कुंभारकामाचा झाला असा प्रवास…

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
कुंभारकामाचा झाला असा प्रवास…
पाषाणांतुन जी संस्कृती उगवली तिला अश्मयुग असे म्हटले जाते. दगडाची हत्यारे, तासण्या, टोचण्या ते रंगीबेरंगी दगड-गारगोट्यांचे अलंकार या काळात बनवले जात होते. या काळात माणूस शिकारी व पशुपालक अवस्थेत होता. सभोवतालच्या उपलब्ध नैसर्गिक संसाधनांना कल्पकतेने आणि कष्टाने जीवनोपयोगी बनवण्याची कला ही मानवी बुद्धीची एक झेपच होती. पण याच काळात माणूस केवळ पत्थर नव्हे तर मातीचाही कल्पकतेने उपयोग करायला शिकला. त्या कलेलाच आपण कुंभारकाम म्हणतो. आज मानवाचा पुरातन इतिहास कळण्याची दोनच साधने आहेत. दगडी हत्यारे व वस्तु तसेच उत्खननांत मिळणारी खापरे.
भारतात या कलेची सुरुवात तीस हजार वर्षांपुर्वी झाली. सिंधुपुर्व कालापासुनचे कुंभारकामाचे नमुने आपलयाला मिळून येतात. त्या खापरांवरुन त्या कालातील पर्यावरण ते पीके याचीही माहिती मिळते. कुंभारकामाचा प्रवास हाताने घडवलेली मडकी व वस्तुंपासुन सुरुवात होत चाकाचा आणि आव्यांचा कसा कल्पकतेने आणि विज्ञानदृष्टीने केला गेला याचा सलग आलेख आपल्याला मिळतो. किंबहुना एके काळी या उद्योगाने भारताच्या आर्थिक समृद्धीत प्रचंड भर घातली होती हे आपल्याला प्राकृत साहित्य, जातककथा,  ते कौटिल्याच्या अर्थशास्त्रातुन समजते. मानवी जीवन सुखमय करण्यात या संस्कृतीने मोठा वाटा उचलला. आता नवनवीन शोधांनी पर्याय दिले असले तरी हा उद्योग अत्यंत महत्वाचा आहे. या व्यवसायाशी निगडित असलेल्या समाजाला आज आपण कुंभार म्हणतो. हे निर्माणकर्ते. देशाच्या आर्थिक उत्थानात मोठा वाटा उचलणारे. विविध प्रकारच्या कलात्मक कुंभांतून त्या त्या काळच्या सौंदर्य दृष्टीचे लोक. मातीपासुन अनेक उपयुक्त वस्तू तयार करत, कौशल्याने घडवत आव्यांत विशिष्टच प्रकारची धग देत हव्या त्या रंगाची मृद्भांडी बनवणारे हे आद्य वैज्ञानिक लोक. आज कुंभारकामातील पारंपारिक व्यावसायिक समाज आपले मानवी संस्कृतीच्या उत्थानातील स्थान विसरला असला तरी पुरातत्व खाते विसरलेले नाही.
कुंभारकामाचा शोध अपघाताने लागलेला नाही. वस्तु ठेवण्यासाठी वेली, बांबुच्या कामट्या यांचा उपयोग करुन बुरुडकाम जरी समांतर अस्तित्वात असले तरी द्रव पदार्थांचे काय करायचे हा प्रश्न होताच. आद्य मानवाने चिखल बनवुन हाताने त्यांना विविध आकार देऊन वाळवत काही प्रमाणात प्रश्न सोडवला असला तरी त्या तेवढ्या उपयुक्त नव्हत्या. त्या वस्तु भाजल्याने अधिक टनक व टिकाऊ होतात हे लक्षात आले असले तरी सर्व प्रकारची माती त्यासाठी उपयुक्त नसते तर त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते असे काही बुद्धीवंतांच्या लक्षात आले. यातुनच अन्य सेंद्रीय पदार्थांच्या मिश्रणाने मातीवर प्रक्रिया करण्याचे प्रक्रिया-विज्ञान विकसित केले गेले. उघड्या जागेत त्यांना हवे तसे भाजता येत नाही, हवी तेवढी उष्णता निर्माण करता येत नाही हे लक्षात आल्यावर आव्यांचा अत्यंत महत्वपुर्ण शोध लावण्यात आला. खरे तर या शोधाला थर्मोडायनामिक्समधील (उष्मागतीशास्त्र) पहिला शोध म्हणता येईल. याच शोधातुन पुढे धातु गाळणा-या भट्ट्यांचा शोध लागला हे लक्षात घेतले गेले पाहिजे. चाकाचा शोध लागला असला तरी त्याचाच उपयोग वेगाने हव्या त्या आकाराच्या वस्तु बनवता येतात हाही त्याच संशोधनातील अत्यंत महत्वाचा टप्पा.
