मी अनुभवलेली वारी: विठ्ठल भक्ती, वारकरी संस्कार आणि जीवनाला मिळालेली नवी दिशा

On: June 26, 2026 10:41 AM
आम्हाला फॉलो करा
पंढरपूर वारीमध्ये टाळ-मृदंगाच्या गजरात चालणारे वारकरी, विठ्ठल भक्तीचा आध्यात्मिक सोहळा

आमच्या घरी आजोबा पासून तर आईवडीलापर्यंत वारकरी संप्रदायाचीच विचारधारा असल्याने मी लहानपणापासूनच आपसूकच या वातावरणामध्ये ‘बहुत सुकृताची जोडी’ म्हणून अगदी आवडीनं ओढल्या गेलो. आमच्या घराला लागूनच महादेवाचं सुंदर मंदिर असल्याने तेथे दररोज रात्री नित्यनेमानं हरिपाठ चालायचा त्यामुळे वातावरण भक्तीमय रहायचं.हा आध्यात्मिक व सांस्कृतिक ठेवा जोपासण्यासाठी अहोभाग्यच लागतं ते खोटं नाही.डोक्यावर मोठा भारदस्त फेटा बांधलेले, सहा फूट उंच व शरीरानं धष्टपुष्ट असलेले व पहाटेच स्नान उरकल्यावर दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी छोट्याशा आरशात बघून टिळा,अष्टगंध, बुक्का व दरावती,चंदन लावणारे आमचे आजोबा आजूबाजूच्या परिसरातील सप्ताहात विणेकरी म्हणून प्रसिद्ध होते.

त्यामुळे सप्ताह असो वा तुकाराम महाराज गाथा पारायण ते हमखास जायचे. अगदी सातारकर महाराजांच्या किर्तनात ही विणेकरी म्हणून एकदा त्यांनी हजेरी लावली होती. बाहेरगावी काही कार्यक्रम असला म्हणजे मी सोबत येण्याचा जास्तच आग्रह केला किंवा जबरदस्तीने हट्ट करून त्यांच्या मागं लागलो म्हणजे कधीकधी तेही मला सोबत न्यायचे. त्यामुळे हरिपाठ,कीर्तन तुकारामाची गाथा हा माझ्या आवडीचा विषय झाला. साप्ताहिक कार्यक्रमात दैनंदिन दिनचर्या काकडा आरती, हरिपाठ, प्रवचन, किर्तन यामुळे आयुष्य उजळून निघालं,मन संस्कारक्षम झालं.अजूनही हा ठेवा मनामध्ये जसाच्या तसा आमच्या कुटुंबानं जोपासला आहे. शहरात आल्यावरही ही ओढ स्वस्थ बसू देत नाही.

अजूनही रस्त्यानं वारी किंवा पायी जाणारी दिंडी दिसली म्हणजे ज्ञानोबा, तुकारामाच्या गजरानं अगदी आनंदाने उर भरून येउन हात जोडून माणूस आपसूकच नतमस्तक होतो.एकदा तर चार,पाच कोसावर एका बाहेरगावी आजोबा सोबत सात दिवस गेलो. त्या सद्गृहस्थाच्या घरी गाथा पारायण सुरु होतं. अशातच भरदुपारी त्यांच्या नकळत चोरून मी गावाच्या बाहेर असलेल्या पुर्णा नदीच्या पात्रात पोहायला गेलो. उन्हाळ्यात नदीच्या पात्रात रेती वाळू असल्याने भोई लोकं नदीच्या पात्रात टरबुजाची शेती करतात. ती टरबुजं आजूबाजूच्या परिसरातील गावच्या आठवडी बाजारात विकतात.

उन्हाळ्याच्या दिवसात एरव्ही कोरडीठाक पडणारी पुर्णा नदी पावसाच्या दिवसांत मात्र दुथडी भरुन वाहतांना दिसते. तीच्या पाण्याने अनेक गावांना सुखसमृद्धी आणते.त्यावेळी मी खुपच लहान म्हणजे जवळपास सातव्या वर्गात असेल तेव्हा मला पाण्यात पोहणं वगैरे काहीही येत नव्हते.सहज पाण्याची ओढ म्हणून त्या विशाल परंतु संथ असलेल्या पाण्यात काठावर कपडे ठेवून नदीपात्रात मुद्दाम हौस म्हणून उतरलो.तो खोल डोह होता.पाण्याचा अंदाज न आल्याने जवळजवळ बुडालो.

