(मेल्या आईचा चहा नाट्य प्रयोगाच्या निमित्त)
किनवट सारख्या दुर्गम भागात शिक्षणाची गंगा तांड्या पाडयावर नेणारे शिक्षण महर्षी अभियंता प्रशांत ठमके यांचे सुपुत्र शुशांत ठमके हे नाट्य सृष्टीत नावारूपास येत आहेत . त्यांनी चित्रपट तसेच नाटकात अभिनय केला आहे . सखाराम बाइंडर या प्रसिद्ध नाटकात ‘सखाराम ‘ यांची भूमिका त्यांनी उत्कृष्ठपणे केली आहे . त्याच प्रमाणे आता ‘मेल्या आईचा चहा ‘ या नाटकात त्यांनी समीर ची भूमिका केली आहे . तेव्हा समाज मनाला हेलावून टाकणारा हा नाट्यप्रयोग संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक भवन अमरावती येथे ३ आक्टोबर २०१६ ला रात्री ८ . ३० ला होणार आहे . ही अमरावती करांना अंतर्मुख करणारी सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे . या नाटयप्रयोगाचे टिकीट बुकिंग सुरु असून, हा नाटयप्रयोग पाहण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे .
‘मेल्या आईचा चहा ‘ हे डॉ. चंद्रशेखर फणसळकर लिखित हृदयस्पर्शी नाटक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे सादर होत आहे. यामध्ये यशवंत ( श्रेयस भारसाकळे ) श्रेयसचे वडील सुरेशराव भारसाकळे अमरावती येथीले सुप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळच्या आश्रम शाळे चे निवृत मुख्याध्यापक आहेत . समीर (शुशांत ठमके ), विवेक (धृव ठाकूर ) आदी कलावंतांनी आपल्या समृद्ध अभिनयाने नाटकाची उत्तम परिणामकारकता साधली आहे .
नेपथ्य हे नाटकातील वातावरण निर्मिती प्रभावीपणे सादर करते . यशवंतच्या दिवंगत आई च्या फोटोपुढे दिवा जळत आहे . शोकगंभीर छाया घरभर पसरली आहे . त्या दुःखाला सुतकी शांततेचा गंध आहे. मृत्यूव्यथा ही विदग्ध करणारी असते . कर्करोगाने आईला आलेला मृत्यू हा पिळवटून टाकतो, पण यशवंत त्या दुःखाला मूकपणे सोसतो . तो स्वतःला मुखीर करीत नाही. तो तसा आतून कोसळत असला, दुःखाचे उमाळे तो आतल्या आत गिळून घेतो . दु:खी चेहर्याने वावरत नाही . यशवंत समीर आणि विवेक हे शाळकरी मित्र, आपल्या दायीत्वाचा भाग म्हणून त्याची सोबत करतात .
संवादाची भाषा थेट, अस्सल व अनौपचारिक आहे . बोलीचा प्रयोग चपखलपणे केला आहे. संवाद हा चुरचुरीत आणि नर्मविनोदी आहे. कथानका भोवती घटना व पात्रे यांची गुंफण नाटककाराने केली आहे . आईच्या मृत्यूचे कथाबीज लेखकाला गवसले . त्यावर सध्याच्या मानवी नात्याचे बिनचेहर्याचे वर्तमान चित्रित करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.
मित्रांच्या आणि यातीजनांच्या गर्दीत माणूस दिवसेंदिवस एकाकी पड़तो आहे. त्यामुळे त्याच्या भावनांचा थांग लागत नाही . माणसाच्या मनाच्या तळाशी जाणे अवघड झाले आहे . एक अनोखा मनोव्यापार अव्यक्त ‘स्पेस ‘ मधून डोकावतो . चेहर्यावरचे डोळ्यातले आविर्भाव आपल्या अभिनयातून व्यक्त करणे ही खरी नाट्य कला आहे . तीच चित्तवेधक असते . नाटक हे कथा काव्य, संगीत याचा अपूर्व मिलाफ असतो . मराठी रंगभूमी मातब्बर कलावंतानी समृद्ध केली आहे. नवागतांनाही इथे संधी आहे .
यशवंत आईच्या मृत्यूने शोकव्याकुळ झाला आहे . मित्राच्या आईच्या मृत्यूची वार्ता ऐकून समीर त्याच्या घरीयेतो . विवेक आधीच असतो . वयाच्या पंचविशित असलेल्या मुलांची आईविषयी असलेली संवेदना उलगडून दाखविनारे संवाद या नाटकात आले आहे.. यशवंत समीरला प्रश्न करतो . आई म्हणजे काय असते? तेव्हा समीर म्हणतो, जी मुलाला जन्म देते ती आई . जन्म देणे ही केवळ जैविक प्रक्रिया नसून ती भावनिक आणि मानसिक रुपांतरणाची प्रक्रिया आहे . नवजीवनाचा सर्जनशील आविष्कार म्हणजे मातृत्व . मातृत्वच कोणत्याही मातेला वात्सल्याचं अमृत प्रदान करते . जीवन उर्जेच नव रूप तिला हा निसर्ग बहाल करतो . जीवन प्रवाह त्यातून फुलत जातो .
या नाटकातून तीन मित्रांच्या भुतकाळातील आठवणी . त्यांचे स्वभाव . एकमेकांविषयी असलेला मैत्रभाव व्यक्त झाला आहे. एकमेकांच्या काळजीच्या सुरातील संवाद हृदयाला स्पर्श करतात . या लोकप्रिय नाटकात शुशांतला भूमिका मिळाली . त्याला मनस्वी शुभेच्छा . नाट्यसृष्टीत त्याच्या कला अभिनयाचे आविष्करण उमलत राहो . समृद्ध होवो .
- प्राचार्य सुभाष गडलिंग
किनवट जि.नांदेड









