📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

बाप मरायला नव्हता पायजे | भावनिक हृदयस्पर्शी कथा

On: September 16, 2025 12:19 AM
आम्हाला फॉलो करा:
बाप मरायला नव्हता पायजे – हृदयस्पर्शी मराठी कथा, नितीन थोरात यांचा भावनिक लेख

बाप मरायला नव्हता पायजे | भावनिक हृदयस्पर्शी कथा

चांगलं आठवतंय. होय अगदी चांगलं आठवतयं. अन् आठवतंय म्हणून स्वत:ची लाजही वाटतीये. तेव्हा मी कॉलेजला होतो. अभ्यास करायचो, पण अभ्यासापेक्षा उनाडक्या जास्त करायचो. उनाडक्या करायला पैसा लागायचा. अन् पैसा कमवायची तर काही अक्कल नव्हती. म्हणून मग वडलांबरं खोटं बोलायचो अन् त्यांच्याकडून पैशे उकळायचो.

बाप आमचा अडाणी. म्हणजे तसा शिकलेला. एसटीत कंडक्टर. पण, नाकाच्या सरळ रेषेत चालण्याची सवय असल्यानं बाकी भानगडीत पडत नव्हता. पोरगा मोठ्या कॉलेजला शिकतोय याच्यातच त्यांना मोठं समाधान वाटायचं. मग, उसणंपासणं कर, उपाशी राहून डबल ड्युटी कर असलं काय काय करुन ते मला पैशे द्यायचे अन् मग मी पोरांसोबत पिक्चरला जायचो. फिरायला जायचो. पोरी फिरवायचो.

एकदा तर एक पोरगी म्हणाली, ‘तुझे वडील काय काम करतात?’ तर ते कंडक्टर आहेत, हे मला सांगायला लाज वाटली. म्हणून मी तिला ‘ते एसटी डेपोचे मॅनेजर आहेत’ असं सांगितलं होतं. तसं सांगितल्यावर ती मला पटली होती अन् तिला ते कंडक्टर आहेत हे कळाल्यावर ती सोडूनही गेली होती. ती गेली तेव्हा लय वाईट वाटलं होतं. पण, आता ती गेल्याचं बरं वाटतं अन् आपला बाप काय चीज होता हे आठवलं की आपण त्याला किती फसवलं हे आठवून वाईट वाटतं.

बाप जीवापाड प्रेम करायचा. पण, त्या वयात मला त्यांच प्रेम कळतच नव्हतं. माझा जन्म झाल्यांनतर वर्षभरात आई आजारपणानं अपंग झाली. त्यावेळी आईचं वय होतं एकवीस आणि वडलांच वय होतं फक्त चोवीस. तेव्हापासून वयाच्या साठीपर्यंत त्या माणसांनं आपल्या अपंग बायकोला सांभाळलं. मनापासून जपलं. कारण फक्त एकच होतं. मी दुसरं लग्न करेल पण, काय गॅरंटी की दुसरी बायको माझ्या मुलांना खऱ्या आईचं प्रेम देईल?’

बाप प्रत्येक वेळी माझा विचार करायचा. त्यांनी मला पुण्यात कॉलेजला शिकायला पाठवलं. होस्टेलला अ‍ॅडमिशन घेऊन दिलं. कॉलेजची, क्लासची फी भरली. त्यांचा पगार जेमतेम होता. त्यामुळे माझ्यासाठी ते डबल ड्युट्या करुन पैसा कमवू लागले. आज आणलेला जेवणाचा डबा दुसऱ्या दिवशी रात्री खाऊ लागले. कधी कधी तर फक्त वडापाववर दिवस ढकलू लागले.

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

फाटके कपडे नेसूनच कामावर येऊ लागले. अन् मी? मी फक्त त्यांच्या कष्टाचा पैसा उधळत राहिलो. वडिलांना डबल ड्युटी करण्यासाठी 120 किमी एसटी न्यावी लागायची. त्यावेळचे रस्ते असे होते की एसटीतल्या माणसाची हाडं खिळखिळी व्हायची. हाडं खिळखिळी करत, आठ-दहा तासांचा प्रवास करत आणि दोन वडापाववर दिवस ढकलल्यावर वडलांना सातशे रुपये मिळायचे अन् मी कॉलेजमध्ये शायनिंग मारण्यासाठी हजार रुपयांची जीन्स घालायचो.

आपण बापाला फसवतोय याची कधीमधी जाणीव व्हायची. पण, कॉलेजच्या वयात बापाला फसवणं स्वाभाविक असतं, असं वाटून मीच माझी समजूत घालायचो. ती समजूत नसून फसवणूक होती हे लय उशीरा कळालं.

हळूहळू बाप थकू लागला आणि घराच्या रथाचे दोर माझ्या हातात येऊ लागले. आधी भारी वाटलं. आपण घराचे प्रमुख आहोत असं वाटू लागलं. आता आपण म्हणणार तोच निर्णय अशा अविर्भावात वावरु लागलो. बाप रिटायर झाला. निवांत घरात पेपर वाचू लागला. घराची, ऑफिसची, आईबापाची जबाबदारी माझ्यावर पडू लागली. हळूहळू चिडचिड होऊ लागली. चार पैसा हाती आला आणि डोक्यावर अक्षदा पडली.

