📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

गावभंडाऱ्याची परंपरा; भक्ती, एकोपा आणि माणुसकीचा जिवंत वारसा

On: July 29, 2026 9:59 AM
आम्हाला फॉलो करा:
आषाढी एकादशी निमित्त गावातील विठ्ठल मंदिरासमोर निघालेली दिंडी आणि गावभंडाऱ्यात महाप्रसाद घेत असलेले भाविक

साजरा पाऊस आला म्हणजे ‘फुलं नाही फुलाची पाकळी’ काही ना काही पोटापुरतं वावरात पिकायचं. काळी माय कधी कोणाले उपाशी ठेवायची नाही. या पाणी पावसानं मजुराच्या हाताले काम मिळायचं. मजूराच्या हातातही चारदोन पैसे बाजारहाटासाठी रहायचे. शेतकऱ्यापासून तर मजूरांपर्यंत साऱ्या गावात आबादाणी रहायची.आखाडची पिरपिर झडी सुरूच रहायची.या झडी पाण्यात शेतात चिखलानं पाय फसन असल्याने शेतीभातीची कामधंदेही पूर्णपणे बंद असायची. परिणामी रस्त्यावर टोंग्या,मांडया पाणीच पाणी असल्यानं त्या दिवशी आमची शाळेला च्याट असायची. रिकामं एखादं गोणपाटाचं पोतं पावसात ओलं होऊ नये म्हणून घोंगडं म्हणून आंगावर घेऊन ग्रामपंचायतीच्या जवळच्या मारोतीच्या मंदिरावर मुद्दाम आम्ही चक्कर टाकायचो.अशा झडी, पाण्यात चिखल असल्याने लोकांची नदीच्या पात्रातून वाट काढत आउतभांडे शेतात घेउन जायची खुपच पंचाईत व्हायची.गाळाच्या फसनीत पाय रूतुन एखादा बंगाली बाभुयचा दामनी काटा पायात मोडायचा.जनावरे व माणसं लंगडी व्हायची.

पंढरपूरची जत्रा झाली म्हणजे विठोबाचा प्रसाद घेऊन लोकं आपापल्या गावाकडे मिळेल त्या वाहनाने माघारी परतायची. तिकडून आल्यावर जो तो आपलं पेरलेलं वावर कसं निघालं म्हणून शेतावर चक्कर टाकायचा.व मधात पडलेले टाकेटोपे पुन्हा सरत्यानं पेरायचा. कोणी पाण्यानं जास्तच खळ्ळून गेलेल्या पाटात मधांत तीळ,ओवा,सोप,भगरीचं सुर्यफुलाचं पीक घ्यायचा. शेतातलं पेरणं म्हणजे बारा महिन्यांची खेप असल्याने तेवढाच त्यांचा खर्च भरून निघायचा.निदान दोनचार पायल्या धान्य झालं तरी बस आपलंही भागते कोण्या गरजवंताच्या पदरात दोन चार पायल्या धान्य घालण्याची एवढी समाधानी वृत्ती व उदारता या गावातल्या मनानं मोठ्या असणाऱ्या बळीराजात नक्कीच होती.

आमच्या गावात गांधीजींच्या पुतळ्याच्या समोर भरचौकात विठ्ठल रूक्मिणीचं सुंदर मंदिर होतं. माडी धाब्याचं व सागाच्या नक्षीदार खांबाच्या कमानीचं कोरीव काम असलेल्या परंतु पावसाळ्यातही गरम व उबदार असलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात पाऊसपाण्यामुळे शेतीची कामे बंद असल्याने जमीनीवर मस्त सुती तडव आथरून सकाळ,संध्याकाळी पोथी लागायची.पटांगणात बरसात पाण्याचे चिखलाचे पाय धुण्यासाठी एरव्ही उन्हायात कोरडाठाक असणारा परंतू पावसाळ्यात चोवीस तास सुरू राहणारा सार्वजनिक नळ होता. बाया,बापडया, लहान लहान लेकरं संग घेऊन पोथी आयकण्यासाठी मंदिरात यायच्या.

