आपल्या अवतीभवती अनेक घटना घडत असतात कळत नकळत का होईना घडणाऱ्या गोष्टी मनात कुठेतरी खोलवर परिणाम करीत असतात. कुठेतरी आपल्या आयुष्याचे प्रतिबिंब त्यात दिसून येते तर कधी या गोष्टीपासून आपल्याला जीवनाचे विविध पैलू दिसून येतात. छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला ते अनुभवायला मिळतात. या अनुभवातून जेव्हा अनुभूतीचा साक्षात्कार होतो; तेव्हा याच अनुभूतीतून ‘वादळवाट’ सारख्या कथासंग्रहाची निर्मिती होते. दिलीपराज प्रकाशन द्वारा प्रकाशित झालेल्या या कथासंग्रहात एकूण नऊ कथा आहे. या नऊही कथा मानवी जीवनाच्या वाटेला आलेला संघर्ष आणि त्या संघर्षाच्या वाटेवर चालताना शेवटी मनात असलेला आशावाद आणि त्यातून मिळालेली जगण्याची उर्मी, नंतर आपणच आपल्या साठी शोधलेली नवी वाट सुगंधित करत जीवन जगण्याचा चालू असणारा प्रयत्न या सपूर्ण कथामलिकामधून वाचायला मिळतो.

कथा ही मानवी जीवनाचा प्रवास आहे. सुख, दुःख, आनंद, नैराश्य, वादळ, समस्या, आशा विविध वलयांनी वेढलेला हा प्रवास खूप खडतर असतो, संघर्षाने भरलेला असतो. या संघर्षावर मात करून विजयपथावर मोहर उमटविणाऱ्या या कथा आहेत. प्रत्येक कथेतून एक नवीन संदेश लेखकाने वाचकांना दिलेला आहे.
त्यांची पहिलीच कथा ‘वादळवाट’ सपूर्ण कथामलिकाचा आत्मा आहे. या कथेत संघर्षाच्या वाटेवर न डगमगता परिस्थितीशी सामना करणारी शेतकऱ्याची आशावादी पत्नी ही कुटुंबावर आलेल्या संकटावर रडत न बसता त्याचा सामना करते. खरोखर जिंकण्याची जिद्द असेल, आपले ध्येय आपले लक्ष समोर असेल तर जिद्दीपुढे वयही झुकतं. दुःखावर मात करता आली की आयुष्याला उत्तर देता येते!
दुसरी कथा ‘स्मशान वेडी’ या कथेमध्ये लोक काय म्हणतील याला न जुमानता आपले कार्य न घाबरता करत राहणारी वनिता ही एक धाडसी आणि असामान्य व्यक्तिमत्व जे स्मशानात राहून काम करते! खरे तर काम कोणतेच वाईट नसते. वाईट असते त्या कामाविषयी असलेली आपली विचारसरणी.. या कथेमधील धाडसी वनिता ची कथा समाजाला नवीन विचार देणारी आहे.
तिसरी कथा ‘अनघा’ ही एक प्रेम कथा आई-वडिलांच्या विरोधात जाऊन केलेला प्रेम विवाह पण वाटेला आलेल्या खडतर जीवनाला ते दोघेही सामोरे गेले. अपंगत्व घेऊन जन्माला आलेल्या मुलीबद्दल त्यांच्या मनात असलेला समर्पक भाव आणि दोघांनी मिळून परिस्थितीचा केलेला सामना वखागण्याजोगा आहे. दोघेही एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असेल तर संसारात आलेली वादळ झेलता येतात ही शिकवण देणारी ही कथा आहे.
चवथी कथा ही ‘मावळतीची किरणं’ ही कथा कुठल्याही परिस्थितीत मुलीने नोकरी सोडू नये, कारण कुणावर कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही. व्यवहार पैशाने चालतात प्रेमाने पोट भरत नाही. चुकीचा मार्ग, चुकीचे विचार त्यामुळे आयुष्याची होणारी ससेहोलपट या कथेतून मांडण्यात आली आहे.पाचवी कथा ‘माहेर’ माहेर हा शब्द प्रत्येक स्त्रीच्या संवेदनेशी संलग्न आहे. माहेर नावाचा हळवा कोपरा प्रत्येक स्त्रीला हवा असतो. स्त्रियांसाठी मायेची ऊब आणि सुरक्षेचे कवच म्हणजे माहेर असते. या कथेत म्हातारपणात मुलांना आईचा होणारा भार, त्यातून आईची होणारी होरपळ, खरे तर ही माणुसकीला काळीमा फासणारी कथा आहे. मुले असूनही शेवटी शेवंता आजीला वृद्धाश्रमातील लोक सहाय्य करतात, प्रेम लावतात. प्रत्येक व्यक्तीने मुलांसाठी सर्वकाही करताना आपल्या म्हतारपणाची तरतूद करणे तितकेच गरजेचे आहे हीच शिकवणी ही कथा देते!
सहावी कथा ‘रुपया ते युरो’ या कथेत परदेशात गेलेल्या मुलाला साधं आई-वडिलांशी बोलायलाही वेळ नसतो; पण जेव्हा कोरोनाची महामारी येते आणि परदेशातील लोकांना आपल्या देशात परत यावे लागते त्यावेळी मुलाला आपले आई-वडील आठवतात. किती हा निर्दयी स्वार्थीपणा माणसाच्या मनात घर करून असतो. परदेश कितीही सुंदर असेल तरी आपल्या मातीचा सुगंध त्याला येत नाही, शेवटी आपला रुपयाच श्रेष्ठ ठरतो. हृदयाला फाझर फोडणारी ही एक सुंदर कथा आहे.
सातवी कथा ‘भूक’ कोरोना काळात अनेक गरीब लोकांचे हाल झाले. खायला अन्न मिळत नव्हते. लोकांकडे कुठलीच कामे उपलब्ध नव्हती. अशातच अनेकांवर उपासमारीची पाळी आली. ते दिवस आठवूच नये इतके भयंकर होते. या कथेत आपल्या लेकरांना खायला मिळावं म्हणून मरण जवळ करणारी आई लेखकाने साकारलेली आहे. भुकेची अत्यंत विदारक कहानी या कथेतून मांडण्यात आलेली आहे.
आठवी कथा ‘निवाडा’ ही कथा मुलीचे ऐकून संसार न मोडता तिचा संसार वाचवणारा बाप समाजाला एक विचार देऊन जातो. प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्याशिवाय आणि कानांनी ऐकल्याशिवाय कुठलाच निवाडा करू नये हाच विचार ही कथा देऊन जाते!
नववी कथा ‘ घरटं ‘ प्रत्येकासाठी घर किती महत्त्वाचं असतं मग तो पक्षी असो किंवा मानव प्रत्येकाला सुरक्षा हवी असते. घरटं ही कथा प्रेम, सुरक्षा, नाती जपण्याची धडपड दर्शविणारी आहे. हेच घरटं नात्याला बांधून ठेवू शकते त्यामुळे सुगरणीचं घरटं मानवाला खूप मोठी शिक देऊन जाते..या कथासंग्रहातील नऊ ही कथा आपल्यासमोर नऊ वेगवेगळ्या विषयासह लेखक प्रा. मधुकर वडोदे सर यांनी मांडलेल्या आहे. प्रत्यक्षदर्शी मानवी जीवनाचा अभ्यास करून त्यामधील अनेक बारकावे लक्षात घेऊन मानवी जीवनाचा प्रवास त्यांनी या नऊ वेगवेगळ्या कथेतून मांडलेला आहे.
प्रत्येकाचा संघर्ष वेगळा, जगणे वेगळे, विचार वेगळे, कामाची शैली वेगळी, त्याचबरोबर प्रत्येकाची कथा वेगळी, आणि हेच वेगळेपण मधुकर वडोदे सरांच्या ‘वादळवाट’ कथासंग्रहाच्या निमित्त्याने मला अभ्यासता आलं’ वादळवाट हा कथा संग्रह त्यांनी स्नेहपूर्वक भेट पाठवून वाचण्यास उपलब्ध करून दिला. त्यांचा साहित्यप्रवास त्यांची साहित्यसंपदा बघता त्यांच्या पुस्तकावर काय समीक्षा लिहिणार हा विचार घेऊनच एक छोटासा प्रयत्न मी केलेला आहे. या कथासंग्रहातील भूक ही कथा अभ्यासक्रमाला आहे. अत्यंत सुंदर असा हा कथासंग्रह प्रत्येकाच्या संग्रही असावा. प्रा. मधुकर वडोदे सरांच्या लिखाणास आणि साहित्यिक योगदानासाठी अनेक शुभेच्छा देते!
कथासंग्रह :- वादळवाट
कथालेखक :- मधुकर वडोदे
पृष्ठसंख्या :- १२८
किंमत :- १८०
प्रकाशक :- दिलीपराज प्रकाशन पुणे
समीक्षण
सौ. निशा खापरे, नागपूर
7057075745,
‘खाशाबा’चा नायक कोण? नागराज मंजुळेंचा नवा चेहरा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला











