
रायतं : कैरीच्या लोणच्यापासून शेतकऱ्यांच्या कष्टांपर्यंत… हरवलेल्या ग्रामीण जीवनाचा सुगंधी प्रवास.!
पहिलं वळवाचं पाणी पडलं म्हणजे शेतकऱ्यांची शेतीच्या मशागतीसाठी धावपय सुरू व्हायची. आई भल्या पहाटे चुलीवर दोन जाडजूड मिसयच्या भाकरी, व पापडाचा चुरा व कैरीच्या फोडी,एखादा कांदा फडक्यात शिदोरी बांधून द्यायची. आम्ही बैलगाडीत बसून सरळ शेतात यायचो. झाडाखाली बैलगाडी सोडून सावलीत न्याहरी करायचो.बाबा वखर जूतून पऱ्हाटया पाडायचे. तर आम्ही धसकटं पेटवायचो. भर उन्हात काम करतांना साजरी खातर निंघायची.अशातच पऱ्हाटयाईचा कवटा जमा करतांना एखाद्या काट्याईची फांजर बोटात धसायची. तो रक्तबंबाळ हात साऱ्या दिवसभर साजराच ठणकायचा.
एवढा की भाकर खाणं मुश्किल होऊन जायची.शेतकऱ्याचं जीवन खुपच कष्ट व हालअपेष्टांनी भरलेलं.हे मी अगदी शेतकरी कुटुंबातील असल्यानं जवळून अनुभवलं. एका दिवसी तर कचऱ्याच्या गंजाखाली लपवुन ठेवलेली आगपेटी व घासलेटची शीशी काढायला फणकटाईचा कवटयाखाली हात घातला असता मोठा विषारी घोणस सरप आतमध्ये गुंडाळी करून बसलेला. बापरे… सर्रकन आंगावर काटा आला.हातपाय लटपटायला लागले. जागोजागी मरणयातना. तेव्हापासून अन्न पिकवण्यासाठी किती मेहनत, कष्ट शेतकऱ्याला पडतात. म्हणून मी कधीही ताटात उष्टी भाकरी टाकली नाही. व मुलांनाही टाकू देत नाही.
आमच्या गावात बोरगावचा खातीबुवा मुक्कामी लेकराबाकरासहीत यायचा. नीदान एकदोन साजरं मीरगाचं पाणी पडेपर्यंत तरी त्याचा मुक्काम गावात असायचा. आमच्या घरीही त्याच्या जोळून वखराच्या तुटलेल्या पासा,ईवे, कुऱ्हाड,कोपई,पावशा पाजवून घेउन त्याला धार लावायची.बाबांनी वखराच्या लोखंडी पासेच्या तुकड्याची लहान आ़ंबेफोडी त्या खातीबुवाजोळून बनवून घेतली होती.पण ती दोन चार आंबे फोडया पुरतं काम धकवायची.

मोठया आंबेफोडी नामदेव तेली बुढया सारख्या मोठ्या खटल्यात आवर्जून रहायच्या. कितीही मोठा टणक लोणच्याचा आंबा असेना एक घाव दोन तुकडेच करायच्या. विशेष म्हणजे या आंबेफोडीचं कुठलचं असं भाडं ठरवलेलं नव्हतं. तेव्हा अशा उपयोगी वस्तूची लोकं देवानघेवान करत साऱ्या ऐटायात मंग ती आंबेफोडी फिरायची. रायत्याच्या कैऱ्या घेणं म्हणजे एक अग्निदिव्यच असायचं. चांगल्या कैऱ्या आठवडी बाजाराच्या दिवशी यायच्या.एखादं पाणी पडलं म्हणजे वातावरणात साजरा थंडावा यायचा.एटायातलं साऱ्याईचं रायतं टाकून झाल्यावरचं ती आणलेली आंबेफोडी मूळ मालकाच्या घरी वापस यायची.
नवीन तिखट मिठाच्या मसाल्यातलं रायतं लाल तीखटाच्या भाकरसोबत भलकसं जोरदार लागायचं. आमची आजी पाट्यावर खरखरा लोणच्याचा मसाला व जाडभरडं मीठ,धणे,मीरे साजरं पाट्यावर वाटायची. त्याचा सुगंध साऱ्या आसमंतात हवेसोबत दरवळायचा.तेव्हा आयोडीनयुक्त मीठ अस्तित्वात नव्हतं तरी माणसं शंभराच्या वरच जगली. आता तर सर्व सुविधा असूनही जीवाचं काही सांगता येत नाही. संध्याकाळी आई चुलीतल्या लालसर निखाऱ्यावर मस्त खंमग भाकऱ्या भाजायची. सांडसीत धरून एका वाटीत चटणी तयायची. त्या तयलेल्या चटणीचा वास वार्यासंग साऱ्या एटायात फयलून ठसका लागायचा. त्या सुगंधानं तोंडाले लयच पाणी सुटायचं.पोटातली भूक पेटायची.
आमचा आबा साधंसुधं चटणी भाकरचं किंवा दाय,भाकरीचं जेवण करणारा डोक्शावर पटका बांधणारा आमचा आबा सहाफुट उंच व शरीरयष्टीनं मजबूत, धडधाकट दिसायचा. गयात तुळशीची माळ, दरवर्षी पंढरीला दिंडीसोबत पायदळ जायचा. तेव्हा नेमकं पण अस्सल गावरान अन्नधान्य लोकांना खायला मिळायचं, म्हणून तब्येतीही तशाच होत्या.मीठाचं कुटार खाऊन ढोरं जशी सर्रावून पाणी ओढायची.तसंच माणसाचं जेवण व्हायचं.विशेष म्हणजे कपड्यानं तोंड बांधून ठेवलेली लोणच्याची बरणी हलवून द्यायच्या बदल्यात आम्हाले आजी लोणच्याची एखादी तिखट मसाल्यात मुरलेली लालजरद फोड द्यायची. ती लालचुटुक ताजी फोड आम्ही मस्त मोहरीच्या मसाल्यासहीत आम्ही चाटून पुसून खायचो.

सयपाक खोलीच्या कोपऱ्यात जमीनीवर पीतयचं ताट घेऊन रायत्याची फोड, सयपाक खोलीत टांगलेल्या शिक्यातला कांदा, तोंडी लावायले संभाराची काडी व शिळी दवडीतली भाकर न्याहरीसाठी मस्त लागायची. एखादा उदार माणूस आंबेफोडी आणली म्हणून त्याच्या बदल्यात दोन चार कैऱ्या आंबेफोडी सोबत भेट म्हणून द्यायचा.माहेरी आलेल्या लेकीबाईलेही तोंडी लावायला संग थोडसं लोणचं बांधून द्यायच्या.
शेजारीपाजाऱ्यालेही दोनचार फोडी एखाद्या लहान वाटीत द्यायच्या. त्या बदल्यात माणुसकी म्हणून एखादी बाई वाटीत भाजी द्यायची. तेव्हा इकडून तिकडून आणलेल्या त्या शेजारच्या पीलेटभर भाजीचा स्वाद मस्त चाखायला मिळायचा. तटारून जेवण झालं म्हणजे आंगणातल्या एका कोपऱ्यात बोंदरी बांधलेल्या व त्याच्यात ‘वाया’ नावाचं गवत टाकलेल्या घड्डीतलं म्हणजे मडक्यातलं मस्त थंडगार पाणी अंगातली उष्णता मारून टाकायचं.व शेणानं सारवलेल्या सपरीत मस्त बाज टाकून सन्न झोपी जायचं.किती समृद्ध काळ होता आमचा जो आम्ही पुरेपूर मनसोक्त जगला.

प्रा. विजय जयसिंगपुरे
अमरावती.
भ्रमणध्वनी-९८५०४४७६१९