देवाचा दरवाजा चांदीने मढला !
देवाचा दरवाजा चांदीने मढला!
शाळेचा दरवाजा पाण्याने सडला!!
मंदीरातील झुंबराला हिऱ्या-मोत्यांचे खडे!
शाळेच्या भिंतींना पडु लागलेत तडे !!
मंदीरात जाऊन लोक पोथी पुराण वाचतात!
शाळेच्या ग्रंथालयात उंदीर मामा नाचतात !!
मंदीराच्या दानपेटीत गुप्तदान करतात!
शाळेच्या देणगीची पावतीच मागतात!!
दरवर्षाला देवाची भरवतात यात्रा !
पालक मेळाव्यात पालक फक्त सतरा !!
पुजाऱ्यांच्या गळ्यात सोन्या-चांदीचे हार !
कंत्राटी शिक्षकांची होऊ लागली उपासमार !!
न खाणाऱ्या देवाला पंचपक्वानांचा घास !
शाळेत खिचडी भाताचा अहो येईना वास !!
आता तुम्हीच सांगा कधी संपेल इथला अंधविश्वास !
शिकले-सवरलेले तरुण- तरुणीच करु लागले आता उपवास!!