पावसाळ्यातील झडीचे दिवस म्हणजे निसर्गाचे सौंदर्य आणि जिकडे तिकडे हिरवीगार हिरवळ आनंद देणाऱ्या पर्वणीचा काळ होय. या दिवसांत हवामान थंड असते, या दिवसात नद्या-तलाव तुडूंब भरतात. निसर्गाचं हिरवेगार रुप चिंब भिजलेलं रान सामसूम व्हायचं. शेतात कोणी रहायचं नाही.सर्वत्र हिरवे गवत व झाडे उगवतात.थंड वारे वाहतात. आकाशात काळे ढग जमा होतात आणि गार वारे वाहतात अगदी आनंदी वातावरण बघायला मिळते. उन्हाळ्याच्या त्रासानं काहीली झालेला जीव या थंडगार पावसानं मस्त सुखावून जायचा.सर्वांना मोठा दिलासा मिळायचा.
आमचे आबा बहुधा झडीच्या दिवसात मस्त जाडजूड आंगावर पांघरून घेऊन मस्त बाजीवर ताणून द्यायचे. मस्त घोरायचे.अशावेळी सुती दोरा घेऊन आबाच्या नाकाजोळ धरला म्हणजे जागे होऊन मोठ्यानं शिंकायचे व आजूबाजूला बघून परिस्थिती लक्षात आल्यावर बाजूला ठेवलेली जाडजूड काडी हातात घेऊन आमच्या मागे लागायचे.
अशा झडीच्या दिवसात मी बहुधा शाळेला दांडी मारायचो. किंवा मुद्दाम शाळेच्या कपड्यांमध्ये रस्त्यावरचा चिखल उडवायचो व कपडे चिखलाने भरले म्हणून शाळा बुडवायचो.आमची शाळा अगदी एसटी स्टॅण्डच्या बाजूला होती. समोर मोठी पाण्याची टाकी. त्यासमोर संत लहानुजी महाराज विद्यामंदिर व त्याच विद्यामंदिराच्या बाजूला आश्रमशाळेचं मोठ्ठं टोलेजंग वसतिगृह होतं. या वसतिगृहाचा आजूबाजूच्या आठदहा खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या मुलांना चांगलाच आधार होता.
ज्यांची परिस्थिती बिकट होती अशी मुलं नात्यागोत्यातलं कोणी वागवायला तयार नसलं म्हणजे विद्यार्थ्यांना वसतिगृहाशिवाय पर्याय नसायचा.पाच पन्नास मुलांची भरती असायची व त्यांच्यासाठी जेवण बनवायला एक बाई असायची.ताटं धुवायला व आंघोळीसाठी मोठी पाण्याची टाकी होती. समोर विस्तीर्ण पटांगण होतं. शाळेच्यासमोर इतर चारपाच खेडयांना जाणारी काळभोर डांबरी सडक. स्टॅण्ड म्हणजे शहरातल्या स्टॅण्ड सारखं नाही तर दिवसातून कधीतरी चारपाच एसटया धावताना दिसायच्या. मात्र काळ्या पिवळ्या गाड्या दिवसभर रोडवर दिसायच्या.
एरव्ही गावाला जाणारी माणसं हातात थैली घेऊन हिंगणबेटाच्या झाडाखाली ताटकळत उभी रहायची. या हिंगणबेटांनी आम्ही कपडे पण धुवायचो. स्टॅंडच्या आजूबाजूला दोन,तीन चहाची,भज्यांची टपरी व्हॉटेलं.एक म्हाल्याची हजामतीची टपरी. तसा बाहेरगावच्या गावातून एक म्हाली बाडबिसतरा घेऊन यायचा व मारोतीच्या पाराजोळ वडाच्या झाडाखाली बोंदरी आथरून बसायचा. त्याबदल्यात धान्य पैसा,अडका घेऊन जायचा. एखादं गोया, बिस्किट व पोंगा पंडीतचं छोटसं चालतंफिरतं दुकान असायचं.तेव्हा कुरकुरे व आलू चिप्स डोयांनी दिसायचे नाहीत. या झडीपाण्याच्या दिवसात आम्ही महादेव मंदिराच्या गच्चीवरून पाईपातून पडलेल्या धारेखाली मनसोक्त भिजायचो. वडीलधाऱ्या मंडळीच्या चोरून हा कार्यक्रम चालायचा.नदीले भरपूर पूर यायचा नदीकाठी पोहायला गेलो म्हणजे भरपूर मार बसायचा.
नदीकिनारी तासनतास नदीचा पूर बघणे ही एक गंमतच होती. पूर म्हणजे दिसायले एक रोमहर्षक आणि निसर्गाच्या अफाट शक्तीचा अनुभव देणारी गोष्टच होती.मोठी पट्टीची पोहणारी माणसं पुराच्या पाण्यात उतरायची.पुराच्या पाण्याचा आनंद घेण्याच्या नादात कधीकधी दुर्घटना सुद्धा घडायच्या. पाण्याचा प्रचंड वेग लाटा उंच उसळत यायचा. पुराच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असतो,जो क्षणार्धात माणसाला किंवा वाहनांना ओढून नेऊ शकतो.
