नवी मुंबई | प्रतिनिधी
नवी मुंबईतील ऐरोली परिसरात तब्बल 11 महिन्यांपूर्वी घडलेल्या एका थरारक हत्याकांडाचा अखेर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी उलगडा केला आहे. अनैतिक संबंधांमध्ये पती अडथळा ठरत असल्याच्या संशयातून पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पत्नी सुनिता कुशवाह आणि तिचा कथित प्रियकर राहुल प्रजापती यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव बलीराम सूर्यनाथ कुशवाह असे आहे. हत्येनंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे कटरच्या सहाय्याने तीन तुकडे करून गवळी देव डोंगर परिसरातील जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा उलगडा मयताच्या भावाने व्यक्त केलेल्या संशयानंतर झाला. त्याने रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), तांत्रिक तपास आणि आरोपींच्या हालचालींचे बारकाईने विश्लेषण केले. चौकशीदरम्यान आरोपींच्या जबाबातील विसंगतीही समोर आल्या.
तपास अधिक खोलवर गेल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर गवळी देव डोंगर परिसरात मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी विशेष शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
या घटनेमुळे ऐरोली परिसरात खळबळ उडाली असून, इतका गंभीर गुन्हा तब्बल 11 महिने लपवून ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी काही महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









