प्रतिनिधी | गौरव प्रकाशन न्यूज
आज सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेल्या गाण्यांपैकी ‘गुलाबी साडी’ हे गाणे प्रत्येकाच्या ओठांवर आहे. रील्स, शॉर्ट व्हिडिओ आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक कलाकार, खेळाडू आणि कंटेंट क्रिएटर्सनीही या गाण्यावर व्हिडिओ तयार केले आहेत. मात्र, या यशामागील गायक संजू राठोड यांचा संघर्ष अनेकांना माहिती नाही.
जळगाव जिल्ह्यातील धानवड तांडा या छोट्याशा गावातून आलेल्या संजू राठोड यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आज देशभरात ओळख निर्माण केली आहे. कॉलेजमध्ये असताना त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. सुरुवातीला त्यांनी हिंदी गाणी तयार केली, पण त्या गाण्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सतत अपयश येत असल्याने त्यांच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
याच काळात त्यांच्या आईने त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला. “मराठीत गाणे तयार कर आणि बाप्पावर गाणे लिही,” असा सल्ला आईने दिला. हा सल्ला संजू यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.
यानंतर त्यांनी तयार केलेले ‘बाप्पा वाला गाना’ सोशल मीडियावर लोकप्रिय झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. एकामागोमाग एक गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागली.
‘नऊवारी पाहिजे’, ‘बुलेट वाली’, ‘झुमका’, ‘डिंपल’ आणि अखेर ‘गुलाबी साडी’ या गाण्याने संजू राठोड यांना घराघरात पोहोचवले. आज हे गाणे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देश-विदेशातही लोकप्रिय झाले असून लाखो लोक या गाण्यावर रील्स तयार करत आहेत.
संजू राठोड यांचा प्रवास हा ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी मानला जात आहे. सातत्य, मेहनत आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, याचे ते जिवंत उदाहरण ठरले आहेत.