कुंभार कामाचे महत्व आता आपल्या लक्षत येईल,  सिंधु संस्कृतीत असंख्य कलात्मक मृद्भांडी सापडलेली आहेत. महाराष्ट्रातही अकरा हजार वर्षांपुर्वीचे कुंभार कामाचे अवशेष खापरांच्या रुपात पाचाड येथील गुहांत मध्याष्मयुगातील (इसपू ९०००) दगडी हत्यारे जशी मिळालीत तशीच खापरेही मिळालेली आहेत. हा आजवर हाती आलेल सर्वात जुना पुरावा. पुढे जसजशी उत्खनने होत जातील तसतसे त्याहुनही जुने पुरावे हाती येण्याची शक्यता आहेच!
म्हणजे हा महाराष्ट्र कुंभारकामात आजपासुन किमान अकरा हजार वर्षांपुर्वीपासून कुंभारकामात प्रवीण होऊ लागला होता. माणूस जसा स्थिर झाला तशी या व्यवसायाची व्याप्ती अजुन वाढत गेली व या कामात कुशल असनारे लोक या व्यवसायात शिरले. भारतात सर्वत्र या अशा पुरातन कुंभारांच्या कलेचे नमुने मिळालेले आहेत व माणसाच्या इतिहास शोधण्यातही या समाजाने हातभार लावला आहे.
सिंधु काळात या व्यवसायाची भरभराट मोठी होती. या काळात कुंभांवर नुसते नक्षीकाम नव्हे तर लोककथाही चितारुन चिरंतन केल्या गेल्या. एका हुशार कावळ्याने पाणी तळाला गेलेल्या माठात खडे टाकुन पाण्याचा स्तर कसा उंचावला आणि मग आपली तहान भागवली ही आजही लोकप्रिय असलेली कथा सिंधु संस्कृतीतील गुजरातमधील एका पुरातन स्थळावरील माठावरच चितारलेली आपल्याला पहायला मिळते. एवढेच नव्हे तर तत्कालीन शिव-शक्तीप्रधान धर्मकल्पना, पिंपळाचे असलेले महत्व इत्यादि बाबी तत्कालीन कुंभार व्यावसायिकांनी मृद्भांड्यांवर चित्रित केलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला तत्कालीन धर्मसंकल्पनांचाही परिचय होतो. त्या अर्थाने कुंभार हे इतिहासाचे वाहक असल्याचे आपल्या लक्षात येईल
 महाराष्ट्रात जोर्वे, इनामगांव अशा ठिकाणांवर प्राचीन आव्यांचेही अवशेष मिळालेले आहेत. विशेष म्हणजे सनपुर्व दोन हजारमधील आव्यांची रचना आणि आजही प्रचलित असलेल्या पारंपारिक आव्यांच्या रचनेत फरक दिसून येत नाही. त्याचाच अर्थ असा की उष्मागतीकी शास्त्रात तेंव्हाच जी उंची गाठली गेली होती ती नंतरही परंपरेने आजच्या कुंभारांनी जपली. जरी त्यांनी त्याचे शास्त्रीय नियम लिहुन ठेवले नसले तरी ते ज्ञात असल्याखेरीज हे होणे शक्य नाही हे पुरातत्वविदांनी मान्य केले आहे.
