गणेशराव देशकरी, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
आर्णीच्या साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय घटना घडली असून, विदर्भ साहित्य संघ शाखा आर्णीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी विजय ढाले यांच्या प्रसिद्ध ‘बिब्बा’ या काव्यसंग्रहातील ‘लॉग इन’ या कवितेचा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. ‘माय मराठी’ (भाग ३ व ४) या पदवी अभ्यासक्रमातील संपादित पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्रात विद्यार्थ्यांच्या कवितेचे आकलन, आस्वाद, विश्लेषण आणि मूल्यमापन या अभ्यासासाठी निवडलेल्या साहित्यकृतींमध्ये संत तुकाराम यांची ‘ऐसे कैसे झाले भोंदू’, समर्थ रामदास यांची ‘नको रे मना’, मोरोपंत यांची ‘सुसंगती सदा घडो’, कुसुमाग्रज यांचे ‘कोलंबसाचे गर्वगीत’, शरदचंद्र मुक्तिबोध यांची ‘कुणाच्या वेदना’, ललित सोनोने यांची ‘हे कळेना कोण आपला’ आणि सिसिलिया कार्व्होलो यांची ‘बापूजींना उद्देशून’ या नामवंत साहित्यकृतींसह कवी विजय ढाले यांच्या ‘लॉग इन’ या कवितेचीही निवड करण्यात आली आहे.
‘लॉग इन’ ही कविता आधुनिक डिजिटल आणि सोशल मीडियाच्या युगातील बदलत्या मानवी नातेसंबंधांवर भाष्य करणारी प्रभावी साहित्यकृती आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या आभासी माध्यमांमुळे बदलत चाललेल्या मानवी संवेदना, हरवत चाललेली माणुसकी आणि बेगडी सामाजिक वास्तव यांचे सूक्ष्म निरीक्षण या कवितेतून व्यक्त झाले आहे. ऑनलाईन-ऑफलाईन, रिक्वेस्ट-ॲक्सेप्ट, लॉग इन-लॉग आऊट, पासवर्ड, शेअर, कॉमेंट, स्टेटस, प्रोफाइल, अपलोड आणि डिलिट यांसारख्या इंटरनेट संज्ञांचा अत्यंत प्रभावी वापर करत कवी विजय ढाले यांनी आधुनिक जीवनातील विरोधाभास अधोरेखित केला आहे.
अखिल भारतीय साहित्य संमेलनासह विविध साहित्यिक व्यासपीठांवर आपल्या हृदयस्पर्शी कविता आणि वैशिष्ट्यपूर्ण काव्यसादरीकरणातून रसिकांची मने जिंकणारे कवी विजय ढाले यांच्या साहित्याचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात झालेला समावेश हा आर्णीच्या साहित्यविश्वासाठी मोठा सन्मान मानला जात आहे.
या यशाबद्दल विदर्भ साहित्य संघ शाखा आर्णीचे ज्येष्ठ मार्गदर्शक लोककलावंत मामा मारगडे, नारायण चालपेलवार, उपाध्यक्ष रविंद्र नालमवार, कोषाध्यक्ष जयंत डोलारकर आणि सचिव डॉ. निवृत्ती पिस्तुलकर यांनी कवी विजय ढाले यांचे अभिनंदन केले. तसेच आर्णी शहरासह परिसरातील साहित्यप्रेमी, वाचक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कवी विजय ढाले यांच्या कवितेला मिळालेला हा शैक्षणिक सन्मान नवोदित साहित्यिकांसाठी प्रेरणादायी ठरणारा असून, विदर्भातील साहित्यिक परंपरेचा गौरव वाढविणारा मानला जात आहे.








