एकेकाळी सत्तेच्या दरबारात बसून देशाला काय दाखवायचे आणि काय लपवायचे, याचे ठरवणाऱ्या तथाकथित गोदी मीडियाला आता सोशल मीडियाने अक्षरशः आरसा दाखवायला सुरुवात केली आहे. ज्या बातम्या टीव्हीच्या पडद्यावर दिसत नाहीत, त्या आता मोबाईलच्या स्क्रीनवर लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे मुख्य प्रवाहातील माध्यमांना सोशल मीडियावरील बातम्यांची दखल घेण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनाही गोदी मीडिया सोडून सोशल मीडियावर यावं लागल.
दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची गोदी मीडियाने अपेक्षित दखल घेतली नाही.जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनांकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी, राजकीय नेते आणि मोठ्या चेहऱ्यांच्या कार्यक्रमांना अवाजवी प्रसिद्धी देण्याची प्रवृत्ती वाढत गेल्यामुळे माध्यमांवरील जनतेचा विश्वास कमी झाला आहे.आज नागरिकांच्या हातात मोबाईल आहे आणि माहितीचे पर्यायी व्यासपीठही आहे. त्यामुळे टीव्हीवर दिसले म्हणजेच सत्य हा काळ आता इतिहासजमा होत आहे.
रायगड जिल्ह्यातील मुलींनी रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी छत्रीचा बूम म्हणून वापर करून केलेले अनोखे रिपोर्टिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले. एका छोट्याशा कल्पक व्हिडिओने व्यवस्थेची पोलखोल केली. त्यानंतर त्याची दखल मोठ्या माध्यमांनाही घ्यावी लागली. हा केवळ एक व्हिडिओ नव्हता, तो बदलत्या माध्यमविश्वाचा इशारा होता.कधीकाळी कॅमेरे, स्टुडिओ, मोठी कार्यालये आणि कोट्यवधींचे बजेट असलेली माध्यमेच बातमी निर्माण करायची.आता एखाद्या सामान्य नागरिकाच्या हातातील मोबाईल कॅमेराही सत्तेला प्रश्न विचारू शकतो. एखादी विद्यार्थिनी, शेतकरी, कामगार किंवा सामान्य नागरिक स्वतःचा व्हिडिओ करून थेट जनतेपर्यंत पोहोचू शकतो. मध्यस्थाची गरजच उरलेली नाही.
पॅकेज च्या राजकारणाभोवती फिरणाऱ्या पत्रकारितेवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आमदार, खासदार, मंत्री किंवा भांडवलदारांच्या कार्यक्रमांच्या मागे धावणारी माध्यमे जर सामान्य माणसाच्या प्रश्नांकडे पाठ फिरवत असतील, तर जनता त्यांना पर्याय शोधणारच. पत्रकारितेचे काम सत्तेची आरती करणे नसून सत्तेला प्रश्न विचारणे आहे.
सोशल मीडिया परिपूर्ण नाही. त्यावर अफवा, खोटी माहिती आणि अपप्रचारही असतो. त्यामुळे सोशल मीडियाने मुख्य प्रवाहातील माध्यमांची जागा घ्यावी, असे नाही. मात्र सोशल मीडियाने एक महत्त्वाचे काम केले आहे.बातमी दाबून ठेवली तरी ती कायमची दडपता येत नाही, हे सिद्ध केले आहे.
आजची जनता केवळ बातमी पाहत नाही तर बातमीची तुलना करते, प्रश्न विचारते आणि माध्यमांच्या भूमिकेचेही मूल्यमापन करते. त्यामुळे टीआरपीच्या अहंकारात जगणाऱ्या माध्यमांनी आता वास्तव स्वीकारण्याची वेळ आली आहे.
मोठा कॅमेरा म्हणजे मोठी पत्रकारिता नाही आणि मोठा स्टुडिओ म्हणजे मोठा सत्यवक्ता नाही. जनतेच्या प्रश्नासाठी उभे राहण्याचे धैर्य जिथे आहे, तिथेच खरी पत्रकारिता आहे.सोशल मीडियाने तथाकथित गोदी मीडिया ला जागा दाखवली आहे. आता त्या आरशात स्वतःचा चेहरा पाहायचा की आरसाच फोडायचा, हा निर्णय माध्यमांनीच घ्यायचा आहे!
- नयन मोंढे पत्रकार ,अमरावती
मो.7588244600
मो.7972841304











