कोणतीही कला लोकांना विचार करायला भाग पाडते. फक्त कलावंतांकडे ती दृष्टी हवी. जागतिक पातळीवरील चित्रकार श्रीधर अंभोरे यांचा प्रवासही असाच होता. दबलेल्या, पिचलेल्या वर्गाचे दु:ख त्यांनी अनोख्या पद्धतीने चित्रकलेत आणले. कलेसाठी जगतांना चार-चौघांसारखा आटोपशीर संसार त्यांनी केला नाही. चित्रकलेसाठीच अवघे जीवन समर्पित केले. अविवाहित राहिले.
श्रीधर अंभोरे यांचा जन्म विदर्भातील पातुर तालुक्यात चिखलगाव या गावी १९४७ साली झाला. अकोला येथे सरकारी वस्तीगृहात राहून त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर पोस्ट खात्यात अहमदनगरला त्यांनी दीर्घकाळ नोकरी केली. १९८० झाली त्यांनी ‘आदीम’ हे नियतकालिक सुरु केले होते. ते त्यांचे कार्यकारी संपादक होते. विशेष म्हणजे या संपादक मंडळात सुप्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर हे देखील होते. एक जागतिक कीर्तीचे चित्रकार म्हणून श्रीधर अंभोरे यांची ओळख होती. प्रतिष्ठेच्या ‘फाय फाउंडेशन’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. यासोबतच विविध पुरस्कारही त्यांना मिळालेले होते. विशेषत: पद्मश्री दया पवार पुरस्कार, विदर्भ भूषण पुरस्कार व रूपाली दुधगावकर स्मृती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.
विविध पुस्तके, मासिके व दिवाळी अंक यासाठी त्यांनी आजवर मुखपृष्ठ व रेखाटने केली आहेत. १९८३ साली सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर दूरचित्रवाणीवर दिंडी या मालिके अंतर्गत ख्यातनाम व्यक्तींची ओळख करून देत. त्यांनी या मालिकेच्या दुसऱ्या भागात चित्रकार श्रीधर अंभोरे यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत पुढे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमासही संपादीत स्वरूपात होती.
श्रीधर अंभोरे यांना आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. गंगाधर पानतावणे, म. सु. पाटील, डॉ. भालचंद्र नेमाडे, प्राचार्य डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. रंगनाथ पठारे, लहू कानडे तथा स्मृतीशेष कवी दिनकर साळवे आदी मान्यवरांचा सहवास लाभला होता. श्रीधर अंभोरे यांनी काढलेल्या चित्रशैलीचे जगभरात कौतुक झाले होते. जगातील १५ देशात त्यांची चित्रे पोहचली होती. काळ्या रंगातील त्यांची चित्रशैली भुरळ पाडायची. वैशिष्ट्यपूर्ण वाटायची.
रंगरेषांचे आणि चित्रकलेचे त्यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नव्हते. तरीही या क्षेत्रातील त्यांची भरारी अचंबित करणारी होती. त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रकलेचे वेड त्यांना बालपणीच लागले होते. काळ्या कोळशाने त्यांनी घराच्या भिंती वर चित्रे काढली होती. घर खराब करतो म्हणून प्रसंगी आईचा मारही खाल्ला होता. कला आणि चित्रांच्या शोधात त्यांनी आजवर प्रचंड भ्रमंती केली होती. भारतातील बहुतेक सर्व जंगलाची त्यांची भटकंती झाली होती. लेण्या, गुहा बघितल्या होत्या. कुंभमेळा असो की गंगाघाट, मंदिरे असोत की काटाळ बाभळी यांची कैक रेखाटने त्यांनी केलेली होती. राजस्थानातील विहिरी, विहिरीवरील पाणी भरणाऱ्या, कष्ट करणाऱ्या स्त्रिया त्यांनी रेखाटल्या होत्या. नर्मदा घाटीतील मोठे दगडही त्यांनी काळ्या रंगात चित्तारलेले होते.
पोस्ट खात्यात नोकरी करीत असताना पोस्टाचे महत्त्वाचे साहित्य रेल्वेने परराज्यात पोहचवण्याच्या कामा निमित्ताने त्यांना भारतातील विविध भूभागाचे दर्शन घडले. लोकांचे पेहराव, भाषा व खानपानाच्या पद्धतीचा त्यांचा अभ्यास होता.
मॉरिशस, म्यानमार, श्रीलंका, भूतान व नेपाळ हे देश त्यांनी पाहिलेले होते. लॉकडाउन काळात दक्षिण आफ्रिकेला भेट देऊन तिथल्या जंगलाच्या भ्रमंतीचा त्यांचा इरादा होता. मात्र कोरोना लॉकडाऊनने त्यांना जाता आले नाही. विविध खाद्यपदार्थ स्वतःच्या हाताने तयार करण्याची त्यांना आवड होती. त्यांना विनकाम आणि भरतकामही यायचे. आपल्या रंगरेषातून सर्वसामान्यांचे उघडे-नागडे जग त्यांनी लोकांसमोर आणले. कोणतीही कला प्रश्नांना अधोरेखित करणारी असावी असे ते म्हणायचे.
अखिल भारतीय स्तरावरील मराठी नाट्य संमेलन व साहित्य संमेलनाच्या पत्रिका देखील त्यांनी तयार केल्या होत्या. आजवर पाचशेहून अधिक पुस्तकांचे मुखपृष्ठ त्यांनी रेखाटले. चित्र रेखाटने तर हजारो काढली आहेत. कोणतीही आर्थिक स्थिती आणि पाठबळ नसताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत नोकरी करत करत श्रीधर अंभोरे यांनी आपली कला जोपासली. चित्रकले सोबतच त्यांना कवितेचीही आवड होती. साहित्य, कला आणि संस्कृती हा त्यांच्या आवडीचा प्रांत होता. महाराष्ट्रभर त्यांचा चाहता मित्रपरिवार होता. दादा जसे थोरांच्या मैफलीत रमायचे तसेच बाल गोपाळांसोबतही रंगून जात. विविध विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. इतिहास, भूगोल आणि खगोलशास्त्र त्यांना आवडायचे. मराठी साहित्य प्रांतातील नवनव्या कलाकृतींकडे त्यांचे लक्ष असायचे. सतत वाचण, भटकंतीबरोबरच साहित्य क्षेत्रातील लोकांसोबत चर्चा करणे त्यांना आवडायचे. त्यांच्या या भटकंतीचे थरारक अनुभव आहेत. नुसत्या भटकंतीवरील अनुभवावरही त्यांचा स्वतंत्र ग्रंथ होऊ शकला असता. नोकरी, साहित्यक्षेत्र व संपादन क्षेत्रातील अनुभवावरही त्यांच्याकडे सांगण्यासारखे असंख्य अनुभव होते. यातील थोडेसे त्यांनी त्यांच्या गाव खेड्यातील अनोख्या शैलीत लिहिले देखील आहेत. सुवाच्य हस्ताक्षर ही तर श्रीधर दादा अंभोरे यांना निसर्गदत्त देणगी लाभली होती. त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रे आणि त्यासोबतची चित्रे अप्रतिम असायची. अनेकांनी त्यांच्या अल्बम मध्ये फोटो सारखी ती जपली आहेत. त्यांची जिज्ञासा अफाट होती. चित्रकलेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या या महान कलावंताचे आज जालना येथे निधन झाले. श्रीधर दादांना भावपुर्ण श्रद्धांजली..
– रवींद्र साळवे/बुलडाणा
मो. 9822262003











