तूच तुझी
विझवू नकोस
अस्तित्वाचा दिवा;
ती नव्हेच दवा
मुक्ततेची.
पायांमध्ये तुझ्या
संस्कृतीच्या बेड्या;
नीतिग्रस्त मोळ्या
मनावर.
सभोवती उभे
वासनांध पशू;
मृगजळी अश्रू
गाळताना.
यथेच्छ भोगून
फेकून देतात;
संसारकुंडीत
वंशातूर.
कुठवर बाई
चुलीत जळत;
भिंतींत दडत
राहशील?
गांधारी, सावित्री
द्रौपदी नि सीता;
नकोस गं आता
पुन्हा होऊ.
तू तुझी सांगाती
तू तुझी पणती;
शक्ती आणि गती
तूच तुझी.
फाडून बुरखा
विद्रोही सुरूंग;
क्रांतीचे पराग
पेर आता…!
– मिलिंद हिवराळे
सादिक नगर, मु.पो.ता. बार्शिटाकळी,
जि. अकोला – 444401 (म.रा.)
भ्र. 7507094882
ईमेल : milindhiwarale@yahoo.com
………………..