जिवाच्या आकांताने हात तेवढे वर काढायचो. पुन्हा पाण्यात बुडायचो. ऑक्सिजन न मिळाल्याने अर्धमेला झालो होतो. काही खरं नव्हतं.हा प्रकार काठावर उभ्या असलेल्या एका मुलीच्या लक्षात आला. सहसा मुलींना एवढं धाडस नसतं. पण काय असो त्या एवढ्याशा फ्रॉक घातलेल्या चुणचुणीत मुलीनं मला बघून धावत काठावर येऊन तीचा हात दिला. बस तेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं जीवनदान होतं.दोन मिनीटे जर कोणीच आलं नसतं तर सगळं संपलं असतं.’देव तारी त्याला कोण मारी’ यांचा प्रत्यय आला. साक्षात् पुर्णा मायच मला मानवाच्या रूपात वाचवायला आली की काय? असंच क्षणभर वाटलं.

बराच वेळ मी त्या नदीकाठच्या वाळूवर बसलो.नंतर मात्र थोडं बरं वाटल्यावर अंगात कपडे घालून निघालो. तेव्हापासून कधीच तिकडे फिरकलो सुद्धा नाही पुढे पुढे मात्र गावच्या नदीत पोहणे शिकलो.आता तर मोठमोठ्या पुरात पोहण्याची अजिबात भिती वाटत नाही. आजोबांना मी सांगीतलं नाही. घरच्यांना सुद्धा अजूनही माहिती नाही. वारीच्या निमित्ताने आजच हा विषय आपणासमोर मांडला.सांगायचं झालं म्हणजे हा वाडवडीलांचा ठेवा माझ्या सुदैवाने मला मिळाला हे अहो भाग्यच! म्हणावं.तुकाराम महाराज म्हणतात.

आम्हा घरी धन|शब्दांचीच रत्ने’
शब्दांचीच यत्ने| शस्त्रे करू
शब्दचि अमुच्या,जीवाचे जीवन|
शब्दे वाटू धन|जनलोका||

याप्रमाणे घरचं वातावरण सर्वसाधारण गरीबीचं असलं तरी लहान वयात मनावर पडलेला संस्कार मात्र श्रीमंत होता. त्यामुळेच बहुतेक ही ब्रम्हरसाची गोडी आम्हाला चाखायला मिळाली. मानवी जीवनात वारीचं महत्व अनन्यसाधारण आहे. मी दोनदा पायी वारी अनुभवली आहे. तेव्हा मी बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला असेल! मी दिंडीतील मृदंगाचार्य होतो.आणखी एक दोघं सोबती होते.त्यामुळे मृदंग वाजवणाऱ्याला विशेष मान होता.तसेही हे वारीतील वारकरी लोकं म्हणजे

पंढरीचा वास चंद्रभागे स्नान । आणिक दर्शन विठोबाचें ॥१॥हेंचि घडो मज जन्मजन्मांतरीं । मागणें श्रीहरी नाहीं दुजें ॥२॥मुखीं नाम सदा संतांचें दर्शन । जनीं जनार्दन ऐसा भाव ॥३॥नामा ह्मणे तुझें नित्य महाद्वारीं । कीर्तन गजरीं सप्रेमाचे ॥४॥

अर्थ व भावार्थ- पहिल्या चरणात संत नामदेव म्हणतात, मला सतत पंढरपुरात निवास करायला मिळावा, चंद्रभागेच्या पवित्र नदीत स्नान करता यावे आणि विठ्ठलाचे नयनरम्य रूप वारंवार पाहायला मिळावे.दुसऱ्या चरणात ते श्रीहरीकडे (विठ्ठलाकडे) मागणं मागतात की, हे देवा, मला प्रत्येक जन्मात फक्त आणि फक्त हीच भक्ती मिळू दे, याव्यतिरिक्त मला दुसरे कोणतेही वरदान नको आहे.

तिसऱ्या चरणात भक्ताची लक्षणे सांगताना ते म्हणतात, माझ्या मुखात नेहमी तुझे नामस्मरण राहो, मला संतांचे दर्शन घडो आणि प्रत्येक माणसात मला तूच (जनीं जनार्दन) असल्याचा भाव अनुभवता येऊ दे.चौथ्या चरणात नामदेव महाराज विठ्ठलाला विनवतात की, हे विठ्ठला, मला तुझ्या महाद्वारावर दररोज प्रेमभावाने होणाऱ्या कीर्तनाचा गजर ऐकायला आणि त्यात सहभागी व्हायला मिळू दे. आपल्या संतानी एवढं महात्म्य वारीचं सांगितले आहे.

पंढरीच्या लोका नाही अभिमान|पाया पडे जन एकमेका.

अंहकाररहीत जगणं ही वारी शिकवते.वारीतील नित्यनैमित्तिक दिनचर्या मस्त असते.अगदी सकाळीच भल्या पहाटे उठून थंड पाण्याने आंघोळ करून काकडा आरती, रस्त्यानं जागोजागी चहापाणी,नाश्ता,केळी,फराळ झाल्यावर ठरावीक अंतर चालल्यानंतर व्यवस्थापन कौशल्यानुसार ठरल्याप्रमाणे येणाऱ्या समोरच्या गावी वारीतील लोकांच्या भोजनाची व्यवस्था केलेली असते.

ही त्या व्यक्तीनं वारी प्रति दाखवलेलं प्रेम असते,त्याची श्रद्धा, भक्ती असते. भक्तीभावाने लोकं रांगोळ्या घालतात. फुगड्या खेळतात. एकमेकांना प्रेमानं आलिंगन देतात. गावात दिंडी आल्यानं सम्पूर्ण गाव भक्तीरसात न्हाऊन निघतो.लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आनंद होतो. ही गोडी काय वर्णावी त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव महत्वाचा असतो. मानवी जीव अगदी आनंदून जातो. तहान भूक हरवते. ‘अवघी चिंता वारली’ याप्रमाणे मन निकोप होते.

वारीसोबत आलेल्या सर्व वारकरी लोकांविषयी व महिला भगिनींविषयी आपुलकीची व बंधुभावाची जाणीव निर्माण होते हे विशेष.पात्राभोवती पाणी फिरवून पंगती बसतात. थकून भागून आलेले वारकरी मिळेल ते भोजन वारकरी मोठ्या श्रद्धेने,आनंदाने ग्रहण करतात. जेवणानंतर दुपारी थोडा वेळ आलेला थकवा घालवण्यासाठी फक्त जाड्या,भरडया ताडपत्री वा तडवावर थोडी विश्रांती घेऊन पुढच्या मुक्कामाकडे निघतात. उन,वारा,पावसाची तमा न बाळगता ही लोकं एकसारखी विठ्ठल भक्तीच्या ओढीने तहान भूक विसरून रामकृष्ण हरीचा जयजयकार करत रात्र दिवस एकसारखी चालतच राहतात.

एकमेकांविषयी अपार प्रेम, जिव्हाळा हा वारीतच बघायला मिळतो. मुक्कामाच्या ठिकाणी संध्याकाळी हरिपाठ व रात्री भोजनानंतर किर्तनाचा आनंद अवर्णनीय असतो.मनाला आदर्श,आध्यात्मिक प्रबोधनाचं अमृतसिंचन मिळतं.म्हणजे वारीमुळे मनाला एका वेगळ्या अनुभूतीचा आनंद मिळतो.

सुख वाटे जीवा| जाता पंढरीसी.

हा खालीलअभंग पहा अभंगात विठ्ठल भक्तीचे आणि वारीचे महत्त्व सुंदर शब्दांत सांगितले आहे.

“होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥१॥काय करावीं साधनें । फळ अवघेचि येणें ॥ध्रु.॥अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥२॥तुका म्हणे डोळां । विठो बैसला सावळा ॥३||

अभंगाचा भावार्थ असा की या अभंगात संत तुकाराम महाराज सांगतात की, तुम्ही स्वतः वारकरी व्हा आणि प्रत्यक्ष पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घ्या. या भक्तिमार्गात इतर साधना करण्याची काय गरज आहे? भगवंताचे दर्शन हेच सर्व साधनांचे फळ आहे. पंढरीच्या वारीने व दर्शनाने माणसाचा अहंकार नष्ट होतो आणि सर्व मन विषयरहीत होतं.

तुकाराम महाराज म्हणतात, आता विठ्ठलाच्या दर्शनाने माझे डोळे धन्य झाले आहेत आणि तो सावळा विठ्ठल माझ्या डोळ्यांत व मनात कायमचा स्थिरावला आहे. पंढरपुरच्या वारीत लाखो वारकरी पायी चालत आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. हे केवळ तीर्थाटन नसून, मानवी मूल्यांची जपणूक करणारा एक मोठा सांस्कृतिक व आध्यात्मिक लोकसोहळा आहे.वारीचे मुख्य महत्त्व खालीलप्रमाणे आहे.

•समता आणि बंधुभाव: वारीमध्ये लहान-मोठे, गरीब-श्रीमंत किंवा उच्च-नीच असा कोणताही भेद नसतो. सर्वजण समान पातळीवर ‘विठ्ठलनामाचा’ गजर करतात.आध्यात्मिक समाधान आणि शांती: पायी चालताना संतांचे विचार, भजन आणि कीर्तन ऐकल्याने मनाला शांती मिळते आणि आत्मपरीक्षण करता येते.

•एकता आणि शिस्त- वारीमध्ये अनेक दिंड्या आणि लाखो लोक एकत्र चालतात. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने, टाळ-मृदंगाच्या गजरात व रिंगण सोहळ्यासारख्या परंपरेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडते.

•मानसिक व शारीरिक आरोग्य-वारीतील चालण्यामुळे वारकऱ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते आणि कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या त्या जीवाला वर्षभर जगण्याची ऊर्जा मिळते.

वारीची परंपरा ही आठशे वर्षांपेक्षाही अधिक जुनी असल्याचे सांगितले जाते. आजही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत वारीच्या रस्त्यानं न थकता अखंड चालतात.वारी म्हणजे आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपापल्या गावाहून पंढरीला पायदळ दिंडीसोबत जाणे. वारी म्हणजे येरझार या अर्थाने ही वारीकडे पाहिल्या जाते.


महाराष्ट्राची अत्यंत प्राचीन आणि पवित्र वारकरी परंपरा आहे, ज्यामध्ये लाखो भाविक (वारकरी) पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. संतांच्या पालख्या त्यांच्या मूळ स्थानावरून पंढरपूरपर्यंत नेण्याच्या प्रथेला ‘संतांची वारी’ म्हटले जाते.या वारीची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहे.

•आषाढी वारी-ही सर्वात मोठी आणि मुख्य वारी असते. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून आणि संत तुकाराम महाराजांची पालखी देहूवरून पंढरपूरकडे प्रस्थान करते.

•कार्तिकी वारी-आषाढी वारीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलाही अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतात.

•पालखी सोहळा-वारकरी संप्रदायातील संतांच्या पादुका रथात ठेवून, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ नामाच्या जयघोषात हा सोहळा चालतो.

•रिंगण सोहळा- वारीच्या मार्गावर वारकरी घोडे आणि पालखी यांच्यासह विविध प्रकारची ‘रिंगणे’ मैदानी खेळ खेळतात.

सांगायचं म्हणजे वारीमध्ये जात, पात, श्रीमंत-गरीब असा कोणताही भेद नसतो. सर्व जण एकमेकांना ‘माऊली’ म्हणून मोठ्या प्रेमानं हाक मारतात आणि विठ्ठल भक्तीच्या मस्तीत मस्त आनंदाने चालतात.या पायी वारीचे संपूर्ण नियोजन हे शिस्तबद्ध असतं.

वारीमुळे सर्व मनोविकार गळून पडतात. पण हे सांगण्यापेक्षाही वारी प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे. संसाराच्या रामरगाडयात थकलेल्या,शिणलेल्या जीवाला वारी म्हणजे एक सुखद फुंकरच आहे. एकदा तरी ती केल्यानं आपणास निखळ प्रेमाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही हेही तितकच खरं. रामकृष्ण हरी..

विजय जय्सिंग्पुरे

प्रा. विजय जयसिंगपुरे अमरावती
भ्रमणध्वनी- ९८५०४४७६१९

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now