छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टी (CJP) ची महत्त्वाची दोन दिवसीय बैठक आज छत्रपती संभाजीनगर येथे सुरू झाली आहे. या बैठकीत पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत, संघटन विस्ताराबाबत आणि विविध राष्ट्रीय विषयांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती CJP चे प्रमुख अभिजीत दिपके यांनी दिली.
या बैठकीसाठी CJP चे अनेक पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले असून, पक्षाची पुढील दिशा आणि देशभरात संघटना अधिक मजबूत करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. झारखंडमधील आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा असल्याचेही दिपके यांनी स्पष्ट केले. तसेच त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पक्षाचे प्रतिनिधी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकारणात प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अभिजीत दिपके म्हणाले, “सध्या आमची राजकारणात जाण्याची इच्छा नाही. मात्र, याबाबत माध्यमांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.” त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य करत पक्षांतराच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली.
याशिवाय मीडिया, न्यायव्यवस्था, बेरोजगारी, E20 धोरण आणि इतर महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पक्षाशी संबंधित सोनम वागचूक यांची प्रकृती ठीक नसल्याने ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. उद्या दुपारी माध्यमांशी संवाद साधून बैठकीतील निर्णयांची माहिती दिली जाणार असल्याचे दिपके यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांत विविध आंदोलनांमुळे चर्चेत आलेल्या CJP कडून या बैठकीनंतर कोणते नवे निर्णय घेतले जातात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.









