महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस प्रशासनाला याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.
देशभरात नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या विरोधात CJPच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी आंदोलन झाले होते. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरांमध्येही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. काही ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले, तर काहींवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, आंदोलनानंतर CJPने काही राज्यांमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई सुरू असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी केंद्र सरकारकडे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आंदोलनातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या शैक्षणिक आणि भविष्यातील संधींवर होणारा परिणाम टाळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाकडून संबंधित गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची शक्यता असून, याबाबत पोलिस विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे.