शेतातली कामं करून थकल्या भागल्या भावीकांची श्रद्धेची वा भक्तीची तहान या पोथीनं भागवल्या जायची. त्यानिमित्ताने का होईना धार्मिक व भक्तीभावाचे सुसंस्कार लोकांच्या मनावर पडायचे.पोथी वाचणारा खणखणीत आवाजात लोकांना अर्थासह पोथी समजाऊन सांगायचा. तेव्हा आम्ही अगदी लहान,लहान होतो. तरी हर्ष,उल्हासाने आमच्या आईवडीलांसोबत हात पकडून विठ्ठलाच्या मंदिरात पोथी ऐकायला जायची.पोथी संपल्यावर सगळ्या भाविकांसाठी चहापाणी,फराय पाण्याची व्यवस्था मंदिरातच व्हायची.

आमच्या गावातील धार्मिक व सदन कास्तकार असणारा भला माणूस असणाऱ्या डोक्यावर भगवी टोपी घालून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुरू केलेल्या सामुदायिक प्रार्थनेचा परंपरागत वारसा सांभाळणाऱ्या गोविंदरावजी भदे या सद्गृहस्थांचा या धार्मिक कार्यात सर्वात मोठा वाटा रहायचा.भरपूर शेती दुधदुभती गुरेढोरं, कामाधंदयाले घरगडी असलेल्या या खटल्यात बाहेगावाहून आलेल्या पोथीवाचक व सोबतच्या साथकरी, टाळकरी मंडळीची जेवण्याची, झोपण्याची,आंगोळीची सगळी व्यवस्था त्यांच्याच टोलेजंग माडीवर केल्या जायची.एवढंच नाही तर येणाऱ्या जाणाऱ्याला चहापाणी,अडीनडीला गडीमाणसांना गावातल्या गरजूंना शेतात कामधंदा व मोठ्या धान्यांच्या कणगीतून गहू, ज्वारीची उसनवारी करण्याची दानत व सेवाभावी वृत्ती त्यांच्यात होती.

आषाढी एकादशीला सम्पूर्ण गावातून विठोबाची मोठी दिंडी हरीनामाचा गजर करत मुख्य रस्त्यावरून निघायची.सुंदर सजवलेली पालखी,समोर ढोलाचं भजन, सांप्रदायिक वारकरी भजन गावच्या मुख्य मार्गावरून निघांयची.घरोघरी निघालेल्या दिंडीचं व पालखीचं मनोभावे पूजन व्हायचं. सम्पूर्ण गाव आनंदानं भारून जायचं. फुगड्या,गौळणी,अभंगानी दणानून जायचा.वारकरी भजन मंडळ,ढोलांची भजन मंडळ व बाहेरगावाहून आलेली व या कार्यक्रमासाठी मुद्दाम बोलावलेली भजनी मंडळांची या दिंडीत आवर्जून हजेरी असायची.

दुसऱ्या द्वादशीच्या दिवसी खुप मोठा गावभंडारा असायचा.तसाच एक मोठा भंडारा मारोतीच्या मंदिरात ज्ञानेश्वरी पारायणाचा कार्तिक महिन्यात असायचा. ज्ञानेश्वरी पारायणाला व रात्रीच्या किर्तनाला अमाप गर्दी असायची.असाच एक कार्यक्रम बाजूच्या गावी रूपनाथ महाराजांच्या यात्रेचा असायचा. पंचक्रोशीतील सगळी लोकं हजेरी लावायची. आम्ही शाळेतली मुलं सायकलीनं भंडाऱ्यात आवर्जून हजर असायचो. गावातून मोठ्ठा लाकडी रथ निघायचा. प्रशस्त मैदानात निंबाच्या झाडाच्या सावलीत पंक्ती बसायच्या. अजूनही ही प्रथा पंरपरा गत सुरूच आहे.


कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे त्यानिमित्ताने गावकऱ्यांमध्ये भक्तीभाव, सात्विकवृत्ती जागृत रहायची.
आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचं भक्तीभावाने पूजन होऊन गळ्यामध्ये तुळशीचा हार, विठ्ठलाला हार, दुपट्टा,पंचा चढविल्या जायचा. विठ्ठल मंदिराच्या कळसावर नवीन झेंडा लावल्या जायचा.एका मोठ्या गंजात पोहे दहीसाखर टाकून काल्याचा प्रसाद केल्या जायचा.घरोघरी आंगणात रांगोळ्या,सडा, सारवन,आंब्याची तोरणं रहायची. गावातल्या मंदिराच्या आवारात मुख्य रस्त्यावर जत्रा भरायची.