आईबापानं मोठ्या आनंदानं नव्या सुनेचं स्वागत केलं. काही वर्षांनी मी बाप झालो आणि आता माझा प्रवास सुरु झाला. रात्रीअपरात्री लेकरु रडायचं अन् मी झोपेतून उठून गुमान त्याचे डायपर साफ करायचो. मध्यरात्री सारं शहर झोपलेलं असताना गॅलरीत घेऊन त्याला बसू लागलो. रात्री लेकरानं जागंवलं म्हणून दुसऱ्या दिवशी ऑफिसात डुलक्या घेऊ लागलो आणि बॉसच्या शिव्या खाऊ लागलो. रोज रात्री मित्रांसोबत गप्पा मारणारा मी आता लेकराच्या गोळ्या, औषधं, खेळणी, कपडे खरेदी करु लागलो. घरी आल्यावर टिव्ही पाहत लोळणारा मी आता कितीही थकून आलो तरी लेकरासोबत खेळू लागलो. खूप चिडचिड होत होती. पण, मी शांत राहत होतो, कारण आता मी बाप होतो. एकीकडे माझा पोरगा मोठा होऊ लागला अन् दुसरीकडे माझा बाप म्हतारा होऊ लागला.

आता मी बापाला नवे कपडे आणू लागलो. लेकराला नवे कपडे आणू लागलो अन् स्वत: जुन्या कपड्यात दिवाळी साजरी करु लागलो. नवे कपडे पाहून बापाच्या डोळ्यात पाणी यायचं. अन् त्या पाण्यात मला कॉलेजची जीन्स दिसायची. बापाची केलेली फसवणूक दिसायची. बापाने केलेले काबाडकष्ट दिसायचे. बापाचे पाय धरुन रडु वाटायचं. तुम्हाला मी लय फसवलं हो बाबा. तुमच्या भोळेपणाचा मी लय फायदा घेतला असं म्हणत ढसाढसा रडू वाटायचं. पण, कितीही रडू वाटलं तरी मी कधीच रडलो नाही कारण मी आता बाप झालो होतो.

दिवस सरले. वडील आजारी पडले. बिछान्याला खिळून राहिले. डॉक्टर म्हणले थोडेच दिवस शिल्लक आहेत. जमेल तेवढी सेवा करा. तेव्हा वडील म्हणायचे, ‘नितीन मला दवाखान्याला ने. मला इंजेक्शन द्यायला सांग. मला लय त्रास होतोय.’ रडक्या स्वरात असं म्हणत ते ढसाढसा रडायचे तेव्हा त्यांच्याशेजारी बसलेली माझी अपंग आई त्यांचे डोळे पुसायची.

थरथरत्या हाताने त्यांचे पाय दाबायची. तेव्हा मी बेडरुममध्ये बसून ऑफिसचं ऑनलाईन काम करायचो. वडलांच्या दवाखान्यासाठी डबल ड्यूटी करायचो वडील म्हणायचे मला ज्यूस पाज. तेव्हा मी त्यांच्यासमोर बसून चमचाने त्यांना ज्यूस पाजायचो. जसा मी माझ्या लेकराला ज्यूस पाजला तसा मी बापाला ज्यूस पाजत होतो. ‘माझा नातू झोपला का?’ असं त्यांनी विचारलं. त्यावर मी होकार दिला आणि म्हणालो तुम्हीही आता शांत झोपा. सारखं सारखं कन्हू नका. झोपमोड होते.’ नाराजीतच त्यांनी होकार दिला आणि झोपले. क्षणभर माझ्या हाताला हात लावला आणि स्मित करत म्हणाले, ‘तु ज्यूस पाजला. बर वाटलं. आता बघ कसा शांत झोपतो.’ त्यांच्या या वाक्यावर मीही स्मित करत होकार दिला आणि लाईट बंद केली.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

पहाटे उठलो आणि वडलांची तब्येत कशी आहे हे पाहण्यासाठी लाईट चालू केली अन् काळजात स्फोटच झाला. बाप आम्हाला कायमचा सोडून गेला होता. ‘आता बघ कसा शांत झोपतो’ असं म्हणत स्मित करत ते झोपले तर परत न उठण्यासाठीच. भल्या पहाटे आई रडू लागली, बायको रडू लागली. मीही रडू लागलो. पण, क्षणात स्वत:ला सावरलं. बायकोला अन् आईला गाडीत बसवलं. समोरच्या शीटावर वडलांना बसवलं अन् गावाकडं गाडी नेली. आई रडत होती. बायको रडत होती. वडील शांत होते अन् मीही शांत होतो. रडणं शक्यच नव्हतं. आता मी बाप होतो.

बाप शरीराने मरतो. पण, आठवणींतून कधीच मरत नाही. प्रत्येकाच्या घरात आपल्या मेलेल्या वडिलांचा फोटो असतो. माझ्याही आहे. पण, मी तो फोटो आता काढून कपाटात ठेऊन दिलाय. त्यांचा तो हसरा चेहरा पाहिला की मला माझीच लाज वाटू लागते. मला घरातून पळून जावं वाटतं. मी त्यांना किती फसवलं, किती खोटं बोललो सारं काही आठवतं आणि खजिल व्हायला होतं.

त्या वेळी माझ्याकडून झाल्या चुका मी मान्य करतो. पण, बाप नसताना मान्य करण्याला काय अर्थ ? म्हणून वाटतं बाप अजून जगायला पाहिजे होता. कदाचित दहा हत्तीचं बळ अंगी घेऊन मी पायावर लोटांगण घालून सगळ्या चुकांची कबुली तरी दिली असती. आणि मला विश्वास आहे. त्यांनी मला माफही केलं असतं. कारण, लेकरानं माफी मागितल्यावर माफ करायलाही समोरचा बापच असावा लागतो.

-नितिन थोरात

(साभार : फेसबुक)


  • नम्र निवेदन
    “निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
    या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
QR 1


बाप मरायला नव्हता पायजे..!

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now