श्रेणी अथवा निगम संस्थेचा जन्म सिंधु काळातच झाला. श्रेणी संस्था म्हणजे समान व्यावसायिकांच्या आजच्या कमर्शियल चेंबर्ससारख्या संस्था. कुंभारांच्या श्रेण्या त्या काळापासुन अस्तित्वात असल्याचे संकेत आपल्याला तेथे मिळालेल्या मुद्रांवर कुंभांशी जवळीक साधणा-या चित्रांवरुन मिळतात. कुंभारांच्याही अशा देशभर श्रेण्या होत्या. श्रेण्यांना ठेवी घेण्याचे व कर्ज देण्याचे जसे अधिकार होते तसेच चलनी नाणी पाडण्याचेही अधिकार असत. भारतात दहाव्या शतकापर्यंत प्रत्येक व्यवसायाच्या अशा स्वतंत्र श्रेण्या असत. प्रसंगी राजाला कर्जही देण्याचे काम या श्रेण्या करत इतका धनाचा पूर त्यांच्याकडे वाहत असे. गुप्त सम्राटांनी श्रेण्यांचे अनेक अधिकार काढून घ्यायला सुरुवात केल्याने आणि नंतर सरंजामदारशाही युगाचा उदय झाल्याने श्रेंण्या कमजोर झाल्या. त्या श्रेण्यांचेच पुढे जात पंचायतींत रुपांतर झाले. कुंभार जातीचा उदय या कुंभार श्रेण्यांतुनच झाला.
कुंभार समाजाला पुर्वी प्राकृतात कुलाल असे नांव होते. ते तिस-या शतकानंतर संस्कृतच्या परिचयाने कुंभार असे झाले. कुंभार त्या काळातही रांजण, सुरया, गाडगी-मडकी, खापराचे तवे, मद्यपात्रे, मद्यकुंभ, मृण्मय मुर्ती, खेळणी ते फुलदान्या निर्मितीचे काम करत असत. धातुच्या वस्तु पुर्वी तशा दुर्मीळ व म्हणून महाग असल्याने मृत्तिकापात्रे हीच सामान्यांची मोलाची सोय होती. त्यामुळे या व्यवसायाला बरकत होती.
बौद्ध जातककथांतही आपल्याला या व्यावसायिक श्रेण्यांचे असंख्य संदर्भ मिळतात. या श्रेण्यांना राजदरबारी मोठा मान असे. श्रेणीच्या अनुमतीखेरीज कोणताही राजा कर किंवा व्यापार नि कोणत्याही प्रकारचे नियंत्रण लादु शकत नसत. एका अर्थाने ही व्यवसायांना स्वातंत्र्य देणारी व्यवस्था होती. नवीन करागिर घडवण्यासाठी या श्रेणी प्रशिक्षण देण्याचेही काम तर करतच पण मालाचा दर्जा ते किंमती ठरवण्याचेही काम करत. श्रेण्यांचा कारभार लोकशाही पद्धतीने चाले. श्रेणी प्रमुखास ज्येट्ठी अशी संज्ञा होती व तो निवडून आलेला असे. प्रत्येक श्रेणीचे नियम असत व ते पाळणे श्रेणी सदस्यांना बंधनकारक असे.
त्या काळात साखर, मध आणि विविध प्रकारचे तेल रांजन भरुन भरुन शेकडो गाड्यांतुन दुर दुरच्या बाजार पेठांत नेले जात. अशा शेकडो गाड्यांच्या एकेक तांड्यांचे वर्णनही आपल्याला जातककथांत मिळते. कुंभार त्या काळी किती श्रीमंत  असावेत हे सद्दलीपुत या एका कुंभाराच्या वर्णनावरुन लक्षात येते. या सद्दलीपुताचे पाचशे आवे (भट्ट्या) होते आणि तो विविध प्रकारची मृद्भांडी गंगेच्या काठच्या बंदरांवरुन ठिकठिकाणी नेत व्यापार करीत असे. कुंभारांनी व त्यांच्या श्रेण्यांनी मंदिरे, जलाशय ते विहारांना आर्थिक देणग्या दिल्याचे तर अनेक शिलालेख भारतभर उपलब्ध आहेत. सातवाहन कालातील शिलालेख त्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. हालाच्या गाथा सप्तशतीतही कुलालांचे (म्हणजे कुंभारांचे) अत्यंत आस्थामय चित्रण काही गाथांतून आलेले आहे.
– संजय सोनवणी

Leave a comment