वेगवेगळ्या गावावरून आलेली खेळण्याची दुकानं सजायची. भिंगऱ्या,बेगडाच्या चमकीच्या कागदाची चष्मे,डमरू, फिल्मी चित्रपट दाखवणारे कॅमेरे,शेवचीवडयाची दुकाने, लाह्या,मुरमुरे फुटाण्याची दुकाने असायची. लहान मुलांना चांगली पर्वणी असायची.गावातून निघालेली दिंडी वाजतगाजत मंदिरात आली म्हणजे काल्याचं जंगी किर्तन असायचं. काल्याच्या किर्तनाला अमाप गर्दी रहायची. गोपालकाला झाल्यानंतर मंदिराच्या छतावरून खाली फेकलेला लाह्या, मुरमुरे, फुटाण्याचा व पोहे,दहीकाल्याचा प्रसाद घेण्यासाठी एकच झूंबड उठायची.लोकं भक्तीभावाने प्रसाद ग्रहण करायची.

सकाळपासून स्वयंपाकाला सुरूवात व्हायची. पाचपन्नास बायामाणसं आंगोणीनं स्वयंपाकात मदत करायची.संध्याकाळी मोठी भंडाऱ्याची गावपंगत रहायची.विशेष म्हणजे हा गाव भंडारा लोकवर्गणीतून रहायचा.कोणी दाळ, तांदूळ व,गहू,ज्वारी गावच्या जत्रीसाठी गावकरी लोकं पायली पायलीभर शेर शेरभरून धान्य दयायची. हे गोळा झालेलं सम्पूर्ण धान्य साफसुफ करून पिठगिरणीवरून दळून आणून त्यातून हा गाव भंडारा केल्या जायचा. मंडळाची मोठमोठे गंज, कढई,झ्यारे,सराटे,चमचे, प्याले,मीठवाडी, मोठमोठे कोपरं,वगराळं सर्व साहित्य असायचं.दोन चार आचारी रहायची.

हिरव्या मिरच्याईचं मिसयचं वरण हा खास या भंडाऱ्याचा चर्चेचा विषय रहायचा. एवढा की हे चवदार मिसयचं वरण लोकं गडव्या,गीलासातून घरी आलेल्या पै-पावण्यासाठी आवर्जून संग घेऊन जायची‌.या गाव भंडाऱ्यात आजूबाजूच्या पंचक्रोशीतील दूरवरून मंडळी बाया, माणसं,लेकरं पावणे,रावणे हजर असायची.दूरदूर पर्यंत पंगता बसायच्या.अनेक नवतरूण कंबर कसून उत्साहानं हातात बकेटा घेऊन वाढायची.

सर्व लहानथोर, वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं भेदभाव विसरून या गाव भंडाऱ्यात सहभागी व्हायची व महाप्रसाद घेऊन विठोबाच्या कळसाला हात जोडून आपापल्या गावी निघून जायची. पत्रावळीवरचं उरलेलं अन्न खाऊन ढोरंवासरं,मोकाट कुत्री पोट भरून गूपचूप निपचीत पडायची या गाव भंडाऱ्याच्या निमित्ताने सर्व गाव जात,पात, पंथ,पक्ष,धर्म विसरून गुण्यागोविंदाने एकत्रीत रहायचा, विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाला हात जोडून आपलं वर्षभराचं दुःख विसरून गाव भंडाऱ्याच्या महाप्रसादानं तृप्त व्हायचा.हा गावभंडारा म्हणजे वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या जीवाला विरंगुळा व उर्जा द्यायचा.

गावात धार्मिक व सलोख्याचं वातावरण होऊन त्यांच्या दुखऱ्या मनावर भक्तीभावाची व मायेची फुंकर मारणारा, दोन दिवस बाहेरगावाहून कार्यक्रमाच्या निमित्ताने गावाकडे आलेल्या माहेरवाशिणींना मायेची ऊब देणारा हा गाव भंडाऱ्याचा उत्सव गावांसाठी म्हणजे सांस्कृतिक व धार्मिक व सांस्कृतिक, सामाजिक प्रबोधनाची एक पर्वणीच होती.

विजय जय्सिंग्पुरे

लेखन-विजय जयसिंगपुरे
भ्रमणध्वनी -९८५०४४७६१९

● हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now