गणेशराव देशकरी
यवतमाळ जिल्हा | प्रतिनिधी
दिल्लीतील जंतरमंतर येथे संशोधक, पर्यावरणवादी, मॅगसेसे पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला यवतमाळ जिल्ह्यातून जोरदार पाठिंबा देण्यात आला. पेपरफुटीच्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सरकारने तातडीने संवाद साधावा, या मागण्यांसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ १५ जुलै रोजी यवतमाळ शहरातील संविधान चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर (बसस्थानकाजवळ) एकदिवसीय उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, दिल्लीतील जंतरमंतर येथे मागील १९ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणादरम्यान सोनम वांगचुक व आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असूनही केंद्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्यामुळे यवतमाळ शहर व ग्रामीण भागातील विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
उपोषणस्थळी अनेक मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख, लोक तांत्रिक राष्ट्र निर्माण अभियान महासंघाचे गोविंदराव चव्हाण, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष संगीता रावते, सर्वोदय अभियानचे श्री. खोचे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश हरणे आणि हरीश कुडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारने संवेदनशील भूमिका घ्यावी, असे मत व्यक्त केले.
यावेळी राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन दादा नाईक, आर्णी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुनंदाताई तुळशीराम बोक्षे, काँग्रेस अनुसूचित सेलचे उपाध्यक्ष नारायणराव थूल, श्री. कृष्णराव पुसनाके, सामाजिक कार्यकर्ते प्रा. घनश्याम दरने, श्रीमती सीमाताई तेलंग, ज्योतीताई गौतमराव खोब्रागडे, पवन भाऊ गजभार तसेच अनेक डॉक्टर, प्राध्यापक, वकील, शिक्षक, सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संविधान, लोकशाही आणि नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता व्यक्त केली. भविष्यात यापेक्षा व्यापक लोकशाही आंदोलन उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली; दिल्ली हायकोर्टाची केंद्र व दिल्ली सरकारला नोटीस
आंदोलनकर्त्यांनी संविधानाने नागरिकांना शांततामय आंदोलनाचा अधिकार दिला असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य नसल्याचे सांगितले. देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांशी सरकारने संवाद साधून त्यांच्या न्याय्य मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी भूमिका व्यक्त करण्यात आली.
पेपरफुटीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे लाखो अभ्यासू विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, त्यातून अनेक विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण होत असल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. नीटसह विविध भरती परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, ही विद्यार्थ्यांची भूमिका असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
कॉक्रोज जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून हे आंदोलन उभे केले असून, त्याला सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले. सरकारने आंदोलनकर्त्यांशी तातडीने संवाद साधून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील संविधान व लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या विविध संघटनांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. शांततेत पार पडलेल्या या उपोषण व धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.
‘खाशाबा’चा नायक कोण? नागराज मंजुळेंचा नवा चेहरा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला







