नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आगामी काळात LPG सिलेंडर आणि नैसर्गिक वायू (PNG/CNG) यांच्या किमती वाढू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. यामागचे कारण म्हणजे सरकारकडून या इंधनांवर अतिरिक्त शुल्क लावण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे काही माध्यमांच्या अहवालांमध्ये म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार दीर्घकालीन इंधन साठवणूक योजना तयार करत आहे. या योजनेसाठी मोठा निधी उभारण्याची गरज असल्याने LPG आणि नैसर्गिक वायूवर अतिरिक्त शुल्क आकारण्याचा पर्याय विचारात असल्याचे सांगितले जात आहे.
अहवालानुसार, घरगुती LPG वर प्रति किलो 1.29 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. त्यामुळे 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत सुमारे 18 रुपयांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, PNG आणि CNG साठी वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूवरही प्रति स्टँडर्ड घनमीटर 1.43 रुपये शुल्काचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर आली आहे.
या अतिरिक्त शुल्कातून दरवर्षी मोठा महसूल जमा करून देशातील इंधन साठवणूक प्रकल्प विकसित करण्याची योजना असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुढील 10 वर्षांत ऊर्जा साठवणूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारने अद्याप या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिलेली नाही किंवा कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे सध्या LPG सिलेंडरवर नवीन कर लागू झालेला नाही. अंतिम निर्णय झाल्यानंतरच ग्राहकांवर त्याचा परिणाम होणार आहे.








