, याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.
या चित्रपटात जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम आणि गार्गी कुलकर्णी यांसारखे दमदार कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
विशेष म्हणजे, हजारो इच्छुक कलाकारांमधून कठोर ऑडिशन प्रक्रियेनंतर ‘खाशाबा’च्या मुख्य भूमिकेसाठी एका नव्या अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे. मात्र त्याचे नाव अद्याप गुप्त ठेवण्यात आले आहे.
‘खाशाबा’ हा चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी संपूर्ण देशभर प्रदर्शित होणार असून, टिझरनंतर या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.








