वाशिम | प्रतिनिधी
वाशिम जिल्हा न्यायालयाने पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निकाल देत तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राज्यातील अशा प्रकारच्या प्रकरणात एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा होण्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे.
हे प्रकरण २०११ मधील आहे. रिसोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी संशयावरून बेग्या पवार यांना ताब्यात घेतले होते. मात्र, पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाण आणि छळामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती.
या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला. तपासादरम्यान सादर करण्यात आलेले वैद्यकीय अहवाल, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी तत्कालीन ठाणेदार माधव माणिकराव धांडे यांच्यासह एकूण ९ पोलीस कर्मचाऱ्यांना भारतीय दंड संहितेतील खून, छळ, गंभीर दुखापत, समान उद्देशाने गुन्हा करणे आणि गुन्हेगारी कट रचणे अशा गंभीर कलमांखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील श्रीराम नारायणराव काळू यांनी प्रभावी युक्तिवाद करत, कोणत्याही व्यक्तीवर गुन्हा सिद्ध होण्यापूर्वी त्याच्यावर अमानुष छळ करण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचा मुद्दा न्यायालयासमोर ठामपणे मांडला.
या निर्णयामुळे राज्यातील पोलीस यंत्रणेला मोठा धक्का बसला असून, कायदा सर्वांसाठी समान असल्याचा स्पष्ट संदेश या निकालातून देण्यात आल्याची चर्चा कायदेतज्ज्ञ आणि सामाजिक क्षेत्रात सुरू आहे.






