वारंवार वापरलेल्या तेलामुळे कर्करोगासह अनेक गंभीर आजारांचा धोका; नागरिकांनाही सावध राहण्याचे आवाहन
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यात वडे, भजे, समोसे आणि इतर तळलेले पदार्थ तयार करण्यासाठी एकाच खाद्यतेलाचा वारंवार वापर करणाऱ्या हॉटेल, ढाबे आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर आता अन्न व औषध प्रशासन (FDA) कडक कारवाई करणार आहे. सार्वजनिक आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
अन्न सुरक्षा नियमांनुसार खाद्यतेलातील टोटल पोलर कंपाउंड्स (TPC) चे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास ते तेल वापरण्यास अयोग्य मानले जाते. अशा तेलाचा पुन्हा वापर केल्यास त्यात विषारी घटक तयार होतात आणि ते आरोग्यासाठी धोकादायक ठरते.
तेल खराब झाल्याचे कसे ओळखाल?
खाद्यतेलाचा रंग काळसर किंवा गडद होणे, जळका वास येणे आणि तेलात जास्त फेस तयार होणे ही तेल खराब झाल्याची प्रमुख लक्षणे आहेत. असे तेल तात्काळ वापरणे बंद करावे.
कोणते आजार होऊ शकतात?
तज्ज्ञांच्या मते, वारंवार गरम केलेले तेल वापरल्याने गॅस, अपचन, अल्सर, यकृताचे विकार, हृदयविकार तसेच कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हॉटेल्ससोबतच घरातही एकाच तेलाचा वारंवार वापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
एफडीएची कारवाई काय?
अन्न व औषध प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर दंड, परवाना निलंबन, अन्नपदार्थ जप्ती तसेच इतर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. यासाठी जिल्हाभर तपासणी मोहीमही अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी सांगितले की, वारंवार गरम केलेले तेल शरीरात विषारी घटक वाढवते. त्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी अशा तेलाचा पुनर्वापर टाळणे आवश्यक आहे.