जीवित व वित्तहानी होते. पुरामुळे लोकांची घरे, शेती आणि पिके पूर्णपणे नष्ट होतात, ज्यामुळे मानवी जीवन विस्कळीत होते.अदृश्य संकट ओढवते. कधीकधी तर ग्रामपंचायतीचा कामदार नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्यापासून सावधानतेचा इशारा द्यायचा. अशावेळी रात्री झोप लागायची नाही.सारखी भिती असायची.आईवडील जागीच राहायचे.एकवेळा फक्त सामानसुमानाची बांधाबांध झाली होती पण गाव व घरं सोडण्याची अजूनतरी पाळी आली नाही.
दोन्ही थड्या दुथडी भरून वाहणारी नदी सोसो आवाज करत नाल्यातील घाण पाणी व काडीकचरा पोटात सामावून घ्यायची. पूर बघायला गावातल्या लोकांची मोठी गर्दी असायची. ग्रामपंचायतीच्या ओट्यावर उभं राहून लोकं नदीचा अवाढव्य पसरलेला पात्राचा पूर बघायची.पूराच्या पाण्यासंंग वाहत आलेली लाकडं,मुरय शेंगा पकडायची.लहान लहान मुले सांडपाण्याच्या नालीमध्ये कागदाच्या नावा तयार करून पाण्यात सोडायची.याच ग्रामपंचायतीच्या ओट्यावर मोठ्ठं पिंपळाचं डेरेदार झाड होतं.आता ते दिसत नाही.बहुतेक पडलं असावं. पावसाच्या दिवसांत त्यांच्या फांद्यांचा आवाज घाबरून सोडायचा.
बाजुला हनुमान मंदिर, मंदिराच्या आवारात गोटया,वाघबकरी, पत्ते,चपुंलांचा डाव चालायचा. छत्री रेनकोट औषधालाही सापडायचा नाही. गव्हाच्या पोत्याच्या गोण्या असायच्या. त्याची घोंगडी करून तेच आंगावर घ्यायचं.पण पाण्यापासून बचाव व्हायचा. झडीपाण्याच्या दिवसात ज्याचं हातमजुरीवर घर होतं त्याच्या तं वा वाक्याले पारावार रहायचा नाही. शेतातली सगळी कामधंदे ठप्प पडायची.हाताला काम भेटायचं नाही.अशावेळी मोठमोठ्या खटल्यातून उसणी ज्वारी किंवा धान्य पिका पाण्यावर वापस करण्याच्या बोलीवर उसणं भेटायचं.अडीनडीला माणसं एकमेकांच्या कामात पडायची.
उन्हाळ्यात साठवून ठेवलेलं कडबाकुटार नेमकं ऐन ह्याच झडीपाण्यात संपवायचं. त्यामुळे घरीढोरवासरं असले म्हणजे पंचाईत व्हायची. तरी बाप पायजाम्याचा घोय खोसून आंगावर पोत्याचं घोंगड घेऊन ढोरं खुटयावरचे सोडून चिखल तुडवत कोसभर चरायला घेऊन जायचा.तिकडूनच घोयात अंबाडीची भाजी तोडून आणायचा.एवढच नाही तर डोक्शावर गवताचा मोठा भारा असायचा.तिकडून आल्यावर चुलीवर आई गरमागरम चहा ठेवायची चहा आणी पाव मस्त बशीत घेऊन मनसोक्त खायची.
चुलीतल्या आरावर भाकरीच्या पोपडयांवर तेल,मीठ टाकून भाजण्याची व मस्त खिडकीत बसून खाण्याची मज्जा यायची.रात्री अंबाडीच्या खमंग भाकरी व हिरव्या मिरच्याईचा ठेचा,लोणच्याची फोड,सोबतीला लालसर भाजलेला पापड,का़ंदा घेऊन सगळी चुलीसमोर अंग शेकत आजूबाजूला जेवायला बसायची.जेवणं आटोपली म्हणजे इलेक्ट्ररीक नसल्याने टिव्हीचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे आपापल्या घडोशीवरच्या ठेवलेल्या सातऱ्या,वाकया बगलेत घेऊन शिडीनं माडीवर चढायचं व मस्त धुंद कोसळणाऱ्या झडीच्या दिवसात नदीच्या पाण्याचा व बेडकांच्या डराव डराव करण्याचा भितीदायक आवाज ऐकत बुढीच्या लुगडयाचं उबदार पांघरून आंगावर घेऊन कंदिलाच्या मिणमिणत्या अंधुक काळोखात पाय पोटाशी दुमडून मस्त गुडूप झोपी जायचं.
- प्रा विजय जयसिंगपुरे, अमरावती
भ्रमणध्वनी-९८५०४४७६१९
‘खाशाबा’चा नायक कोण? नागराज मंजुळेंचा नवा चेहरा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला









