मिरूग…
मिरूगमीरगाचं पाणी पडलं होतं.रातभर धोधो पाऊस बरसत होता. नदया नाल्या ओंसडून वाहत होत्या. घरावरचे कवलं, पाखे, पार संततधार पावसानं धुवुन टाकलं होतं. काहीची त घरं अभिषेक केल्या सारखी टपकत होती. घरातली सर्व भांडीकुंडी, भदाळं याच कामी लावली होती. भांडयात पाणी पडल्यावर त्याचा टणनटणन आवाज रातभर कानात घुमत होता. काहीनी तर आधीच छावण्या, भारके भीताडाले लावले होते. दाठठयात व घरात पाणी धसु नये म्हणुन झाडांच्या बेपाटया तोडुन त्यावर पराटया व बजारातुन आणलेला मीटरदोनमीटर मेनकापड आथरला होता. इंधनकाडी, व कडबाकुटाराचीही झाकझुक केली होती. ढोरं वासरं मंदीराच्या भीताडापाशी आंगचोरुन ऊभी होती. मोकाट कुत्र्याचे ही हाल होत होते. तेही कोणाच्या गरम ओटयावर ग्रामपंचायतीच्या माग नाही तर मंदिरांच्या ओटयावर मुरकडी घालुन बसली होती. चार दोन म्हातारी-कोतारी अंगावर पोतयाच्या घोंगड्या घेउन पारावरून पावसाची गमंत पाहत होती. ...









